मी सीएमसोबत, पण सत्तरीसाठी नोकऱ्या द्या; मंत्री विश्वजीत राणे यांची गर्जना
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 09:19 IST2026-04-24T09:18:19+5:302026-04-24T09:19:26+5:30
कार्यक्रमात मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांची स्तुती केली.

मी सीएमसोबत, पण सत्तरीसाठी नोकऱ्या द्या; मंत्री विश्वजीत राणे यांची गर्जना
लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरी : मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबत आहे. पण सत्तरी तालुक्यातील लोकांना मुख्यमंत्र्यांनी नोकरी द्यायला हवी. सत्तरी तालुक्यातील लोकांना सरकारी नोकरी उपलब्ध करून दिली तर मी कायम मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्यासोबतच असेन, असे विधान मंत्री विश्वजीत राणे यांनी काल, गुरुवारी होंडा येथे एका सोहळ्यात केले.
कार्यक्रमात मंत्री राणे यांनी मुख्यमंत्री सावंत यांची स्तुती केलीच. सरकार चांगले काम करतेय, सरकार लोकांसाठी, गरीबांच्या कल्याणासाठी आहे असे विश्वजीत राणे म्हणाले. होंडा येथे मैदानाचे उदघाटन करण्यात आले. त्यावेळी मोठी गर्दी झाली होती. पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे व इतरांची भाषणे झाली.
दरम्यान, वाळपई सत्तरीत काल अटल आसरा योजनेखाली कार्यक्रम झाला.
ठाणे येथे एक कार्यक्रम झाला. त्यावेळी आमदार दिव्या राणे यांनी एका संरक्षक भींतीच्या कामाची पायाभरणी केली. चाळीस लाख रुपये खर्चुन शंकर मठ ते चरावणे येथे रस्त्यालगत संरक्षक भिंत बांधली जाईल. नदीकडे रस्त्याला धोकादायक वळण आहे, तेथे संरक्षक भिंतीची मागणी लोकांकडून होती. ती मागणी पूर्ण करण्यासाठी दिव्या राणे यांनी पावले उचलली आहेत. होंडा येथे बाजार प्रकल्पाच्या कामाची पायाभरणी गुरुवारी आमदार दिव्या राणे यांनी केली. आणखी एक फूटसाल मैदान बांधण्याची यांनी घोषणा मंत्री राणे यांनी केले. युवकांना रोजगार संधी मिळवून देण्याची ग्वाही त्यांनी यावेळी दिली.
रोजगार संधी द्याच
'मी मुख्यमंत्र्यांसोबत कायम उभा राहीन. पण सत्तरीतील लोकांना रोजगार संधी द्यावी लागेल. मला लोकांसाठी सरकारी नोकऱ्या हव्या आहेत. जर सत्तरीवासीयांना नोकऱ्या दिल्या तर विश्वजीत राणे तुमच्यासोबत राहील' असे मंत्री राणे यांनी जाहीर करत वेगळा संदेश दिला. माझा आवाज सरकारपर्यंत पोहचणारच. मी व मुख्यमंत्री एकत्र बसेन. आम्ही सत्तरीतील रोजगाराचा प्रश्न सोडवू' असेही विश्वजीत म्हणाले.