महिनाभरात २१ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

By Admin | Updated: July 9, 2015 01:48 IST2015-07-09T01:48:03+5:302015-07-09T01:48:03+5:30

जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विशेष दारूबंदी पथकाने एप्रिल महिन्यापासून ...

An amount of 21 lakh 43 thousand seized during the month | महिनाभरात २१ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

महिनाभरात २१ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त

गडचिरोली : जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गठित करण्यात आलेल्या विशेष दारूबंदी पथकाने एप्रिल महिन्यापासून अवैध दारूविक्रेत्यांच्या विरोधात धडक मोहीम सुरू करून करोडो रूपयांची दारू व मुद्देमाल जप्त केला आहे. जून महिन्यात पथकाने जिल्ह्याच्या विविध भागात धाडसत्र राबवून एकूण २१ लाख ४३ हजार ८३० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ४० कारवायांमध्ये ११० दारूविक्रेत्या आरोपींवर मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. दारूबंदी पथकाने जून महिन्यात चार दुचाकी वाहने, एक चारचाकी व तीन लाकडी डोंगे आरोपींकडून जप्त केले आहेत, हे विशेष.
विशेष दारूबंदी पथकाने १ जून रोजी गडचिरोली पोलीस ठाण्याअंतर्गत येवली येथे धाड टाकून एका आरोपींकडून १० हजार ९० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ३ जून रोजी पुराडा उपपोलीस ठाण्याअंतर्गत मालेवाडा येथे धाड टाकून दोन आरोपींकडून ६२ हजार ४९०, ४ जून रोजी गडचिरोली पोलीस ठाण्याअंतर्गत येवली येथे धाड टाकून दोन आरोपींकडून २५ हजार ६४०, तसेच ५ जून रोजी मुलचेरा पोलीस ठाण्याअंतर्गत चंदनवेली येथे अवैध दारूविक्रीसंदर्भात तीन कारवाया केल्या. यात आठ आरोपींना अटक करून एकूण १ लाख ४८ हजारांची दारू जप्त केली. ६ जून रोजी गोकुलनगर व येवली येथे धाड टाकून चार आरोपींकडून एकूण ७५ हजार ९५० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. ७ जून रोजी वैरागड येथून एका आरोपींकडून २५ हजार २९५ रूपयांची दारू जप्त केली. ८ जून रोजी सिरोंचा येथील एका आरोपीकडून १४ हजार ४०० तर ९ जून रोजी पुराडा उपपोलीस ठाण्याअंतर्गत सोनसरी, सावरगाव, येंगलखेडा आदी ठिकाणी धाड टाकून सात आरोपींकडून ९१ हजार रूपयांची तसेच याच तारखेला धानोरा येथे धाड टाकून तीन आरोपींकडून २ लाख ३८ हजार ४०० रूपयांची दारू जप्त केली. ११ जून रोजी देसाईगंज येथून एका आरोपींकडून ३ हजार ४१७, १२ जून रोजी कालिनगर येथे धाड टाकून पाच आरोपींकडून ६७ हजार ८०० रूपयांची दारू जप्त केली.
१३ जून रोजी आरमोरी येथून चार आरोपींकडून ८० हजार ३८०, १५ जून रोजी देसाईगंज येथून दोन आरोपींकडून ६ हजार ९३३ रूपयांची दारू जप्त केली. १७ जून रोजी पथकाने देसाईगंज तालुक्यात पाच कारवाया केल्या. एकलपूर, कुरूड, कोंढाळा, विसोरा येथे धाड टाकून एकूण २३ आरोपींकडून ६ लाख ४१ हजार ३७० रूपयांचा मुद्देमाल जप्त केला. १८ जून रोजी चपराळा नदीघाटावरून सात आरोपींकडून तीन डोंग्यांसह एकूण साडेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त केला. १९ जून रोजी गडचिरोली येथूून एका आरोपीकडून सहा हजारांची तर २१ जून रोजी कुनघाडा, चामोर्शी, आरमोरी येथून आठ आरोपींकडून ५१ हजार रूपयांची दारू जप्त केली.

Web Title: An amount of 21 lakh 43 thousand seized during the month