तिळारी नदीत चौघे बुडाले

By Admin | Updated: May 30, 2014 02:21 IST2014-05-30T02:16:59+5:302014-05-30T02:21:51+5:30

दोडामार्ग/हणखणे/डिचोली : तिळारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहाजणांपैकी पाचजण नदीपात्रातील पाण्यात बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले.

Tilari river drowned in four | तिळारी नदीत चौघे बुडाले

तिळारी नदीत चौघे बुडाले

दोडामार्ग/हणखणे/डिचोली : तिळारी नदीपात्रात पोहण्यासाठी गेलेल्या एकाच कुटुंबातील सहाजणांपैकी पाचजण नदीपात्रातील पाण्यात बुडाले. यातील एकाला वाचविण्यात यश आले. मात्र, चारजणांचा रात्री उशिरापर्यंत शोध लागला नव्हता. ही घटना हत्तीचा गुंडा-परमे येथे सायंकाळी ६.३0 वाजण्याच्या सुमारास घडली. हे कुटुंब हॉटेल व्यवसायानिमित्त उसगाव-फोंडा येथे वास्तव्यास असते. परमे या मूळ गावात नवीन घर बांधायला घेतल्याने व मुलांना सुट्टी असल्याने अर्जुन आरोसकर कुटुंबीयांसह चार दिवसांपूर्वीच आपल्या मूळ गावी गेले होते. गुरुवारी सायंकाळी घराचे काम करून अर्जुन आरोसकर हे आपल्या दोन मुलगे, एक मुलगी, भाचा व भाचीला घेऊन हत्तीचा गुंडा येथील तिळारी नदीपात्रात आंघोळीसाठी गेले होते. आंघोळ करून नदीपात्रातून बाहेर पडत असताना अरुणा अर्जुन आरोसकर हिचा पाय घसरल्याने ती प्रवाहाबरोबर नदीपात्रात वाहू लागली. या प्रकारामुळे भांबावलेल्या इतरांनी तिला वाचविण्याचा प्रयत्न केला असता, प्रवाह अधिक असल्याने तेही वाहून गेले. या वेळी अर्जुन आरोसकर यांनी प्रसंगावधान राखून बांबूच्या काठीच्या साहाय्याने अक्षता अंकुश गवस (१५) या आपल्या भाचीला बाहेर काढले. मात्र, स्वत:ची मुले व भाच्याला वाचविण्यात त्यांना अपयश आले. बुडालेल्यांमध्ये अर्जुन यांचा मुलगा आकाश आरोसकर (१८), अक्षय आरोसकर (१७) व अरुणा आरोसकर (२१) यांच्यासह त्यांच्या पिकुळे (ता. दोडामार्ग) येथील बहिणीचा मुलगा अंकित अंकुश गवस (१८) यांचा समावेश आहे. अरुणा ही सीएच्या द्वितीय वर्षात शिकत होती, अक्षय दहावी उत्तीर्ण झाला असून आकाश बारावी उत्तीर्ण झाला होता. या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक आर. एस. बाभळे यांच्या मार्गदर्शनाखाली हवालदार अशोक गावित, आर. डी. कदम व विजय कांबळी शोधकार्य करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Tilari river drowned in four