विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर बनविणे ही भूमिका सोडून द्या!; शिक्षकांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांची नाराजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 09:31 IST2026-04-23T09:29:57+5:302026-04-23T09:31:25+5:30

करिअर घडविण्याचे केले आवाहन

stop the role of only making students graduates cm pramod sawant displeasure over teacher performance | विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर बनविणे ही भूमिका सोडून द्या!; शिक्षकांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांची नाराजी

विद्यार्थ्यांना केवळ पदवीधर बनविणे ही भूमिका सोडून द्या!; शिक्षकांच्या कामगिरीबाबत मुख्यमंत्र्यांची नाराजी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी राज्यातील काही शिक्षकांच्या कामगिरीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या सात वर्षांच्या अनुभवावरून काही शिक्षक शंभर टक्के प्रयत्न करत नसल्याचे निरीक्षण त्यांनी मांडले.

खांडोळा येथे मुलींसाठी बांधलेल्या अहिल्या वसतिगृहाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री म्हणाले की, 'गेली सात वर्षे मुख्यमंत्री व शिक्षणमंत्री म्हणून मला बरेच अनुभव आले. शिक्षकांची भूमिका ही केवळ विद्यार्थ्यांना पदवीधर बनवण्यापुरती मर्यादित नसून त्यांच्या करिअर घडवणेही तितकेच महत्त्वाचे आहे.

पदव्या बाहेरूनही मिळू शकतात, मात्र विद्यार्थ्यांना योग्य ते मार्गदर्शन आणि त्यांचा कौशल्य विकास शिक्षकांनीच करणे आवश्यक आहे. प्रत्येक शिक्षकाने दरवर्षी किमान १० विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले, तर कोणताही विद्यार्थी बेरोजगार राहणार नाही.'

राज्यातील शिक्षण व्यवस्थेबाबत महत्त्वपूर्ण मत व्यक्त करत सावंत यांनी शिक्षकांना 'आऊट ऑफ द बॉक्स' विचार करण्याचे आवाहन केले आहे. बीए, बीकॉम आणि सायन्स यावरच मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना नवीन कौशल्ये आणि रोजगाराच्या संधींकडे वळवणे आवश्यक आहे.

सावंत म्हणाले की, 'केवळ पारंपरिक शिक्षण घेऊन अनेक विद्यार्थी बेरोजगार राहतात. त्यामुळे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना स्व-रोजगार, कौशल्याधारित शिक्षण, तसेच करिअर मार्गदर्शन आणि समुपदेशन देण्यावर भर द्यावा. शिक्षण क्षेत्रात बदलत्या काळानुसार नवे प्रयोग आणि नाविन्यपूर्ण दृष्टिकोन स्वीकारणे अत्यावश्यक आहे.' कार्यक्रमाला व्यासपीठावर आमदार गोविंद गावडे, स्थानिक सरपंच आदी उपस्थित होते. महाविद्यालयाचे शिक्षक व विद्यार्थ्यांनीही याप्रसंगी उपस्थिती लावली.

२८ खोल्या, आठ कोटींचा खर्च

खांडोळा येथे जीएसआयडीसीने ८ कोटी रुपये खर्चुन बांधलेल्या या वसतिगृहात २८ खोल्या असून ५६ मुली राहू शकतात. येथे बॅडमिंटन, टेबल टेनिस, योगा अशा सर्व सुविधा आहेत, असे मुख्यमंत्र्यांनी भाषणात स्पष्ट केले. ते म्हणाले की, दोन सरकारी महाविद्यालयांमध्ये वसतिगृहे बांधून पूर्ण झाली आहेत. तिसरेही लवकरच पूर्ण होईल.

प्रत्येक शिक्षकांनी वर्षाकाठी दहा विद्यार्थ्यांची जबाबदारी स्वीकारली, तरी राज्यात एकही युवक-युवती बेरोजगार राहणार नाही. शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे करिअर घडवण्याकडे लक्ष द्यायला हवे. शिक्षकांची जबाबदारी केवळ पदवीधर घडवणेच नव्हे, तर विद्यार्थ्यांचे करिअर घडवणे हीदेखील आहे.

मुख्यमंत्री म्हणाले की, एआयमुळे आता शिक्षकांची गरज राहणार नाही. विद्यार्थ्यांना लेक्चर्सुद्धा एआयवरून मिळू लागले आहेत. पदवीधर असेदेखील निर्माण होऊ शकतात.

शिक्षकांची खरी गरज विद्यार्थ्यांना करिअर मार्गदर्शन करून त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठीच आहे. या गोष्टीची पालक, आमदार, मंत्री किंवा मुख्यमंत्री म्हणून मला चिंता करावी लागू नये.

Web Title : डिग्री से आगे: गोवा के मुख्यमंत्री ने शिक्षकों से करियर बनाने का आग्रह किया

Web Summary : गोवा के मुख्यमंत्री ने शिक्षकों द्वारा केवल डिग्री पर ध्यान केंद्रित करने की आलोचना की। उन्होंने उनसे छात्रों को कौशल विकास, करियर के अवसरों और स्व-रोजगार के लिए मार्गदर्शन करने का आग्रह किया, इस बात पर जोर दिया कि बेरोजगारी से निपटने और उन्हें भविष्य के लिए तैयार करने के लिए प्रत्येक शिक्षक को प्रतिवर्ष कम से कम 10 छात्रों का मार्गदर्शन करना चाहिए।

Web Title : Beyond Degrees: Goa CM Urges Teachers to Shape Careers

Web Summary : Goa CM criticizes teachers focusing solely on degrees. He urges them to guide students towards skill development, career opportunities, and self-employment, emphasizing that every teacher should mentor at least 10 students annually to combat unemployment and prepare them for the future.