वीरेश यांच्या भूमिकेवर ठरणार आरजीचे भवितव्य; वाद चर्चेने मिटवण्याचा अनेकांकडून सल्ला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:32 IST2026-05-14T12:31:43+5:302026-05-14T12:32:02+5:30
काँग्रेसचे काही नेतेही आरजीमधील अंतर्गत वादाकडे लक्ष ठेवून आहेत.

वीरेश यांच्या भूमिकेवर ठरणार आरजीचे भवितव्य; वाद चर्चेने मिटवण्याचा अनेकांकडून सल्ला
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: आरजी पक्षातील अंतर्गत कलह व प्रमुख मनोज परब यांनी चालविलेली टीका यावर अजून आमदार वीरेश बोरकर यांनी कोणतेही भाष्य केलेले नाही. बोरकर यांनी मौन पाळल्याने फूट अजून अधिकृतरीत्या उघड झाली नाही. पण, बोरकर यांनी जाहीरपणे बोलण्यास आरंभ केल्यानंतर मग आरजीचे भवितव्य काय असेल, ते अधिक स्पष्ट होईल.
काँग्रेसचे काही नेतेही आरजीमधील अंतर्गत वादाकडे लक्ष ठेवून आहेत. मनोज परब व त्यांच्या समर्थकांना थेट उत्तर देणे बोरकर टाळतील की बोरकर हे स्वतःची वेगळी वाट पकडतील, याकडे काही आरजी कार्यकर्त्यांचेही लक्ष लागून आहे. आरजी पक्ष टिकायला हवा तर वीरेश व परब यांच्या समर्थकांमधील वाद मिटायला हवा, असे आरजीच्या काही प्रामाणिक कार्यकर्त्यांना वाटत आहे.
गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियाच्या माध्यमातून रिव्होल्यूशनरी गोवन्स (आरजी) पक्षातील वाद चर्चेला आला आहे. पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी पक्षांतर्गत विरोधकांची नावे जाहीर करत त्यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. त्याला आमदार वीरेश यांच्या समर्थकांनी प्रत्युत्तर दिल्याने जोरदार आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत.
आमदार विजय सरदेसाई म्हणाले, 'युतीसंदर्भात आरजी पक्षाचे नेते मनोज परब यांनी व्यासपीठावरून आमच्यासोबत हात उंचावले. त्यानंतर आमच्यावर सेटिंग केल्याचा आरोप केला. कुठलेही भांडण किंवा वाद नसताना अचानक त्यांनी आरोप केले व त्यानंतर स्वतःच हे प्रॅक असल्याचा दावा केला. त्यामुळे आरजी पक्षात काय सुरू आहे, त्यावर मी अधिक बोलणार नाही.
मात्र, प्रादेशिक राजकारण करायचे असल्यास स्थिर नेतृत्व आवश्यक आहे. पक्षांतर्गत होणारे वाद चव्हाट्यावर आणू नयेत. त्यांनी एकमेकांशी चर्चा करावी व वाद संपुष्टात आणावेत,', असे त्यांनी नमूद केले.
वाद अन्य प्रादेशिक पक्षांतही होतील असे नाही
'आरजी प्रादेशिक राजकीय पक्ष आहे. त्या पक्षात वाद निर्माण झाला, याचा अर्थ अन्य प्रादेशिक पक्षांमध्येही वाद होईल, असा समज लोकांनी करून घेऊ नये. राज्यातील जुन्या प्रादेशिक पक्षानेही असे केले नाही', असे विजय सरदेसाई यांनी सांगितले.
वाद सोशल मीडियावर मांडून राजकारण नको: सरदेसाई
'प्रादेशिक राजकारण करायचे असल्यास स्थिर नेतृत्व आवश्यक आहे. पक्षांतर्गत होणारे वाद सोशल मीडियावर पोस्ट करून आम्ही अशा प्रकारे राजकारण करीत नाही,' अशी खरमरीत टीका गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांनी केली. आरजीतील वादावर ते माध्यमांशी बोलत होते. 'पक्षांतर्गत वाद असतील, तर ते सर्वांनी एकत्र बसून सामंजस्यपणे सोडवायला हवेत. ते चव्हाट्यावर आणून नव्हे. आमच्या पक्षातही मतभेद असतील तर चर्चा करून योग्य पद्धतीने सोडवले जातात', असे त्यांनी स्पष्ट केले.
अंतर्गत वाद चर्चा करून सोडवा : सिसिल रॉड्रिग्स
आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आरजी पक्षात जे काही वाद उफाळले आहेत, ते योग्य नाहीत. पक्षांतर्गत जे वाद सुरू आहेत, ते एकत्र येऊन चर्चा करून सोडवावेत. राज्यातील विद्यमान भाजप सरकारच्या काळात अनेक समस्या आहेत. यात कायदा व सुव्यवस्था, पर्यावरणाचा हास, जमीन घोटाळे आदींचा समावेश आहे. राज्यातील सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न, समस्या सोडविण्यासाठी तसेच या सरकार विरोधात एकत्र यायचे असल्यास मतभेद व वाद दूर ठेवून एकत्र येण्याची गरज आहे, असे सामाजिक कार्यकर्त्या व आप पक्षाच्या माजी नेत्या सिसिल रॉड्रिग्स यांनी स्पष्ट केले.
आरजी नेत्यांच्या सोशल मीडियावरील पोस्ट
राजकारण करणाऱ्यांवर तीन वर्षे ठेवली होती नजर.
क्रांतीच्या नावाने राजकारण करणाऱ्यांची ओळख पटली.
लिसिओ रॉनकॉन यांनी सांतआंद्रेच्या कार्यकर्त्यांचे केले ब्रेन वॉश.
पक्ष नेतृत्व व पक्षाविरोधी काम करण्यामागे रॉनकॉन यांचे डोके.