आपल्या आवडत्या काजू कतली मिठाईचा आविष्कार कसा झाला, खातात सगळेच पण माहीत नसेल कुणाला इतिहास
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2026 12:44 IST2026-04-25T12:44:12+5:302026-04-25T12:44:51+5:30
Kaju Katli History : आपण जी काजू कतली मिठाई खाता तिचा आविष्कार कसा झाला माहिती आहे का? कदाचित बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.

आपल्या आवडत्या काजू कतली मिठाईचा आविष्कार कसा झाला, खातात सगळेच पण माहीत नसेल कुणाला इतिहास
Kaju Katli History : सणासुदीचे दिवस आले की, चांदीच्या वर्खाने सजलेली काजू कतली घराघरांमध्ये आणली जाते आणि आवडीने खाल्ली सुद्धा जाते. दिवाळी, दसरा, गुढी पाडवा कोणताही सण असो काजू कतली ही मिठाई खायला मिळतेच मिळते. वेगवेगळ्या ऑफिसेसमध्ये जेव्हा गिफ्ट दिलं जातं तर त्यातही काजू कतली असते. हेच काय कुणाच्या घरी काही आनंदी बाब घडली तरी काजू कतली वाटून तोंड गोड केलं जातं. आपल्याही नक्कीच काजू कतली आवडत असेल. आवडत असेल काय...लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना काजू कतली आवडते. पण आपण जी काजू कतली मिठाई खाता तिचा आविष्कार कसा झाला माहिती आहे का? कदाचित बऱ्याच लोकांना याचं उत्तर माहीत नसेल. आज आपण तेच जाणून घेणार आहोत.
आपल्याला विश्वास बसणार नाही की, आज स्टेटस सिम्बॉल बनलेल्या मिठाईचा आविष्कार एखाद्या आलिशान महालात किंवा प्रसिद्ध हलवाईच्या दुकानात झाली नव्हती. काजू कतलीच्या उगमाबाबत अनेक कथा सांगितल्या जातात, त्यापैकी सर्वात प्रसिद्ध कथा मुघल काळाशी आणि ग्वालियर किल्ल्याशी जोडलेली आहे. जी फारच रोचक आहे.
मुघल काळातील कथा
काजू कतलीचा इतिहास साधारण 400 वर्षांपूर्वीचा मानला जातो, जो जहांगीर यांच्या कारकिर्दीशी आणि ग्वालिअर किल्ल्याशी संबंधित आहे. 1617 ते 1619 दरम्यान, गुरू हरगोविंद साबेह आणि 52 हिंदू राजे या किल्ल्यात नजरकैदेत होते. त्या काळात गुरु हरगोविंद साहेबांनी कैद्यांची परिस्थिती सुधारण्यासाठी आणि त्यांना आत्मनिर्भर बनवण्यासाठी मोठे योगदान दिले.
सुटकेनंतरचा गोड सन्मान
गुरुंच्या या सेवाभावाने खूश होऊन जहांगीर यांनी त्यांची आणि इतर राजांची सुटका करण्याचा आदेश दिला. या ऐतिहासिक प्रसंगाच्या आनंदासाठी शाही स्वयंपाक्याने काजू वाटून एक खास गोड पदार्थ तयार केला, जो पुढे “काजू कतली” म्हणून प्रसिद्ध झाला.
पोर्तुगाल काजू, भारतीय चव
आपल्यापैकी अनेकांना हे माहीत नसेल की, काजू भारतात मूळचे नव्हते. ते ब्राझीलमधून पोर्तुगाल लोकांनी 16व्या शतकात गोव्यात आणले. सुरुवातीला या काजूच्या झाडांचा वापर माती टिकून रहावी, ती वाहून जाऊ नये यासाठी केला जात होता. पण नंतर भारतीय स्वयंपाक्यांनी त्याचा वापर मिठाईत सुरू केला, वेगवेगळ्या पदार्थांमध्ये सुरू केला.
काजू कतली ही फक्त मिठाई नाही, तर इतिहास, संस्कृती आणि विविध परंपरांचा संगम आहे. पोर्तुगालचा काजू, मुघलांचा शाही टच आणि भारतीय स्वयंपाक कलेचा उत्कृष्ट नमुना आहे.