शासकीय वसाहतींची वाताहत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2019 06:00 AM2019-08-22T06:00:00+5:302019-08-22T06:00:09+5:30
येथील पाटबंधारे व पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना राहण्यासाठी असलेल्या शासकीय वसाहती पूर्णपणे कोलमडलेल्या आहेत. या वसाहती राहण्यास अत्यंत धोकादायक असून पुनरुज्जीवित करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
साई सावंत-- सातारा --जुना शासकीय दवाखाना परिसरातील शासकीय वसाहत रस्ता, गटार, शौचालय, घरांचे दरवाजे, पाण्याची टाकी या सुविधांपासून वंचित आहे. त्यामुळे शासकीय वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या सुविधा त्वरित सुरू करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. जुना शासकीय दवाखान्यात प्रवेश करतानाच रस्त्याची अवस्था दयनीय झाली आहे. या रस्त्याचे डांबरीकरणाचे काम २५ वर्षांपूर्वी झाले आहे. त्यावेळेपासून या रस्त्याची डागडुजी करण्यात आली नाही. या रस्त्यावरील खडी उखडली असून, रस्त्यात खड्डे पडले आहेत. रस्त्यावरून येताना वयोवृध्द रुग्णांना ठेचकळत जावे लागते. वाहनचालक व पादचाऱ्यांनाही त्रास सहन करावा लागत आहे. येथे सतत रुग्णांची ये-जा सुरू असते.
मुख्य रस्त्यालगत वडाच्या झाडाखाली बसण्यासाठी जागा असल्याने तेथे मद्यपींचा रात्रीच्यावेळी सतत वावर असतो. त्यामुळे रात्रीच्यावेळी महिलांना ये-जा करताना त्रास सहन करावा लागत आहे. तेथे बाटल्या व ग्लास मोठ्या प्रमाणात पडलेल्या आहेत.
जुना शासकीय दवाखाना परिसरातील वसाहतीत तर यापेक्षाही दयनीय अवस्था आहे. येथील गटारांची दुरवस्था झाली असल्याने गटारीत घाण साचत आहे. त्यामुळे परिसरातील लोकांना दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे. गटारांवर झाकणे नसल्यामुळे वसाहतीतील लहान मुलांना खेळताना धोका संभवतो. येथील शौचालयाची अवस्था यापेक्षाही दयनीय आहे. शौचालयाला जाण्यासाठी रस्ता, लाईट नसल्यामुळे रात्रीच्या वेळी बॅटरीची व मदतीसाठी एकाद्या व्यक्तीची मदत घ्यावी लागते. शौचालयांचे दरवाजे अर्धवट तुटलेल्या अवस्थेत आहेत. शौचालय परिसरात मोठमोठी झाडे-झुडपे असल्याने येण्या-जाण्यास खूप त्रास सहन करावा लागतो. वसाहतीत गावठी डुकरांचा वावर असल्याने आजारांना तसेच दुर्गंधीला सामोरे जावे लागत आहे.
या वसाहतीत राहणाऱ्या लोकांच्या घरांभोवती झाडे-झुडपे, कचऱ्याचे मोठ्या प्रमाणात साम्राज्य आहे तसेच कौलाचे मोठमोठे ढिगही वर्षोनोवर्ष पडून आहेत. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांपासून सतत भिती असते. वसाहतीत रात्रीच्या वेळी लाईट नसल्याने घराबाहेर येणेदेखील मुश्किल झाले आहे. संबंधित खात्याच्या वेळोवेळी निदर्शनास आणून देखील अधिकाऱ्यांकडून उडवाउडवीची उत्तरे दिली जात आहेत. काही वर्षांपासून अधिकाऱ्यांनी नागरी सुविधा देण्यासाठी तरतूद केली नाही. त्यामुळे परिसरातील नागरिक त्रस्त झाले आहेत.
मद्यपींच्या उचापत्या
जुना शासकीय दवाखाना वसाहतीत जाणाऱ्या मुख्य रस्त्याशेजारी असणाऱ्या झाडाच्या शेजारी रात्रीच्या वेळी मद्यपी मद्य प्राशन करण्यासाठी बसत असतात. त्यामुळे या परिसरात बाटल्या तसेच ग्लास मोठ्या प्रमाणात पडलेले आढळून येतात. येथून रात्रीच्या वेळी महिला तसेच नागरिकांना ये-जा करताना मद्यपींना सामोरे जावे लागत आहे. तसेच या रस्त्याशेजारी असणाऱ्या बंद घरात गेल्या काही दिवसांपूर्वी मागील बाजूने चोरी झाली होती.
पाण्याची टाकी, मोटार अन् मीटरची दुरवस्था
वसाहतीत पाण्याच्या टाकीची दुरवस्था झाली असून, या टाकीला दरवाजा नाही. पाण्याच्या मोटारी बंद असल्याने बादलीच्या साह्याने पाणी उपसावे लागते. टाकीला झाकण नसल्याने व मीटर बॉक्सही उघडे असल्याने अपघाताने एकादी दुर्घटना घडण्याची शक्यता आहे.
आमच्या वसाहतीत घाणीचे साम्राज्य, रस्ते गटारी, नाले, संडासची दुरवस्था झाली आहे. रोडचे काम २० ते २५ वर्षांपासून झालेले नाही. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करून देखील कोणीही याची दखल घेतली नाही. शासकीय वसाहत असल्यामुळे परवानगीशिवाय आम्हाला यात काही सुधारणा करून घेता येत नाहीत. इथे राहणे आता मुश्किल झाले आहे.
श्रीनिवास अडसुळे, स्थानिक
दिवसभर आम्ही कामानिमित्त घराबाहेर असतो. घरी बायको आणि मुलं असतात. या वसाहतीत मोठ्या प्रमाणावर झाडी वाढली आहे. त्यातून अनेकदा साप जाताना दिसतात. त्यामुळे शौचालयाला जाताना कायम कोणाची तरी सोबत लागते. शहरात राहूनही ग्रामीण भागात राहल्यासारखे वाटते. वसाहतीत स्वच्छता करण्याची गरज आहे.
सचिन वाघमारे, रहिवासी