प्रशासनाच्या ‘वेट ॲन्ड वाॅच’ने शेतकऱ्यांच्या काळजीत भर !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2021 05:00 IST2021-05-17T05:00:00+5:302021-05-17T05:00:27+5:30

जिल्ह्यात रब्बी हंगामात कधी नव्हे ते यंदा तब्बल ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, अनुकूल वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बीचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. जवळपास २५ ते ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रब्बीतील धानाची कापणी जळपास आटोपत आली आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची मळणीसुध्दा केली आहे; पण शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही.

Administration's' Wait and Watch 'adds to farmers' worries! | प्रशासनाच्या ‘वेट ॲन्ड वाॅच’ने शेतकऱ्यांच्या काळजीत भर !

प्रशासनाच्या ‘वेट ॲन्ड वाॅच’ने शेतकऱ्यांच्या काळजीत भर !

ठळक मुद्देधानाची विक्री झाल्यावर केंद्र सुरू करणार का, रब्बीतील धान खरेदी खरिपात?

लाेकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : रब्बीतील धान खरेदी केंद्र सुरू करण्याकरिता जिल्हा प्रशासन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने अजूनही ‘वेट ॲन्ड वाॅच’चे धोरण अवलंबिले आहे. दुसरीकडे खरीप हंगामातील कामे सुरू करण्याची वेळ आली आहे. रब्बीतील धानाची कापणी आणि मळणी करून मोकळे होण्याचा शेतकरी विचार करीत आहे., तर दुसरीकडे प्रशासनाच्या भूमिकेने शेतकऱ्यांच्या काळजीत भर पडत आहे. 
जिल्ह्यात रब्बी हंगामात कधी नव्हे ते यंदा तब्बल ६६ हजार हेक्टरवर धानाची लागवड करण्यात आली. सिंचन प्रकल्पातील पाणीसाठा, अनुकूल वातावरणामुळे खरिपापेक्षा रब्बीचे उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. जवळपास २५ ते ३० लाख क्विंटल धानाचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. रब्बीतील धानाची कापणी जळपास आटोपत आली आहे. काही शेतकऱ्यांनी धानाची मळणीसुध्दा केली आहे; पण शासकीय धान खरेदी केंद्र अद्यापही सुरू झाले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना गरजेपोटी खासगी व्यापाऱ्यांना १,३०० ते १,४०० रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे धानाची विक्री करावी लागत आहे. आधीच मागील वर्षीपासून कोरोना संकटाला तोंड देत असून, त्यातच यंदा खते आणि बियाणे यांच्या किमतीमध्ये चारपट वाढ झाल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच रब्बीतील धान खरेदी सुरू न झाल्याने शेतकऱ्यांची अधिक कोंडी झाली आहे.
 खा. प्रफुल्ल पटेल यांनी खरिपातील धानाची त्वरित उचल होऊन रब्बीतील खरेदीला सुरुवात व्हावी, यासाठी शासन स्तरावर यशस्वी पाठपुरावा केला. त्यामुळेच राइस मिलर्स आणि शासन यांच्यातील तिढा सुटून राइस मिलर्सने धानाची भरडाईसासाठी उचल करण्याची तयारी केली आहे. मात्र यानंतर जिल्हा प्रशासनाकडून धानाची भरडाईसाठी युध्दपातळीवर उचल करण्यासाठी कुठल्याच हालचाली सुरू नाही. आधीच यंदा रब्बीतील धान खरेदीला विलंब झाला आहे. त्यातच रब्बीतील धान खरेदीची मुदत संपण्याची वेळ येत आहे. मात्र यानंतर प्रशासन बिनधास्त आणि शेतकऱ्यांच्या काळजीत दिवसागणिक भर पडत आहे. शासनाच्या आदेशानंतरही प्रशासनाला आता नेमक्या कुणाच्या आदेशाची प्रतीक्षा आहे की कुणाच्या दर्शनाची वाट आहे हे मात्र कळायला मार्ग नाही. 
 

अर्धे शेतकरी व्यापाऱ्यांच्या दारात
- मे महिना अर्धा संपत आला तरी अद्यापही शासकीय धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले नाही, तर खरीप हंगामाला सुरुवात होण्यास महिनाभरापेक्षा कमी कालावधी शिल्लक आहे. रब्बीतील मळणी केलेले धान ठेवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांच्या घरी जागा नाही. तर या धानाची विक्री करून खरिपासाठी बियाणे आणि खते खरेदी करण्यासाठी पैसे नाहीत. त्यामुळे अनेक शेतकरी खरेदी केंद्र सुरू होण्याची वाट न पाहत आहे. गरजेपोटी कमी दराने खासगी व्यापाऱ्यांना धान विकून मोकळे होत आहे. त्यामुळे रब्बीत चांगले उत्पादन होऊन त्याची योग्य किमत मिळण्यापासून शेतकरी वंचित राहत आहे. 
नियोजनाचा अभाव 
- जिल्हा प्रशासनाने शेतकऱ्यांची स्थिती लक्षात घेता त्वरित रब्बीतील धान खरेदीला सुरुवात करण्याची गरज आहे. यासाठी वेळ पडली तर खासगी गुदामे भाड्याने घ्यावे, पण युध्दपातळीवर रब्बीतील धान खरेदी सुरू करावी. मात्र प्रशासन केवळ हातावर हात ठेवून प्रतीक्षा करीत आहे. यामुळे शेतकरी देशोधडीला लागत आहे.
 

 

Web Title: Administration's' Wait and Watch 'adds to farmers' worries!

टॅग्स :Farmerशेतकरी