मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

By Admin | Updated: February 3, 2016 01:57 IST2016-02-03T01:57:44+5:302016-02-03T01:57:44+5:30

मांग-गारूडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे.

The demand for Garuda community will be brought to the mainstream | मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

मांग-गारूडी समाजाला मुख्य प्रवाहात आणणार

पालकमंत्री बडोले : मुंडीकोटा येथे मांग-गारोडी समाजाचा मेळावा
मुंडीकोटा : मांग-गारूडी समाजाची स्थिती फार वाईट आहे. त्यांच्याकडे जमीन नाही, विकासाची दिशा नाही. स्वातंत्र्य मिळून अनेक वर्षे होऊनही समाजाची भटकंती सुरूच आहे. हे सर्व घडत आहे, ते फक्त शिक्षणाच्या अभावामुळेच. त्यामुळे काहीही करा, पण मुलांना शिक्षण द्या. बाबासाहेबांनी म्हटले आहे, शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे, जो प्राशन करेल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. मांग-गारूडी समाजाच्या सर्व समस्या शासन सोडविणार असून त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणले जाईल, असे प्रतिपादन सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री तथा पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.
ते तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा येथे मांग-गारूडी समाजाच्या वतीने समस्या मांडण्याकरिता आयोजित मेळाव्यात उद्घाटक म्हणून बोलत होते.
या वेळी सभेत प्रामुख्याने माजी आ. हरीश मोरे, समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड, तहसीलदार रविंद्र चव्हाण, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, विदर्भ अध्यक्ष नेवेलाल पाथरे, मिश्रीलाल शेंडे, सरपंच गीता नेवारे, सरपंच निर्मला भांडारकर, प्रकाश शेंडे आदी उपस्थित होते.
ना. बडोले पुढे म्हणाले, मांग-गारूडी समाजाच्या जात प्रमाणपत्राकरिता जी अडचण आहे ती शासन सोडवित आहे, भटक्या समाजातील बहुरूपी, कोलाटी समाज यांच्याही याच समस्या आहेत. याकरिता एक शासन निर्णय काढण्यात आला आहे. सन १९५० च्या आधीचे दाखले मिळण्याची अट असल्याने हे दाखले मिळविताना फार त्रास होतो. त्यामुळे २८ फेब्रुवारी आधी जिल्हाधिकारी व तहसीलदारांच्या माध्यमातून मांग-गारूडी समाजासाठी शिबिर घेतल्या जाईल व जातीचे प्रमाणपत्र तयार केले जातील. दारिद्र्यरेषेखालील कुटुंबाचे कार्ड व रेशन कार्ड तयार केल्या जातील. तसेच शिक्षित युवक-युवतींसाठी बार्टीच्या माध्यमातून शिबिर घेऊन प्रशिक्षण दिले जाणार असून नोकरीकरिता मदत केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविक भाषणात प्रकाश शेंडे यांनी समाजाच्या अनेक समस्यांबाबत माहिती दिली. या वेळी समाजाच्या वतीने ना. बडोले यांचे स्वागत करून सत्कार करण्यात आला. समाजाचे अध्यक्ष ब्रिजलाल गायकवाड यांनीही समाजाचे प्रश्न सोडविण्यासाठी सामाजिक न्याय विभागाकडून अपेक्षा असल्याचे सांगत मंत्री समाजाच्या समस्या ऐकायला आल्याने समाज त्यांचा आभारी असल्याचे म्हटले.
आभार विकास शेंडे यांनी मानले. कार्यक्रमासाठी नत्थू बिसने, भाऊदास उमे, ऐकनलाल कांबळे, मेरवान कांबळे, रिगबीर उसे, राजेंद्र शेंडे, मिश्री उमे, बाबुराव शेंडे, शंकर दुनाडे, प्रभू पात्रे, धनपाल वाघमारे, काल्या दुनाडे, शिवाजी कांबळे, रमेश शेंडे, बाळू बिसेन, कपूरसिंह कांबळे, अनिल वाघमारे, दिलीप पात्रे, बाबा कांबळे, बंडू कांबळे, मनोहर शेंडे, खुशाल बिसेन, चैनलाल कांबळे, उमेश शेंडे, वामन कांबळे, सूर्यभान बिसने, ईश्वर शेंडे, जीवन उमे, अशोक कांबळे, किशोर नाडे आदींनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)

Web Title: The demand for Garuda community will be brought to the mainstream