इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2026 12:53 IST2026-05-11T12:52:46+5:302026-05-11T12:53:48+5:30
प्रदूषण नियंत्रण मंडळाची सूचना

इको-फ्रेंडली गणेशमूर्तीच्या विक्रीलाच परवानगी; चित्रशाळांसाठी नोंदणी सक्तीची
Ganesh Chaturthi 2026 Eco Friendly Ganpati Bappa Murti:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने पर्यावरणपूरक गणेशमूर्तीच्या विक्री व वापराबाबत महत्त्वाची सार्वजनिक सूचना जारी केली आहे. प्रदूषण मंडळाने स्पष्ट केले आहे की, चिकणमाती, माती किंवा शाडू मातीपासून तयार केलेल्या आणि प्लास्टर ऑफ पॅरिस (पीओपी) चे प्रमाण २० टक्क्यांपेक्षा कमी असलेल्या मूर्तीनाच विक्री व वापरास परवानगी दिली जाईल.
मूर्ती जलआधारित, जैवविघटनशील तसेच बिनविषारी नैसर्गिक रंगांनी रंगविलेल्या असणे बंधनकारक आहे. उत्पादन, आयात, प्रदर्शन आणि विक्रीसाठी या सर्व निकषांचे पालन करणे आवश्यक ठरणार आहे. यासाठी मंडळाने विशेष ऑनलाइन पोर्टल उपलब्ध करून दिले असून, २०२६ सालासाठी गणेशमूर्तीची विक्री किंवा आयात करू इच्छिणाऱ्या विक्रेते आणि चित्रशाळांसाठी नोंदणी अनिवार्य करण्यात आली आहे. ही प्रक्रिया १५ जुलै २०२६ पर्यंत सुरू राहणार आहे.
नोंदणीदरम्यान हमीपत्र अपलोड करणे बंधनकारक असून, त्यामध्ये मूर्ती पर्यावरणपूरक साहित्यापासून तयार केल्याची, तसेच पीओपीचे प्रमाण मर्यादेत असल्याची खात्री द्यावी लागणार आहे. पर्यावरण संरक्षण कायदा १९८६ अंतर्गत जारी करण्यात आलेल्या या निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन मंडळाने केले आहे.