दोन्ही ‘पीयुसी’ केंद्र होणार ‘सस्पेंड’

By Admin | Updated: January 31, 2015 23:21 IST2015-01-31T23:21:35+5:302015-01-31T23:21:35+5:30

कोणतेही वाहन न दाखविता आणि प्रत्यक्ष वाहनाची तपासणी न करताच वाहन प्रदुषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या गोंदियातील दोन्ही पीयुसी केंद्रांना गोंदियाच्या परिवहन विभागाने आज जोरदार दणका दिला.

Both the 'PUC' centers will be 'Suspend' | दोन्ही ‘पीयुसी’ केंद्र होणार ‘सस्पेंड’

दोन्ही ‘पीयुसी’ केंद्र होणार ‘सस्पेंड’

आरटीओंनी दिली नोटीस : लोकमतच्या स्टिंग आॅपरेशनने सारेच अवाक
गोंदिया : कोणतेही वाहन न दाखविता आणि प्रत्यक्ष वाहनाची तपासणी न करताच वाहन प्रदुषणमुक्त असल्याचे प्रमाणपत्र देणाऱ्या गोंदियातील दोन्ही पीयुसी केंद्रांना गोंदियाच्या परिवहन विभागाने आज जोरदार दणका दिला. त्यांचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया त्यांनी सुरू केली असून त्यासाठी त्यांना शनिवारी तातडीने कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली.
लोकमतने दोन्ही पीयुसी केंद्रांवर पीयुसी प्रमाणपत्र देण्याच्या नावावर चालणाऱ्या खेळखंडोबाचे ‘स्टींग आॅपरेशन’ करून ते शनिवारच्या अंकात प्रकाशित केले. ‘५० रुपयात करा वाहन प्रदुषणमुक्त’ या मथळ्याखाली प्रकाशित या वृत्ताने गोंदियात चांगलीच खळबळ उडाली. शहर पोलीस ठाण्यात उभ्या असलेल्या आणि जिल्हा परिषदेच्या आवारातील एका भंगारात ठेवलेल्या गाडीलाही पियुसी प्रमाणपत्र कसे सहज मिळते हे पुराव्यासह लोकमतने दाखवून दिले.
नियम धाब्यावर बसवून आणि नागरिकांच्या जीवनमानाशी खेळ करणाऱ्या या प्रकाराची परिवहन विभागानेही गंभीर दखल घेतली. प्र. उपप्रादेशिक परिवहन अधिकारी एन.आर.निमजे यांनी ‘लोकमत’च्या बातमीचा आधार घेत आणि पीयुसी केंद्रांनी दिलेल्या पावती क्रमांकांची खात्री केल्यानंतर जयस्तंभ चौकातील चाचा पीयुसी सेंटर आणि रामनगरातील हार्दिक पीयुसी सेंटरला नोटीस पाठविली. ७ दिवसांच्या आत यावर खुलासा करावा, असे सांगून या प्रकरणाचा तपास करण्याचे आदेशही कनिष्ठ अधिकाऱ्यांना दिले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Both the 'PUC' centers will be 'Suspend'