मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी घेतली नितीन नबीन यांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:39 IST2026-05-01T12:35:17+5:302026-05-01T12:39:59+5:30
विधानसभा निवडणुकीच्या रणनीतीवरही केले मंथन

मंत्रिमंडळाच्या फेररचनेची शक्यता; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांनी घेतली नितीन नबीन यांची भेट
लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी :गोवा मंत्रिमंडळाची यापुढे फेररचना होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. दोघा आमदारांना मंत्रिपदे मिळू शकतात, अशी माहिती राजकीय सूत्रांकडून मिळाली. तर सध्याच्या एका मंत्र्याला डच्चू मिळू शकतो. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मात्र सगळी माहिती गुप्त ठेवली आहे.
मुख्यमंत्री व भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक यांनी दिल्लीत पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांची भेट घेतली. पुढील निवडणुकीसाठीची रणनीतीवरही चर्चा झाली. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर रणनीती, पक्ष संघटन अधिक मजबूत करण्यावर विशेष भर देण्यात आला. सध्याच्या राजकीय स्थितीवर सविस्तर चर्चा झाली.
बैठकीत पुढील निवडणुकीसाठीची रणनीती, संघटनात्मक बांधणीसह सरकारने केलेल्या कल्याणकारी कामांची माहिती तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. पक्षाचा जनाधार अधिक बळकट करण्यासाठी कार्यकर्त्यांना सक्रिय करण्याची गरज नबीन यांनी अधोरेखित केली.
दरम्यान, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिल्लीत केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांची भेट घेत भारतनेट प्रकल्पाच्या अंमलबजावणीचा सविस्तर चर्चा केली. भारतनेटच्या गोव्यातील डिजिटल पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी बैठकीत चर्चा विनिमय झाला. भारतनेट प्रकल्पाची सद्यस्थिती, प्रलंबित कामे आणि पुढील टप्प्यांबाबत आढावा घेण्यात आला. यावेळी सिंधिया यांनी गोव्यातील अंमलबजावणीला गती देण्यासाठी केंद्र सरकारकडून पूर्ण सहकार्य देण्याचे आश्वासन दिले. या प्रकल्पामुळे राज्यातील डिजिटल कनेक्टिव्हिटी अधिक मजबूत होऊन ई-गव्हर्नन्स, ऑनलाइन सेवा, शिक्षण आणि व्यवसाय क्षेत्राला मोठा फायदा होणार आहे.
पोटनिवडणुकीचा आढावा
फोंडा विधानसभा पोटनिवडणूक रद्द झाल्यानंतरची स्थिती आणि त्याचे राजकीय परिणाम याबाबतही राष्ट्रीय अध्यक्षांनी आढावा घेतला. प्रदेशाध्यक्ष आणि मुख्यमंत्र्यांकडून यासंदर्भातील तपशीलवार माहिती घेतली.
'...ते मुख्यमंत्र्यांना ठाऊक'
दरम्यान, दामू नाईक यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की ही बैठक पूर्णपणे संघटनात्मक बांधणी आणि पुढील विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने होती. रवी नाईक यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या मंत्रिपदाबाबत चर्चा झाली का? असा प्रश्न 'लोकमत'ने दामू यांना केला असता ते म्हणाले की, 'याबाबत मुख्यमंत्री काय ते सांगतील.' एकूणच गोव्यातील राजकीय परिस्थितीवर सखोल चर्चा झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महत्त्वपूर्ण बैठक
सत्ताधारी भाजप गोव्याच्या राजकारणात सध्या पकड अधिक मजबूत करण्याच्या प्रयत्नात आहे. आगामी निवडणुका पाहता, ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जाते. भाजपने देशभरात 'तळागाळातील कार्यकर्ता' या सूत्रावर भर दिला आहे. 'फिर एक बार मोदी सरकार' आणि 'विकसित गोवा' या सूत्राने आगामी काळात राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करणार असल्याची माहिती नाईक यांनी नबीन यांना दिली. प्राप्त माहितीनुसार, ही बैठक नियमित चर्चा नसून, राज्य भाजपच्या भविष्यातील वाटचालीची 'ब्लूप्रिंट' ठरविण्यासाठी होती.