२० मेनंतर मान्सूनपूर्व सरींना वेग; हवामान खात्याने वर्तविला अंदाज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 18, 2026 12:14 IST2026-05-18T12:13:00+5:302026-05-18T12:14:11+5:30
गोमंतकीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता

२० मेनंतर मान्सूनपूर्व सरींना वेग; हवामान खात्याने वर्तविला अंदाज
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गोव्यात सध्या उन्हाचा तीव्र चटका आणि असह्य उकाड्यामुळे नागरिक हैराण झाले असून, सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. अधूनमधून हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत असल्या तरी २० मेनंतरच मान्सूनपूर्व पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याच्या अंदाजातून व्यक्त करण्यात आली आहे.
यंदा मान्सून नेहमीपेक्षा सुमारे सहा दिवस आधी दाखल होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यानुसार २६ मे रोजी केरळमध्ये तर ३१ मे रोजी गोव्यात मान्सून पोहोचू शकतो. साधारणपणे मान्सून आगमनापूर्वी १० ते १५ दिवस मान्सूनपूर्व सरी सुरू होतात. त्यामुळे गोव्यात २० मेनंतर या सरींना अधिक वेग येण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे.
वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा...
दरम्यान, बदलत्या हवामानामुळे पुढील काही दिवस राज्यात कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता असून, हवेतील आर्द्रता मोठ्या प्रमाणात वाढल्याने नागरिकांना तीव्र उकाडा आणि घामाच्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, २० मेच्या सुमारास अरबी समुद्राकडून येणाऱ्या वाऱ्यांच्या वेगात आणि दिशेत बदल होण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर गोव्याच्या विविध भागांत दुपारनंतर किंवा संध्याकाळी विजांच्या कडकडाटासह वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळू शकतात.
या मान्सूनपूर्व पावसामुळे हवेत गारवा निर्माण होऊन गेल्या महिनाभरापासून सुरू असलेल्या उकाड्यापासून गोवेकरांना मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.