पाय गमावलेल्या ११ वर्षीय मुलाला मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून २५ लाखांची मदत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 14, 2026 12:20 IST2026-05-14T12:18:49+5:302026-05-14T12:20:02+5:30

डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाय गमवावा लागला. सरकारने एक उच्चस्तरीय समिती जाहीर केली.

goa minister vishwajit rane provides 25 lakh assistance to 11 year old boy who lost his leg due to doctor negligence | पाय गमावलेल्या ११ वर्षीय मुलाला मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून २५ लाखांची मदत

पाय गमावलेल्या ११ वर्षीय मुलाला मंत्री विश्वजीत राणे यांच्याकडून २५ लाखांची मदत

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: वाळपई येथील सरकारी रुग्णालयात गौरव सावर्डेकर या ११ वर्षीय मुलाला एक-दोन डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पाय गमवावा लागला. परिणामी सरकारी यंत्रणा आता सावध झाली आहे. बुधवारी सरकारने एक उच्चस्तरीय समिती जाहीर केली.

मेडिकल एसओपीचे पालन होते की नाही हे पाहण्यासाठी आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी डॉक्टरांची समिती अखेर जाहीर केली. दरम्यान, गौरव सावर्डेकर हा मुलगा सत्तरी तालुक्यातील आहे. त्याला पंचवीस लाख रुपयांची मदत आपण आपल्या ट्रस्टमधून देणार आहे, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य सचिव यतिंद्र मरळकर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती काम करेल. समितीमध्ये बांबोळीच्या गोवा वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन असतील. शिवाय गोमेकॉचे वैद्यकीय अधीक्षक राजेश पाटील, आरोग्य खात्याचे उपसंचालक व अन्य अधिकारी असतील. माजी आरोग्य सेवा संचालक राजनंदा देसाई, फ्रेजल आरावजो, गीता देखमुख यांच्यासह डॉक्टर गुरुप्रसाद नाईक व इतरांचा समितीत समावेश असेल, असे मंत्री राणे यांनी सांगितले.

आरोग्य खात्याचे अवर सचिव हे या नव्या समितीचे सदस्य सचिव असतील. राज्यातील सर्व आरोग्य केंद्रांमध्ये व सरकारी इस्पितळांमध्ये मेडिकल एसओपी व प्रक्रिया व्यवस्थित अंमलात आणली जाते की नाही यावर समिती देखरेख ठेवील, असे राणे यांनी सांगितले.

वाळपई रुग्णालयात मुलावर उपचार करताना इस्पितळाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष ठेवले नाही. फॅक्चर झालेल्या मुलाच्या पायावर एमटीएस कर्मचाऱ्यांकरवी प्लास्टर लावले गेले. त्याविषयी देखरेखीचे जे काम डॉक्टरांनी करायला हवे होते ते केले नाही. त्यामुळे वाळपईच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना यापूर्वीच सेवेतून निलंबित केले आहे.

शरीरातील प्रत्येक थेंब सत्तरीच्या लोकांसाठी

दरम्यान, मंत्री राणे म्हणाले की, सत्तरीतील एका मुलाने पाय गमावल्यानंतर आम्ही लगेच चौकशी करून संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्याविरुद्ध कारवाई केली. मी स्वतः अशा विषयांबाबत कारवाईचे पूर्ण स्वातंत्र्य प्रशासनाला देत असतो. शिवाय कुठेच राजकीय हस्तक्षेपही होत नसतो. यापुढेही होऊ नये म्हणून मी डॉक्टरांची समिती स्थापन केली आहे. मी सत्तरी तालुक्यातील प्रत्येक व्यक्तीच्या हिताबाबत कायम दक्ष असतो. यापुढे दक्षच राहीन. माझ्या शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी सत्तरी तालुक्यातील लोकांसाठी वावरेन. शरीरातील रक्ताचा प्रत्येक थेंब हा लोककल्याणासाठी आहे असे राणे म्हणाले.

निष्काळजीपणा खपवून घेणार नाही

आरोग्यमंत्री राणे म्हणाले की, पाय गमावलेल्या गौरवला पंचवीस लाख दिले म्हणजे त्याचे सर्व काही झाले, असा अर्थ होत नाही हे आपल्यालाही कळते. पण निदान मदत म्हणून ही रक्कम दिली जाईल. वैद्यकीय दुर्लक्ष व निष्काळजीपणा झाला. त्याबाबत संबंधितांना निलंबित केले गेले. पण, यापुढे कुठेच अशा प्रकारचा वैद्यकीय निष्काळजीपणा खपवून घेतला जाणार नाही, असे राणे म्हणाले.
 

Web Title : मंत्री राणे ने पैर गंवाने वाले लड़के को ₹25 लाख की सहायता दी।

Web Summary : मंत्री विश्वजीत राणे ने चिकित्सा लापरवाही के कारण पैर गंवाने वाले 11 वर्षीय गौरव सावर्डेकर को अपने ट्रस्ट से ₹25 लाख की सहायता दी। राज्य के अस्पतालों में चिकित्सा एसओपी के पालन की निगरानी के लिए एक उच्च स्तरीय समिति का गठन किया गया है। राणे ने कहा कि लापरवाही बर्दाश्त नहीं की जाएगी।

Web Title : Minister Rane offers ₹25 lakh aid to boy who lost leg.

Web Summary : Minister Vishwajit Rane offered ₹25 lakh from his trust to 11-year-old Gaurav Sawardekar, who lost his leg due to medical negligence. A high-level committee has been formed to oversee medical SOP adherence in state hospitals. Negligence will not be tolerated, Rane stated.