चार स्थायी व दोन आमसभांना खो

By Admin | Updated: December 23, 2015 02:17 IST2015-12-23T02:17:09+5:302015-12-23T02:17:09+5:30

दर महिन्यात स्थायी समिती व दर दोन महिन्यांत आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परिषदेने चक्क चार स्थायी समिती व दोन आमसभांना खो दिला आहे.

Lose four permanent and two mangoes | चार स्थायी व दोन आमसभांना खो

चार स्थायी व दोन आमसभांना खो

विकासकामे प्रभावित : गोंदिया नगर परिषदेत नियमांना बगल
गोंदिया : दर महिन्यात स्थायी समिती व दर दोन महिन्यांत आमसभा घेणे बंधनकारक असताना नगर परिषदेने चक्क चार स्थायी समिती व दोन आमसभांना खो दिला आहे. शहरातील विविध विकासकामांसाठी स्थायी समिती व आमसभेची मंजूरी आवश्यक असताना हा बेजबाबदार प्रकार पालिकेत घडत आहे. याचा परिणाम शहरातील विकासकामांवर होत आहे. न.प.चा कार्यकाळ संपण्यासाठी जेमतेम एक वर्ष शिल्लक असताना सुरू असलेल्या या कारभारामुळे विकास कामांवर परिणाम होण्याची शक्यता आहे.
प्रशासकीय कामांत सत्ताधारी फेल ठरत असल्याचे चित्र बघावयास मिळत आहे. नगर परिषद अधिनियम १९६५ कलम ८२ अन्वये पालिकेची आमसभा दर दोन महिन्यांत घेणे बंधनकारक आहे. अध्यक्षांच्या मागणीवरून ही आमसभा बोलाविली जाते. सभेची विषय सूची अध्यक्ष तयार करतात. यामुळे वेळेवर आमसभा घेणे ही एक प्रकारे अध्यक्षांचीच जबाबदारी आहे.
शिवाय दर महिन्याला स्थायी समितीची सभा बोलावणे बंधनकारक आहे. मात्र येथे १० आॅगस्ट रोजी स्थायी समितीची सभा झाल्यानंतर सप्टेंबर, आॅक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यांतील स्थायी समितीची सभाच घेण्यात आली नसल्याची माहिती आहे. ११ आॅगस्ट रोजी घेण्यात आलेल्या आमसभेनंतर आॅक्टोबर व डिसेंबर महिन्यात आमसभा घेणे बंधनकारक होते. मात्र येथेही नियमांना धुडकाविण्यात आले. यामुळे शहरातील कित्येक विकासकामे रखडत चालली आहेत.
स्थायी समितीच्या तीन सभा व एक आमसभा न घेणे ही काही साधारण नसतानाही पालिका प्रशासन मूग गिळून बसले आहे. (शहर प्रतिनिधी)

Web Title: Lose four permanent and two mangoes