थंडीने गारठला जिल्हा

By Admin | Updated: December 26, 2015 01:53 IST2015-12-26T01:53:04+5:302015-12-26T01:53:04+5:30

मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे.

Gartha district with cold weather | थंडीने गारठला जिल्हा

थंडीने गारठला जिल्हा

पारा १० अंशांवर: पाच दिवसांपासून तीव्रता वाढली
गोंदिया : मागील पाच-सहा दिवसांपासून थंड वाऱ्यामुळे जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. वातावरणात गारवा वाढल्याने तापमान १० अंशांवर घसरले आहे. त्यामुळे एकीकडे गरम कपड्यांची विक्री वाढली आहे. दुसरीकडे ग्रामीण भागात शेकोट्या पेटवून ऊब मिळवून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून वातावरणात गारवा जाणवू लागला आहे. पाच ते सहा दिवसांपासून सकाळी थंडीची लाट वाढल्याचे समजून येते. या थंडीची हुडहुडी आता दिवसभर कमी-अधिक प्रमाणात कायम राहते. मागील तीन ते चार वर्षापासून परिसरात दुष्काळाचे चित्र दिसून येत आहे. मागील वर्षी हिवाळ्याच्या आठ-दहा दिवस कमीअधिक प्रमाणात थंडी जाणवली, मात्र नंतर हा ऋतूच जाणवला नाही.
सध्याचे वर्ष तर मागील वर्षापेक्षा अधिक तीव्र दुष्काळी आहे. पाऊसही खूपच कमी पडला. परतीचा मान्सूनचा तर पत्ताच नाही. या भागात परतीचा पाऊस पडला नसला तरी शेजारच्या राज्यात कहर केला. उत्तरेकडे बर्फवृष्टी झाली आणि तेथील थंडीची झुळूक येथपर्यंत आली.
मागील १५ दिवसांपासून अंगाला गारवा जाणवू लागला होता. पण मागील पाच ते सहा दिवसांपासून त्याची तीव्रता अधिक वाढली आहे. पहाटे व सकाळी गरम कपडे घालून बाहेर पडण्याची वेळ आली आहे. पहाटे तर बोचणारी व अंगाला झोंबणारी थंडी जाणवते. त्यामुळे दुष्काळात थंडीची चाहूल हवीहवीशी वाटणारी ठरली आहे.
सामान्य माणूस थंडीचा अनुभव घेवू लागला आहे. सकाळचा गारवा अनुभवला जात आहे. विशेष म्हणजे थंडी जाणवू लागली तरी हिवाळ्यातील पहाटेचे दवबिंदू कुठेच दिसत नाही. वातावरणातील आर्द्रताच कमी झाल्याचा हा परिणाम आहे.
दवबिंदू नसल्याने कोरड्या थंडीचा चटका जाणवत आहे. त्यात पहाटे व सकाळच्या वाऱ्याने भर घातल्यामुळे थंडीची तीव्रता वाढली आहे. आता ग्रामीण परिसरात शेकोट्या पेटवून गरमी मिळविण्यासाठी एकत्र आलेली मंडळी, असे चित्र दिसून येत आहे. शहरी भागापेक्षा ग्रामीण भागात ही तीव्रता अधिक आहे. सकाळी व दिवस मावळल्यानंतर सायंकाळी गारवा जाणवू लागला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Gartha district with cold weather