मडगाव मुख्याधिकाऱ्यांची बदली

By Admin | Updated: June 9, 2015 01:20 IST2015-06-09T01:20:19+5:302015-06-09T01:20:39+5:30

मडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली.

Transfer of Madgaon Chief | मडगाव मुख्याधिकाऱ्यांची बदली

मडगाव मुख्याधिकाऱ्यांची बदली

मडगाव : नगरमंडळ आणि मुख्याधिकारी यांच्यात मडगाव पालिकेत झालेल्या वादाची परिणती शेवटी मुख्याधिकारी नवीन लक्ष्मण यांच्या बदलीत झाली. सोमवारी पर्सोनेल खात्याने लक्ष्मण यांच्या बदलीचा आदेश जारी केला. त्यानंतर पालिकेच्या मुख्याधिकारपदाचा ताबा दक्षिण गोव्याचे अतिरिक्त जिल्हाधिकारी यशवंत तावडे यांच्याकडे देण्यात आला.
आर्थूर डिसिल्वा यांनी नगराध्यक्षपदाचा ताबा स्वीकारल्यानंतर पहिल्याच दिवशी डिसिल्वा व लक्ष्मण यांच्यात वादाची ठिणगी पडली होती. त्यानंतर लक्ष्मण यांनी व्यापारी संघटनेच्या नेत्याशी बोलताना मडगावातील सर्व नगरसेवक चोर आहेत, असे वक्तव्य केल्यामुळे नगरसेवक व मुख्याधिकारी यांच्यातील संघर्ष अधिकच तीव्र बनला होता. अशा परिस्थितीत लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेत येणेच बंद केले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बसून ते मडगाव पालिकेतील कारभार हाताळत असल्याने नगरसेवकांमध्येच नव्हे तर नागरिकांमध्येही चीड होती. त्यामुळे लक्ष्मण यांची बदली करा, अशी मागणी नगरसेवकांनी मुख्यमंत्र्यांकडे केली होती.
लक्ष्मण यांनी मडगाव पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा ताबा घेतल्यानंतर वसुली व इतर कामांत झपाटा दाखवला होता. त्यामुळे मडगावच्या नागरिकांमध्ये ते लोकप्रिय झाले होते. मात्र, त्यांच्याकडे मुख्याधिकारी पदाबरोबरच उपजिल्हाधिकारी पदाचा ताबा दिल्याने त्यांचे पालिकेच्या कारभाराकडे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे मडगावच्या नागरिकांच्या फाईल्सही त्यांच्या कार्यालयात पडून राहू लागल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ही बदली झाली.(प्रतिनिधी)

Web Title: Transfer of Madgaon Chief