पशुसंवर्धन विभागात १८ पदे रिक्त

By Admin | Updated: July 26, 2015 02:43 IST2015-07-26T02:43:23+5:302015-07-26T02:43:23+5:30

तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागात एकूण ४५ पदे मंजूर आहेत. परंतु सद्य:स्थितीत एकूण पदांपैकी १८ पदे रिक्त असल्याने जनावरांवर ...

18 posts vacant in Animal Husbandry Department | पशुसंवर्धन विभागात १८ पदे रिक्त

पशुसंवर्धन विभागात १८ पदे रिक्त

एटापल्ली : तालुक्याच्या पशुसंवर्धन विभागात एकूण ४५ पदे मंजूर आहेत. परंतु सद्य:स्थितीत एकूण पदांपैकी १८ पदे रिक्त असल्याने जनावरांवर वेळीच औषधोपचार करण्याच्या कामात हयगय होत असल्याने पशुधन आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे.
तालुक्यातील पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध संवर्गाची पदे रिक्त असल्याने याचा परिणाम पशुवैद्यकीय सेवेवर होत आहे. अनेक पशुवैद्यकीय सेवेतील कर्मचारी मुख्यालयी राहत नाही. तालुका मुख्यालयातून कर्तव्यस्थळी ये- जा करतात. त्यामुळे अनेक पशुपालक जनावरांना दवाखान्यात घेऊन गेले असता त्यांच्यावर उपचार होऊ शकत नाही.
गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना मागील दोन महिन्यांपासून बंद आहे. या दवाखान्यात पशुधन विकास अधिकाऱ्यांसह मंजूर असलेली तिन्ही पदे रिक्त असल्याने आरोग्य सेवेवर परिणाम होत आहे. या दवाखान्यांतर्गत २० पेक्षा अधिक गावांचा समावेश आहे. त्यामुळे परिसरातील अनेक पशुपालक २५ किमीची पायपीट करून एटापल्ली येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात उपचारार्थ आणत आहेत.
दुर्गम भागात वाहतुकीची साधने उपलब्ध नसल्याने पशुपालकांना पायदळीच जनावरांना दवाखान्यात घेऊन जावे लागत आहे. त्यामुळे गेदा येथील पशुवैद्यकीय दवाखाना सुरू करण्यात यावा, अशी मागणी सरपंच हरीश पदा, उपसरपंच केशव कुळयेटी, ग्रा. पं. सदस्य रमेश वैरागडे, गुरूदास वैरागडे, शंकू भांडेकर, मधुकर पदा, किशोर सोमनकर, अविनाश सुरजागडे, वसंत भांडेकर, दीपक भांडेकर यांनी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: 18 posts vacant in Animal Husbandry Department