जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ

By Admin | Updated: August 18, 2016 01:35 IST2016-08-18T01:35:53+5:302016-08-18T01:35:53+5:30

केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे.

Fierce inflation of essential commodities | जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ

जीवनावश्यक वस्तूंची भरमसाठ भाववाढ

अन्नधान्य, किराणा साहित्य महागले : गृहिणींचे आर्थिक बजेट कोलमडले
गडचिरोली : केंद्र शासनाने गेल्या दोन महिन्यात अन्नधान्य, किराणा व इतर जीवनावश्यक वस्तूंची प्रचंड भाववाढ केली आहे. तेल, साखर, मैदा, रवा, पोहे, चनाडाळ, गहू, आटा आदींसह स्वयंपाकघरात दैनंदिन लागणाऱ्या वस्तूंची भाववाढ केली आहे. याशिवाय भाजीपाल्यांचेही दर प्रचंड वधारले आहेत. महागाईचा भडका उडाल्याने सर्वसामान्य नागरिक चिंताग्रस्त झाले आहेत. तसेच भाववाढीमुळे गृहिणींचेही आर्थिक बजेट पूर्णत: कोलमडले आहे. महागाईने सारेच लोक त्रस्त आहेत.

दिवसेंदिवस जीवनावश्यक वस्तू व भाजीपाल्यांच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. शासनाचा गलेलठ्ठ पगार असलेल्या नोकरदारांना महागड्या जीवनावश्यक वस्तू खरेदी करणे सहज सुलभ आहे. मात्र शेती व मोलमजुरी करणाऱ्या महिला तसेच खासगी कंत्राटी कर्मचाऱ्यांना भाववाढीचा प्रचंड फटका बसत आहे. गेल्या दोन ते तीन वर्षात जीवनावश्यक वस्तूंच्या दरात मोठ्या फरकाने वाढ झाली आहे. दोन ते तीन वर्षांपूर्वी पती-पत्नी, मुलगा व मुलगी असलेल्या एका लहान कुटुंबाला महिन्याकाठी दोन हजार रूपयांचा किराणा साहित्य पुरेसे होते. मात्र आता लहानशा कुटुंबाच्याही किराणा साहित्याला महिन्याकाठी ३ हजार ५०० ते ४ हजार रूपये मोजावे लागत आहे.
जीवनावश्यक वस्तूंबरोबरच पेट्रोल, डिझेल, गॅस, कपडे, भांडे आदींसह चैनीच्या व मौल्यवान वस्तूंची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यामुळे महागड्या चैनीच्या व मौल्यवान वस्तू खरेदी करण्यासाठी धनाढ्य कुटुंबाचा कल आहे. सर्वसामान्य नागरिक या वस्तू खरेदी करताना दिसून येत नसल्याचे चित्र आहे. तसे गडचिरोलीतील काही व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना सांगितले. प्रत्येक वस्तूंची भाववाढ झाल्याने शासनाच्या धोरणाबाबत नागरिक प्रचंड नाराज आहेत. (स्थानिक प्रतिनिधी)

 

Web Title: Fierce inflation of essential commodities