सिझेरियन प्रसूतीनंतर तिसऱ्या मातेचाही मृत्यू, जिल्ह्यात आठ दिवसांत तिघींनी गमावला जीव

By ऑनलाइन लोकमत | Published: October 5, 2023 10:56 AM2023-10-05T10:56:38+5:302023-10-05T10:57:31+5:30

कधी थांबणार आक्रोश : आरोग्य सुविधांचा प्रश्न ऐरणीवर

Third mother also dies after caesarean delivery, three women lost their lives in eight days in the district | सिझेरियन प्रसूतीनंतर तिसऱ्या मातेचाही मृत्यू, जिल्ह्यात आठ दिवसांत तिघींनी गमावला जीव

सिझेरियन प्रसूतीनंतर तिसऱ्या मातेचाही मृत्यू, जिल्ह्यात आठ दिवसांत तिघींनी गमावला जीव

googlenewsNext

गडचिरोली : राज्यात शासकीय रुग्णालयांत मृत्यूसत्र सुरू असताना जिल्ह्यातही याहून वेगळी स्थिती नाही. सिझेरियन प्रसूतीनंतर दोन मातांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असताना प्रकृती गंभीर झालेल्या तिसऱ्या महिलेनेही ३ ऑक्टोबरला रात्री प्राण सोडले. आठवड्यात तीन माता मृत्यूने आरोग्य विभागाचा कारभार चव्हाट्यावर आला आहे.

वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) असे मृत मातेचे नाव असून तिची मुलगी सुखरूप आहे. नागपूर येथे वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. २४ सप्टेंबरला महिला व बाल रुग्णालयात रजनी प्रकाश शेडमाके (२३, रा. भानसी, ता. सावली, जि. चंद्रपूर), उज्ज्वला नरेश बुरे (२२, रा. मुरखळा चक, ता. चामोर्शी ह. मु. इंदिरानगर, गडचिरोली) व वैशाली सत्यवान मेश्राम (२४, रा. आष्टी) या तिघी प्रसववेदना जाणवू लागल्याने शहरातील महिला व बाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्या. तपासणीनंतर दुसऱ्या दिवशी तिघींची शस्त्रक्रियेद्वारे (सिझेरियन) प्रसूती करण्यात आली. मात्र, रजनी शेडमाके हिला ताप, दमा आणि श्वसनाचा त्रास होऊ लागला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला ताप आणि अतिसाराची लागण झाली.

प्रकृती खालावल्याने २७ सप्टेंबरला दोघींनाही जिल्हा व सामान्य रुग्णालयात हलविले, परंतु संध्याकाळी रजनी शेडमाके हिचा उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर उज्ज्वला बुरे आणि वैशाली मेश्राम हिला नागपूरला हलविण्याचा निर्णय घेतला, पण उज्ज्वलाचा वाटेतच मृत्यू झाला. नागपूर येथे उपचार सुरू असताना वैशालीचा ३ ऑक्टोबरच्या रात्री मृत्यू झाला. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून आरोग्य विभागाबद्दल रोष वाढत आहे.

तीन चिमुरडे मातृप्रेमाला पोरकी

दरम्यान, तिन्ही मातांची मुले सुखरूप आहेत, परंतु जन्मत:च आई जग सोडून गेल्याने या इवल्याशा जीवांवर मातृप्रेमाला पोरके होण्याची दुर्दैवी वेळ ओढवली आहे. त्यामुळे नातेवाईक शोकमग्न असून हळहळ व्यक्त केली जात आहे.

अद्याप कोणावरही कारवाई नाही

दरम्यान, एकाच आठवड्यात तीन मातांचा मृत्यू झाल्याने जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणेचे अपयश समोर आले आहे. मातामृत्यूनंतर कारणमीमांसा शोधण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सतीशकुमार सोळंके यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमून डेथ ऑडिट केले जाणार आहे, परंतु अद्याप कोणावरही कारवाई झालेली नाही. त्यामुळे सगळा कारभार आलबेल आहे, तर मृत्यूसत्र कसे, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

तिन्ही महिलांवर तातडीने सिझेरियन शस्त्रक्रिया केली, त्यामुळे उपचारात हलगर्जीपणा झाला, असे म्हणता येणार नाही.अनेकदा रुग्णाची प्रतिकारशक्ती देखील महत्त्वाची असते. या तिन्ही मातांची प्रकृती अचानक खालावली, दुर्दैवाने त्यांचा मृत्यू झाला. मात्र, रुग्णांचा जीव वाचावा, यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केलेले आहेत.

- डॉ. प्रमोद खंडाते, जिल्हा शल्यचिकित्सक

Web Title: Third mother also dies after caesarean delivery, three women lost their lives in eight days in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.