भामरागड-लाहेरी मार्गावर पुलाचे काम अर्धवट

By Admin | Updated: June 7, 2015 01:58 IST2015-06-07T01:58:20+5:302015-06-07T01:58:20+5:30

भामरागड-लाहेरी मार्गावर तीन ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या जागांवर डायव्हर्सन रस्ता काढून देण्यात आला आहे.

Bridge work on Bhamragad-Laheri road half | भामरागड-लाहेरी मार्गावर पुलाचे काम अर्धवट

भामरागड-लाहेरी मार्गावर पुलाचे काम अर्धवट

वाहतूक बंद होण्याची शक्यता : २५ दिवसांपासून काम बंद
भामरागड : भामरागड-लाहेरी मार्गावर तीन ठिकाणी पुलाचे बांधकाम सुरू करण्यात आले आहे. या जागांवर डायव्हर्सन रस्ता काढून देण्यात आला आहे. मात्र मागील २५ दिवसांपासून हे काम ठप्प आहे. अलिकडेच पाऊस झाल्याने डायव्हर्सनचे रस्ते खराब झाले असून वाहतूक बंद होण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.
भामरागड-लाहेरी मार्गावर धोडराज पोलीस चौकी व आणखी दोन ठिकाणी पुलाचे काम गरज नसतानाही पावसाळ्याच्या तोंडावर सुरू करण्यात आले. कंत्राटदाराने मागील २५ दिवसांपासून हे काम बंद केले आहे. जागोजागी खोदकाम करून ठेवले असल्यामुळे वाहतुकीला प्रचंड अडथळा निर्माण होत आहे. येथे राहणाऱ्या शासकीय कर्मचारी व नागरिकांना यामुळे त्रास होत असून हे काम बंद पडल्यामुळे आता राज्य परिवहन महामंडळाची बससेवाही ठप्प होण्याची शक्यता आहे.
खासगी वाहतुकीचे अनेक वाहने येथे पाऊस आल्याने फसल्याच्याही घटना घडल्या आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने यासंदर्भात तत्काळ लक्ष देऊन हे काम पूर्ण करावे, अशी या भागातील नागरिकांची मागणी आहे.
यासंदर्भात खा. अशोक नेते यांनाही माहिती देण्यात आली असून त्यांनी यासंदर्भात बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोलतो, असे लोकमतला सांगितले. घरापासून दूर राहून दुर्गम भागात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना सुविधा देण्याऐवजी शासन विकास कामाच्या नावावर त्रास देण्याची भूमिका घेत आहे. हा प्रकार संतापजनक असल्याचे येथील कर्मचारी व नागरिक यांचे म्हणणे आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Bridge work on Bhamragad-Laheri road half