सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 06:00 AM2019-08-26T06:00:00+5:302019-08-26T06:00:26+5:30

सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल.

Just waiting for the bus depot to Sironcha | सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच

सिरोंचाला बस डेपोची प्रतीक्षाच

Next
ठळक मुद्देअनेक वर्षांपासूनची मागणी प्रलंबित : समारंभ व प्रवासासाठी नागरिकांना अडचण

नागभूषणम चकीनारपुवार।
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : ब्रिटिशकालीन जिल्हास्तर, ऐतिहासिक वारसा लाभलेले ठिकाण तसेच सर्वात जुने तालुका मुख्यालय अशी सिरोंचाची ओळख आहे. एवढा वारसा लाभलेले शहर बसडेपोअभावी अपेक्षितच आहे. सिरोंचा येथे बसडेपोची निर्मिती केव्हा होणार याची तालुक्यातील नागरिकांना अनेक दिवसांपासून अद्यापही प्रतीक्षा आहे.
सिरोंचा तालुक्यातील गोदावरी व प्राणहिता नद्यांवर पुलाचे बांधकाम झाल्यामुळे तेलंगणा राज्याची सीमा जुळली. तसेच पातागुडम जवळील इंद्रावती नदीवरही पुलाचे बांधकाम निम्म्यापेक्षा अधिक झाल्याने पुढील वर्षीपर्यंत छत्तीसगड राज्याची सीमादेखील जोडली जाईल. सिरोंचा तालुका मुख्यालय तेलंगणा, छत्तीसगड राज्यासाठी मध्यवर्ती ठिकाण होईल. त्यामुळे येथे बसडेपोची आवश्यकता आहे. तालुक्यात १४८ गावे आहेत. मुख्यालयी अनेक शासकीय कार्यालये, बँका आहेत. दररोज हजारो नागरिकांचे आवागमन शहरात असते. परंतु जिल्ह्यात गडचिरोली व अहेरी या दोनच ठिकाणी बसडेपो आहे. अहेरी ते सिरोंचा हे अंतर ११० किमी आहे. तसेच गडचिरोलीपर्यंत हे अंतर २२० किमी आहे. त्यामुळे सिरोंचासाठी वेळीच बसगाड्या उपलब्ध होत नाही.
सिरोंचा तालुका नक्षलग्रस्त, अतिदुर्गम, जंगलव्याप्त असल्याने दुर्गम भागातील विद्यार्थ्यांना तालुका मुख्यालयी शिक्षण घेण्यासाठी येताना अडचणी येतात. वेळीच बसेस उपलब्ध होत नाही. परिणामी विद्यार्थ्यांना नाहक त्रास सहन करावा लागतो. तसेच तालुक्यातील नागरिकांना लग्न समारंभ, अन्य कार्यक्रमांसाठी बसेसची आवश्यकता असल्यास अहेरी डेपोमध्ये जावे लागते. येथे बस उपलब्ध झाल्यास सोयीचे ठरते. परंतु अनेकदा बसेस उपलब्ध होत नाही. बस उपलब्ध होऊनही संबंधित नागरिकांना अतिरिक्त भाड द्यावे लागते. तालुका मुख्यालयापासून प्राणहिता पुलामार्गे मंचेरिअल जिल्हा ७० किमी अंतरावर आहे. गोदावरील पूल कालेश्वरमार्गे जयशंकर भोलापल्ली जिल्हाही ७० किमी अंतरावर आहे. दोन्ही जिल्ह्यात तेलंगणा राज्याचे बसडेपो आहेत. परंतु सिरोंचा येथे बसडेपो नसल्याने नागरिकांना बसेससाठी प्रचंड त्रास सहन करावा लागतो.

प्रेक्षणीय स्थळांमुळे पर्यटकांची गर्दी
सिरोंचा तालुक्यात त्रिवेणी संगम, तेलंगणा राज्यात कालेश्वरम देवस्थान आहे. तालुक्यातील वडधम जवळील ज्युरासिस पार्क प्रसिद्ध आहे. पोचमपल्लीजवळील गोदावरी नदीवरील मेडिगड्डा बॅरेज, नदीपात्रातील कालवा यासह विविध पे्रक्षणीय स्थळे आहेत. या स्थळांना अनेक पर्यटक भेटी देतात. त्यामुळे पर्यटकांची संख्या वाढली आहे. त्यादृष्टीने बसडेपो आवश्यक आहे.विशेष म्हणजे शिवसेनेचे सत्यनारायण बुर्रावार यांनी मंत्रालयापर्यंत पत्रव्यवहार करून पाठपुरावा केला तरीपण या मागणीकडे दुर्लक्षच झाले.

Web Title: Just waiting for the bus depot to Sironcha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.