अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2026 07:43 IST2026-04-15T07:42:51+5:302026-04-15T07:43:19+5:30

हडफडे नाईट क्लब दुर्घटनेतून धडा घ्यावा; उद्योग व पर्यटन क्षेत्राने जाणीव ठेवणे गरजेचे

it is everyone responsibility to follow fire safety rules said cm pramod sawant | अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे ही प्रत्येकाची जबाबदारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: अग्निसुरक्षा ही केवळ अग्निशामक व आपत्कालीन सेवांची जबाबदारी नसून उद्योग, आस्थापने तसेच सर्वसामान्य नागरिकांनीही ती तितक्याच काटेकोरपणे पाळली पाहिजे. अन्यथा त्याचे गंभीर परिणाम काय होऊ शकतात, याची जाणीव हडफडे येथील बर्च लेन नाईट क्लब दुर्घटनेतून राज्याला झाली आहे. ही घटना राज्यासाठी मोठी शोकांतिका ठरली असून, अशा दुर्घटना टाळण्यासाठी सर्वानी अग्निसुरक्षा नियमांचे पालन करणे अत्यावश्यक आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

राष्ट्रीय अग्निशमन सेवा दिनानिमित्त सांतीनेझ येथील अग्निशामक दलाच्या मुख्यालयाच्या मैदानावर आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्य सचिव व्ही. कांडावेलू, अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, अग्निशामक दल काळानुरूप स्वतःला अद्ययावत करत असून, दलाकडे आधुनिक व सक्षम यंत्रणा उपलब्ध आहेत. त्यामुळे कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीत तत्काळ मदत पोहोचविणे शक्य होत आहे. तसेच पणजी, मडगाव आणि कुडचडे येथे अत्याधुनिक अग्निसुरक्षा केंद्रे स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, त्यासाठीची तयारी सुरू करण्यात आली आहे.

राज्यातील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यासाठी अग्निशामक दलाने विविध स्तरांवर प्रयत्न सुरू केले आहेत. 'आपदा मित्र' आणि 'सखी' या उपक्रमांतर्गत शेकडो स्वयंसेवकांना प्रशिक्षित करण्यात आले असून, आपत्तीच्या वेळी स्थानिक पातळीवर तत्काळ मदत मिळावी यावर भर देण्यात आला आहे. तसेच, ११२ आपत्कालीन प्रतिसाद प्रणालीशी जोडणीमुळे तातडीच्या घटनांवर जलद नियंत्रण मिळवणे शक्य होणार आहे.

१६५ जणांना जीवदान : रायकर

अग्निशामक दलाचे संचालक नितीन रायकर यांनी आपल्या भाषणात सांगितले की, गेल्या वर्षभरात विभागाने विविध आपत्कालीन घटनांमध्ये १६५ नागरिकांचे आणि ८७४ प्राण्यांचे प्राण वाचवले आहेत. लवकरच विभाग ११२ आपत्कालीन प्रतिसाद सहाय्यता प्रणालीशी जोडला जाणार असून, त्यामुळे घटनांवर प्रारंभीच नियंत्रण मिळवणे अधिक सुलभ होणार आहे.

यावेळी 'आपदा मित्र' आणि 'सखी' या उपक्रमांचा उल्लेख १ करताना त्यांनी सांगितले की, अग्निशामक दलाने आतापर्यंत ६५० हून अधिक स्वयंसेवकांना प्रशिक्षण दिले आहे. "उपचारापेक्षा प्रतिबंध अधिक चांगला" हा मूलमंत्र अंगीकारून दल कार्यरत आहे, ही बाब समाधानकारक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

सांतिनेझ येथील फायर फोर्स २ प्रशिक्षण केंद्राला राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयाकडून राज्य प्रशिक्षण केंद्राचा दर्जा मिळाला आहे. येथे विविध राज्यांतील १०८ उपअधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले.

राज्यातील शाळा, महाविद्यालये आणि उच्च माध्यमिक स्तरावरील शिक्षकांसाठीही अग्निसुरक्षा जनजागृती व प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत असल्याची माहिती रायकर यांनी दिली.
 

Web Title : अग्नि सुरक्षा नियमों का पालन करना सबकी जिम्मेदारी: मुख्यमंत्री प्रमोद सावंत

Web Summary : मुख्यमंत्री सावंत ने अग्नि सुरक्षा को सभी की जिम्मेदारी बताया, केवल अग्निशामकों की नहीं। हडफडे की घटना से सबक लेने की बात कही। आधुनिक अग्नि केंद्र स्थापित होंगे। पिछले वर्ष 165 लोगों और 874 जानवरों की जान बचाई गई। 'आपदा मित्र' और 'सखी' पहल स्वयंसेवकों को प्रशिक्षित कर रही हैं।

Web Title : Fire safety compliance is everyone's responsibility: CM Pramod Sawant

Web Summary : CM Sawant stresses fire safety as everyone's responsibility, not just firefighters'. He highlighted the Hadfade incident's lessons. Modern fire centers will be established. 165 lives and 874 animal lives were saved last year. 'Aapda Mitra' and 'Sakhi' initiatives are training volunteers.