केंद्र सरकारचा गोव्यासाठी डबल धमाका; बेंगळुरू-मडगाव मार्गावरील 'वंदे भारत' रेल्वेसेवा मंजूर
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2026 13:50 IST2026-04-29T13:46:44+5:302026-04-29T13:50:05+5:30
पायाभूत सुविधांवर भर, कुर्ती-फोंडा येथील व्हेटर्नरी कॉलेजला परवानगी

केंद्र सरकारचा गोव्यासाठी डबल धमाका; बेंगळुरू-मडगाव मार्गावरील 'वंदे भारत' रेल्वेसेवा मंजूर
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: केंद्र सरकारने राज्याच्या विकासाला गती देणारे दोन महत्त्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. कुर्टी-फोंडा येथे व्हेटर्नरी कॉलेज स्थापन करण्यास अधिकृत परवानगी देण्यात आली असून बेंगलुरू-मडगाव यादरम्यान 'वंदे भारत' रेल्वे सेवेलाही हिरवा कंदील मिळाला आहे. व्हेटर्नरी आणि अॅनिमल सायन्सेस कॉलेजमुळे राज्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला नवे बळ मिळणार आहे. तर वंदे भारत रेल्वेमुळे कनेक्टिव्हिटी वाढून पर्यटनाला चालना मिळणार आहे.
'गोवा कॉलेज ऑफ व्हेटर्नरी अॅड अॅनिमल सायन्सेस' या पशुवैद्यकीय महाविद्यालयास केंद्र सरकारने अधिकृत परवानगी दिली असून २०२६-२७ या नवीन शैक्षणिक वर्षापासून दरवर्षी ४० विद्यार्थ्यांना प्रवेशास मंजुरी दिली आहे. केंद्राकडून राज्यासाठी ही मोठी शैक्षणिक व कृषीपूरक भेट मानली जात आहे.
पशुचिकित्सा महाविद्यालय स्थापन करण्यासाठी केंद्रीय मत्स्यव्यवसाय, पशुसंवर्धन आणि दुग्धव्यवसाय मंत्रालयाकडून अधिकृत परवानगी (लेटर ऑफ परमिशन) देण्यात आली आहे.
हे महाविद्यालय गोवा विद्यापीठाच्या अधिपत्याखाली कार्यरत राहणार आहे. महाविद्यालयात बी.व्ही.एससी अँड ए. एच (बॅचलर ऑफ व्हेटर्नरी सायन्स अँड अॅनिमल हजबंडरी) हा पदवी अभ्यासक्रम सुरू केला जाईल. महाविद्यालयात २३ वेगवेगळ्या वर्गवारीमध्ये एकूण १८५ पदे भरण्यासाठी काही महिन्यांपूर्वी मंत्रिमंडळाने मान्यता दिलेली आहे. व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाकडून वेळोवेळी तपासणी होईल आणि त्यात नियमांचे पालन होत असल्याची खात्री केली जाईल.
बेंगळुरू-मडगाव 'वंदे भारत'ला मंजुरी, गोव्याच्या कनेक्टिव्हिटीला गती
बेंगळुरू-मडगाव वंदे भारत एक्सप्रेसला मंजुरी दिल्याबद्दल मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे आभार मानले. या निर्णयामुळे गोव्याची दळणवळण व्यवस्था, पर्यटन आणि आर्थिक विकासाला मोठी चालना मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या वंदेभारत सेवेच्या वेळापत्रकाबाबत लवकरच अधिक माहिती जाहीर होण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. याबाबत मुख्यमंत्री म्हणाले की, 'बेंगळुरूसारख्या मोठ्या आयटी आणि व्यावसायिक शहराला जोडणारी गोव्यातून थेट, वेगवान आणि आधुनिक रेल्वे सेवा सुरू होणे हे या राज्यासाठी महत्त्वाचे पाऊल आहे. या सेवेच्या माध्यमातून पर्यटकांना जलद आणि आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध होईल, तसेच व्यावसायिक आणि उद्योग क्षेत्रालाही फायदा होणार आहे.'
प्रवाशांचा चांगला प्रतिसाद
वंदे भारत एक्सप्रेस ही देशातील अत्याधुनिक, सेमी-हायस्पीड रेल्वे सेवा असून 'मेक इन इंडिया' अंतर्गत विकसित करण्यात आली आहे. देशातील विविध प्रमुख शहरांदरम्यान या गाड्या धावत आहेत. गोव्यात आधीच मुंबई-मडगाव मार्गावर 'वंदे भारत'रेल्वे सेवा सुरू आहे. त्याला चांगला प्रतिसाद आहे.
वीकेंड टुरिझमला चालना
बेंगळुरू-मडगाव मार्गावरील ही नवीन सेवा सुरू २ झाल्यास कर्नाटक-गोवा प्रवासाचा वेळ लक्षणीयरीत्या कमी होईल. वीकेंड टुरिझमला चालना मिळेल, विशेषतः बेंगळुरूहून येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढेल. आयटी, स्टार्टअप, व्यावसायिक क्षेत्रातील लोकांसाठी प्रवास अधिक सुलभ होईल.
व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाचे सुविधांवर समाधान
कुर्टीतील महाविद्यालयाला मिळालेली ही मान्यता व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाच्या शिफारशींवर आधारित आहे. या केंद्रीय संस्थेने सखोल तपासणी आणि मूल्यांकन केल्यानंतर असे निरीक्षण नोंदवले की, महाविद्यालयाने आवश्यक जमीन, पायाभूत सुविधा, व्हेटरिनरी क्लिनिकल कॉम्प्लेक्स, लाईव्हस्टॉक फार्म कॉम्प्लेक्स, आवश्यक उपकरणे आणि इतर सुविधा याबाबत किमान निकष पूर्ण केले आहेत. त्यामुळे परवानगी देण्यास हरकत नाही.
अटींचे पालन बंधनकारक
केंद्र सरकारने ही परवानगी सुरुवातीच्या दोन शैक्षणिक वर्षासाठी काही अटींसह दिली आहे. व्हेटर्नरी कौन्सिल ऑफ इंडियाचे २०१७ चे नियम तसेच २०१६ चे एमएसव्हीई नियम यांचे काटेकोर पालन करणे बंधनकारक असेल. प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यापूर्वी नियमानुसार नियमित अध्यापक, कर्मचारी नेमणे आवश्यक असणार आहे. पायाभूत सुविधा, शैक्षणिक सुविधा, पशुधनाची उपलब्धता व इतर निकष राखणे गरजेचे असेल.
मुख्यमंत्र्यांनी मानले आभार
मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच केंद्र सरकारचे दोन्ही प्रकल्पांच्या मंजुरीबाबत आभार मानले आहेत. सावंत म्हणाले की, 'त्यामुळे गोव्यात पशुवैद्यकीय शिक्षणाला मोठी चालना मिळणार आहे. आतापर्यंत अशा प्रकारचे व्यावसायिक शिक्षण घेण्यासाठी राज्याबाहेर जावे लागत होते. आता स्थानिक विद्यार्थ्यांना राज्यातच उच्च दर्जाचे शिक्षण मिळेल. त्यातून पशुपालन, दुग्धव्यवसाय आणि शेतकरी अर्थव्यवस्थेला बळकटी मिळेल.
पशुसंवर्धन सेवा अधिक सक्षम होऊन जनावरांचे आरोग्य, रोगनियंत्रण आणि उत्पादनक्षमता वाढविण्यास मदत होईल. ग्रामीण भागातील शेतकरी, दुग्धव्यावसायिक आणि पशुपालक यांना थेट फायदा होईल. तसेच केंद्र सरकारकडून गोव्यासाठी पायाभूत सुविधांमध्ये सातत्याने गुंतवणूक केली जात आहे. रस्ते, रेल्वे आणि विमानतळ विकासाच्या प्रकल्पांमुळे राज्याची कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होत आहे.'