स्पर्धेतून अपंगांच्या गुणांना संधी

By Admin | Updated: February 1, 2016 01:46 IST2016-02-01T01:46:41+5:302016-02-01T01:46:41+5:30

अपंग बांधव हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे.

Opportunities for disabled people from the competition | स्पर्धेतून अपंगांच्या गुणांना संधी

स्पर्धेतून अपंगांच्या गुणांना संधी

राजकुमार बडोले : अपंगांच्या राज्यस्तरीय अजिंक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धा
गोंदिया : अपंग बांधव हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. कोणत्याही कामाप्रती असलेली त्यांची निष्ठा वाखाणण्याजोगी आहे. अपंगांसाठी आयोजित करण्यात आलेल्या मैदानी स्पर्धांमधून त्यांच्यात असलेल्या सुप्त क्रीडा गुणांना संधी मिळते, असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
जिल्हा क्रीडा संकुल येथे ३० व ३१ जानेवारी रोजी दोन दिवसीय बाराव्या वरिष्ठ आणि सहाव्या कनिष्ठ राज्यस्तरीय अपंगाच्या अजिंक्यपद मैदानी क्रीडा स्पर्धा सन २०१५-१६ चे उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्ष कशिश जायस्वाल होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, रेणुका बिडकर, पॅरा अ‍ॅथलेटिक्सचे राज्याध्यक्ष विनोद नरवडे, प्रविण उघडे, डॉ. दयानंद कांबळे, अपूर्व अग्रवाल उपस्थित होते.
पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जिल्हास्तरावर पॅराआॅलिंपिक स्पर्धा घेण्यासाठी एक लाख रुपये देण्याचा प्रस्ताव आहे. अनेक क्रीडा संस्था अशा प्रकारच्या क्रीडा स्पर्धा घेण्यासाठी पुढे येतात. मनात कोणतीही गोष्ट करण्याची इच्छा असली तर कोणीही थांबवू शकत नाही. प्रत्येकाने सामाजिक दायित्व पार पाडले पाहिजे, असेही ते म्हणाले.
सामाजिक न्याय विभागाने मागील वर्षी महत्वपूर्ण निर्णय घेतल्याचे सांगून पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, अपंगांना तीन टक्के आरक्षण, त्यांच्यासाठी निधीची तरतूद, घरकूल योजनेचा लाभ आणि एक हजार रुपये मानधन देण्याचे निश्चित केले. पाच टक्के आरक्षण अपंग खेळाडूंना देण्यासाठी आपण प्रयत्नशील असून अंधश्रध्दा निर्मूलनासाठी सामाजिक न्याय विभाग कटिबध्द असल्याची ग्वाही त्यांनी या वेळी दिली.
३० व ३१ जानेवारीदरम्यान चालणाऱ्या या दोन दिवसीय क्रीडा स्पर्धेत राज्यातील ३२० अपंग खेळाडू सहभागी झाले होते. यामध्ये २२८ मुले व ९२ मुलींनी सहभाग घेतला. कोल्हापूर जिल्ह्यातून सर्वाधिक खेळाडू सहभागी झाले असून २७ खेळाडू गोंदियाचे आहेत. कनिष्ठ गटामध्ये १८ वर्षांखालील व वरिष्ठ गटामध्ये १८ वर्षांवरील खेळाडूंचे दोन गट तयार करण्यात आले. यामध्ये १०० मीटर व २०० मीटर धावणे, भाला फेक, गोळा फेक, थाळी फेक आणि लांब उडी या खेळांचा मैदानी स्पर्धेत समावेश आहे.
स्पर्धेसाठी जिल्हा सचिव अनिल शहारे, शोभेलाल भोंगाडे, दिनेश पटेल, दिगंबर बंसोड, अभय अग्रवाल, मुजीर शेख, निलेश फुलबांधे यांच्यासह क्रीडा कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी सहकार्य केले. संचालन करून आभार जनार्धन कुसराम यांनी मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Opportunities for disabled people from the competition