व्याघ्र राखीवक्षेत्राची आवश्यकता नाही; मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मांडले मत
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2026 13:51 IST2026-05-05T13:51:29+5:302026-05-05T13:51:29+5:30
वाघाच्या रक्षणासाठी राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्राची आवश्यकता नाही, असे मत समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.

व्याघ्र राखीवक्षेत्राची आवश्यकता नाही; मंत्री सुभाष फळदेसाई यांनी मांडले मत
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वाघ हा सांगे परिसरातील लोकांसाठी दैवत समान आहे. वाघाची हत्या झाली असेल आणि त्याच्या अवयवांची जर तस्करी झाली असेल, तर त्यावर कडक कारवाई झालीच पाहिजे. वाघांच्या रक्षणासाठी आमचे सरकार नेहमीच कटिबद्ध राहिले आहे. पण, वाघाच्या रक्षणासाठी राज्यात व्याघ्र राखीव क्षेत्राची आवश्यकता नाही, असे मत समाज कल्याण खात्याचे मंत्री सुभाष फळदेसाई यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले.
फळदेसाई यांनी यावेळी सांगितले की, व्याघ्र राखीव क्षेत्रासाठी मोठ्या प्रमाणावर लोकांचे स्थलांतर करावे लागणार. त्यामुळेच आमचा व्याघ्र क्षेत्राला विरोध आहे. दहा ते वीस हजार लोकांचे स्थलांतर यासाठी करावे लागणार आहे, त्यामुळे व्याघ्र राखीव क्षेत्राबाबतचा निर्णय पुनर्विचार करण्यासारखा आहे. आम्ही वाघ नको, असे म्हणत नाही, आम्हाला वाघ हवेत. ते जसे आतापर्यंत मुक्तपणे फिरत होते, तसेच त्यांना राहू द्यावे. मात्र अर्धा गोवा व्याघ्र संरक्षित क्षेत्र करून स्थानिकांना
स्थलांतरित करणे योग्य नाही.
स्थानिक लोक व्याघ्र संरक्षित क्षेत्राची मागणी करत नाही. जे शहरात आरामात एसीमध्ये बसून राहतात तेच व्याघ्र संरक्षित क्षेत्राची मागणी करत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना त्यांच्या राहत्या जागेवरून न हलविता वाघांचे संरक्षण करण्यासाठी कडक कायदे लागू करण्यावर आमचे सरकार भर देत आहे, असेही फळदेसाई यांनी पुढे सांगितले.
मृत वाघाच्या घटनेवर अधिक बोलताना फळदेसाई यांनी सांगितले की, वाघाला मारणे हा गुन्हा आहे आणि अशा प्रकारांवर कडक कारवाई झालीच पाहिजे. वाघांचे अस्तित्व गावागावात असून त्यांची पूजा केली जाते, त्यामुळे वाघांविरोधात नसून त्यांच्या संरक्षणाला पूर्ण पाठिंबा आहे. वाघांची तस्करी किंवा शिकार करणाऱ्यांवर कठोर निर्बंध आणि कारवाई करण्यात यावी यासाठी मी मुख्यमंत्र्याकडे मागणी करणार आहे.