पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2026 15:03 IST2026-04-23T15:01:34+5:302026-04-23T15:03:30+5:30

सागर गणपत मडावी असे तरुणाचे नाव असून माओवाद्यांशी लढताना गणपत मडावी यांना वीरमरण आले होते.

Slain soldier's son duped of Rs 2 crore; property lost, mother dies in gadchiroli | पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक

पैसा, घर गेले, मातृछत्रही हरवले; 'त्या' शहीदपुत्राची हृदयद्रावक गोष्ट, नोकरीसाठी २ कोटींची फसवणूक

गडचिरोली - उपजिल्हाधिकारीपदाची नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या पुण्यातील पाच जणांच्या टोळीचे नवनवे कारनामे समोर येत असून एका शहीदपुत्रावर काळजाला चरे पाडणारा प्रसंग बेतला आहे.

ज्या जवानाने जंगलात माओवाद्यांच्या गोळ्या अंगावर झेलल्या, ज्याच्या बलिदानाने या मातीचा सन्मान वाढला, त्याच शहीदपुत्राला या टोळीने आपले सावज बनविले, त्यामुळे उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न तर भंगलेच, पण पैसा, प्लॉट, घरही गेले. शिवाय या धक्क्यात आईने मरण कवटाळले. सागर गणपत मडावी (२७, रा. दुर्गानगर) असे तरुणाचे नाव असून माओवाद्यांशी लढताना गणपत मडावी यांना वीरमरण आले होते. त्यांचा मुलगा सागर याला पित्यासारखेच अधिकारी होऊन जनतेची सेवा करायची होती.

विवंचनेत शहीद पत्नीची आत्महत्या 

शहीद पत्नी मीनाबाई यांना देशोधडीला लागल्याचे समजले, तेव्हा त्यांचा धीर खचला. दोन कोटींहून अधिक रक्कम देऊनही राहते छप्परही हिरावले गेले. या विवंचनेत त्यांनी आत्महत्या केली.

पित्याच्या बलिदानानंतर मिळालेली पुंजीही विकली

पुण्यात स्पर्धा परीक्षेची तयारी करत असताना त्याची गाठ ज्ञानेश्वर वरे याच्याशी पडली. मंत्रालयात माझी मोठी सेटिंग आहे, तुला उपजिल्हाधिकारी बनवतो, असे आमिष वरेने दाखवले. बहीण-भावालाही नोकरी लावण्याचे वचन देऊन पैसे उकळले. पित्याच्या बलिदानानंतर मिळालेली पुंजी, दागिने, गडचिरोली-एटापल्लीतील मोक्याचे प्लॉट्स आणि राहते घरही विकले.

मंत्रालयातील 'तो' बडा अधिकारी कोण?

मुख्य आरोपी ज्ञानेश्वर वरे (रा. वरोडी, ता. भोर, जि. पुणे) याला अटक केली असून, न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर चार जण फरार आहेत. 'महाजन' नावाचा व्यक्ती स्वतःला मंत्रालयातील उच्चपदस्थ अधिकारी असल्याचे सांगायचा. वरे आणि त्याच्या साथीदारांनी हा बनाव रचला होता.
 

Web Title : शहीद के बेटे के साथ नौकरी, घर और माँ के जीवन की धोखाधड़ी।

Web Summary : एक शहीद के बेटे को सरकारी नौकरी का वादा करके धोखेबाजों ने उसके पैसे, घर और नौकरी की संभावनाओं से धोखा दिया। तनाव के कारण उसकी माँ ने आत्महत्या कर ली। उसने अपने पिता की बचत सहित सब कुछ खो दिया।

Web Title : Martyr's son defrauded of job, home, and mother's life.

Web Summary : A martyr's son was cheated of his money, home, and job prospects by fraudsters promising a government position. The stress led to his mother's suicide. He lost everything, including his father's savings.