कुरखेडात गांजाची शेती उघडकीस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 23:35 IST2021-03-25T05:00:00+5:302021-03-24T23:35:01+5:30

कुरखेडापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी शेतशिवारात प्रतिबंधित असलेल्या गांजा या अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहीती कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देठे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात छापा मारण्यात आला.

Cannabis cultivation exposed in Kurkheda | कुरखेडात गांजाची शेती उघडकीस

कुरखेडात गांजाची शेती उघडकीस

लाेकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : येथून वाकडी मार्गावरील एका शेतात चक्क गांजाची शेती केली जात असल्याचा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी त्या शेतात छापा मारून केलेल्या कारवाईत तब्बल ५२ किलो ९०० ग्रॅम गांजा जप्त केला. या गांजाची किंमत २ लाख ६५ हजार रुपये आहे. या कारवाईत तीन आरोपींना अटक करण्यात आली. सदर कारवाई मंगळवारी सायंकाळी करण्यात आली. 
कुरखेडापासून २ किलोमीटर अंतरावर असलेल्या वाकडी शेतशिवारात प्रतिबंधित असलेल्या गांजा या अमली पदार्थाच्या वनस्पतीची लागवड करण्यात आल्याची गोपनीय माहीती कुरखेडाचे ठाणेदार सुधाकर देठे यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेखर आणि कुरखेडाचे उपविभागीय पोलीस अधिकारी जयदत्त भवर यांच्या मार्गदर्शनात छापा मारण्यात आला. यावेळी कुंडलिक मुंगसू कसारे (६५) रा.आझाद वार्ड, कुरखेडा यांच्या शेतात हिरवट आणि उग्र वास येणाऱ्या गांजा या वनस्पतीची बेकायदेशीर विक्री करण्याच्या उद्देशाने लागवड केली असल्याचे दिसून आले. याचवेळी तो गांजा विक्रीसाठी घेऊन जाण्यासाठी आलेले सौरव संतोष डहाळे (२०) आणि रितिक राधेश्याम मच्छिरके (रा.चिखली, ता.कुरखेडा) हे सुद्धा तिथे होते. या तिन्ही आरोपींकडून ५२ किलो ९०० ग्रॅम ओला गांजा जप्त करण्यात आला. त्याची बाजारभावानुसार किंमत २ लाख ६४ हजार ५०० रुपये आहे. तसेच आरोपीकडील एक दुचाकी (किंमत २५ हजार) जप्त करण्यात आली.
तीनही आरोपींविरूद्ध गुंगीकारक औषधी द्रव्य व मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम (एनडीपीएस)१९८५ चे कलम ८(क)(२०) ब, क, २२(क) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. बुधवारी कुरखेडाचे न्यायालय कोरचीत जात असल्यामुळे सदर आरोपींना कोरचीला नेऊन न्यायालयापुढे हजर करण्यात आले. त्यात तिघांनाही पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला.
ही कारवाई ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे, हवालदार बळीराम पदा, मनोहर पुराम, मानकर, बारसागडे, पोलीस शिपाई व कर्मचाऱ्यांनी केली.

 

अलिकडची पहिलीच कारवाई
जिल्ह्याच्या काही भागात छुप्या मार्गाने तेलंगणाकडून गांजा येतो, पण जिल्ह्यात गांजाची शेती करण्याची हिंमत अलिकडे कोणी केलेली नव्हती. त्यामुळे अशा पद्धतीने शेतातून हिरवा गांजा जप्त करण्याची ही अलिकडच्या काही वर्षातील पहिलीच कारवाई ठरली आहे. हा गांजा नेमका कोणाला विक्री केला जात होता, त्यांचे जाळे कुठे-कुठे पसरले आहे हे पुढील तपासात सत्य उजेडात येऊ शकते. विदर्भाच्या काही जिल्ह्यात दुर्गम भागात गांजाची शेती केली जाण्याची शक्यता आहे. मात्र याची माहिती अजून मिळाली नाही.

 

Web Title: Cannabis cultivation exposed in Kurkheda