आणेवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

By Admin | Updated: December 20, 2014 01:48 IST2014-12-20T01:48:17+5:302014-12-20T01:48:17+5:30

ब्रिटिशांनी पिकाची आणेवारी काढण्यासाठी जी आणेवारी पद्धत अंमलात आणली, तीच पद्धत अजूनही शासनाने सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे.

Farmer's loss due to the AWAY method | आणेवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

आणेवारी पद्धतीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान

केशोरी : ब्रिटिशांनी पिकाची आणेवारी काढण्यासाठी जी आणेवारी पद्धत अंमलात आणली, तीच पद्धत अजूनही शासनाने सुरु ठेवल्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान होत आहे. ब्रिटिशकालीन आणेवारी काढण्याची पद्धत त्वरित बदलविण्याची मागणी या भागातील शेतकऱ्यांनी केली आहे.
स्वातंत्र्यानंतरही इंग्रजांनी घालून दिलेल्या पद्धती व कायदे अंमलात आणणे सुरू असल्याने शासनाप्रति शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सूर दिसून येत आहे. निसर्गाच्या अवकृपेने शेत पिकाची नासाडी झाल्यास आणेवारी निश्चित करताना अद्यापही ब्रिटिशांनी निर्माण केलेल्या निकषाचा उपयोग शासन करीत असते. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीचा योग्य फायदा मिळत नाही.
इंग्रजांच्या काळात शेतीचे उत्पन्न अल्प प्रमाणात होत होते. तेव्हा उद्योगांना श्रेष्ठ समजले जात असे. आता तर नवनवीन तंत्रज्ञानामुळे शेतीचा विकास होऊन उत्पन्नात कमालीची वाढ झाली आहे. निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकऱ्यांच्या पिकाची फार मोठ्या प्रमाणात हानी होते. ब्रिटिशकालीन कालखंडात शेती करणाऱ्यांचा निम्नस्तर मानला जात होता. शेती उद्योगाला ब्रिटिशांकडून जाचक कायदे लावण्यात येत होते. त्यानुसारच आजही त्याच कायद्यानुसार शेतीची आणेवारी काढण्याची पद्धत असल्यामुळे शेतकऱ्यांना झालेल्या नुकसानीचा योग्य मोबदला मिळत नाही.
या भागातील शेतकऱ्यांची अर्थव्यवस्था शेतीवर आधारित आहे. शेतीचे तंत्र थोडे बिघडले तरी शेतकऱ्यांना वर्षभर त्रास सहन करावा लागतो. त्यांच्या घामाचा योग्य मोबदला मिळण्यासाठी नवीन निकषाप्रमाणे आणेवारी काढण्याची पद्धत अंमलात आणावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: Farmer's loss due to the AWAY method