Goa MPs approached PM for launching mining business | खाण व्यवसाय सुरू करण्यासंबंधी गोव्याच्या खासदारांचे पंतप्रधानांना साकडे

खाण व्यवसाय सुरू करण्यासंबंधी गोव्याच्या खासदारांचे पंतप्रधानांना साकडे

मडगाव: बंद असलेला गोव्यातील खाण व्यवसाय  विनाविलंब सुरू करावा अशी मागणी या राज्याचे दक्षिण गोव्याचे खासदार फ्रान्सिस सार्दीन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे एका लेखी निवेदनाद्वारे केली आहे. आज  गुरुवारी सार्दीन यांनी मडगावात पत्रकार परिेषद घेऊन ही माहिती दिली. खाण व्यवसाय हा गोव्याचा आर्थिक कणा आहे. गोवा मुक्तीपूर्वीपासून राज्याच्या अर्थव्यवस्थेतील हा महत्वाचा घटक आहे, मोदी यांनी लक्ष घालून हा खाण व्यवसाय पुन्हा सुरू करावा, अशी मागणी सार्दीन यांनी केली आहे.

दक्षिण गोवा काँग्रेसचे अध्यक्ष ज्यो डायस हेही पत्रकार परिषदेला उपस्थित होते. खाण व्यवसाय ठप्प असल्याने प्रत्यक्ष वा अप्रत्यक्षरित्या या व्यवसायावर अवलंबून असलेल्यांची हाल झालेले आहे याकडेही सार्दीन यांनी लक्ष वेधले.  गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे खाण व्यवसाय आज सुरु होणार उद्या सुरू होणार, असे केवळ आश्वासने देत आहेत. भाजपा हा केवळ आश्वासने देतो प्रत्यक्षात काहीच करीत नाहीत असा टोलाही त्यांनी हाणला. खाण व्यवसाय बंद असल्याने राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यावर त्वरित उपाययोजना आखून खाण व्यवसाय सुरू करावा अशी मागणी खासदार सार्दीन यांनी केली आहे.

सद्या राज्यात डेंग्यूने थैमान घातले आहे. डेंग्यूच्या फैलावाबद्दल सार्दीन यांनी चिंता व्यक्त केली. या पार्श्वभूमीवर सरकारने केवळ या रुग्णांवर उपचारासाठी बांबोळी येथील गोवा वैद्यकीय महाविद्यालयात वेगळ्या खोली उपलब्ध करून द्यावी, अशी मागणीही त्यांनी केली. डेंग्यू म्हणजे मलेरिया नव्हे असे सांगताना डेंग्यूचे निदान होणे अत्यंत गरजेचे आहे. लोकांमध्ये जागृतीची गरज त्यांनी व्यक्त केली. डेंग्यूचा प्रसार झालेली ठिकाणे शोधून काढून तेथे प्रतिबंधात्मक उपाययोजना आखण्याची मागणीही त्यांनी केली.
 

Web Title: Goa MPs approached PM for launching mining business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.