होमकुंड काळात जत्रा परिसरातील दुकाने बंद ठेवा; प्रशासनाचे आदेश, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 19, 2026 10:43 IST2026-04-19T10:42:50+5:302026-04-19T10:43:09+5:30
२१ रोजी सायंकाळी ६ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ८ या कालावधीत जत्रा परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.

होमकुंड काळात जत्रा परिसरातील दुकाने बंद ठेवा; प्रशासनाचे आदेश, नियमांचे पालन करण्याचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क, डिचोली: शिरगाव येथील श्री देवी लईराई जत्रेदरम्यान होमकुंड विधीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने कडक निर्बंध लागू केले आहेत. उपविभागीय दंडाधिकारी शुभम नाईक यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अंतर्गत आदेश जारी करत २१ रोजी सायंकाळी ६ ते २२ एप्रिल रोजी सकाळी ८ या कालावधीत जत्रा परिसरातील सर्व दुकाने, हॉटेल्स व व्यावसायिक आस्थापना बंद ठेवण्याचे निर्देश दिले आहेत.
दरवर्षीप्रमाणे यंदाही जत्रेला मोठ्या प्रमाणात भाविकांची उपस्थिती अपेक्षित असून, विशेषतः होमकुंड विधीवेळी मोठी गर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. गर्दीवर नियंत्रण, आपत्कालीन मार्ग मोकळे ठेवणे आणि सुरक्षेच्या दृष्टीने उपाययोजना काटेकोरपणे राबविण्यावर प्रशासनाचा भर आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, उत्तर गोवा यांनी ३१ मार्च २०२६ रोजी तयार केलेल्या इव्हेंट मॅनेजमेंट प्लॅननुसार जत्रा परिसर सहा झोनमध्ये विभागण्यात आला आहे. विविध विभागांमध्ये समन्वय साधून आपत्कालीन परिस्थितीला तोंड देण्यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
या आदेशानुसार, होमकुंड कालावधीत कोणतीही विक्री, ग्राहकांची ये-जा किंवा कोणतीही व्यावसायिक हालचाल करण्यास सक्त मनाई असेल. तसेच, अनधिकृत स्टॉल्स उभारण्यावर पूर्णतः बंदी घालण्यात आली आहे. दि. १० एप्रिल रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडून अधिकृत मंजुरी मिळालेल्या स्टॉल्सना या निर्बंधातून सशर्त सूट देण्यात आली आहे.
या आदेशाच्या अंमलबजावणीसाठी डिचोलीचे मामलेदार यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त पथक कार्यरत राहणार आहे. हे पथक त्यावर लक्ष ठेवणार आहे. त्यामध्ये पोलिस, अग्निशामक दल, वीज विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, तसेच ग्रामपंचायत शिरगाव यांचा समावेश असेल.
आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय संहिता, २०२३ च्या कलम २२३ अंतर्गत कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. सदर आदेश तत्काळ प्रभावाने लागू करण्यात आला असून, नमूद कालावधीपर्यंत तो अंमलात राहणार आहे, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.