गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2020 08:33 AM2020-01-23T08:33:18+5:302020-01-23T08:48:32+5:30

३९ दिवसांपासून गंगेकाठी बसलेल्या या भारतीय ‘ग्रेटा’ची ना राज्य शासनाने दखल घेतली ना केंद्राने.  

sadhvi padmavati sit on hunger strike for ganga protection in haridwar matri sadan | गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष!

गंगेसाठी ३९ दिवसांपासून उपोषण करणाऱ्या भारतीय ‘ग्रेटा’कडे दुर्लक्ष!

googlenewsNext
ठळक मुद्देभारताची राष्ट्रीय नदी आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या गंगा नदीच्या अस्तित्वासाठी बिहारमधील नालंदा येथील २३ वर्षीय साध्वी पद्मावतीचं उपोषण. ३९ दिवसांपासून गंगेकाठी बसलेल्या या भारतीय ‘ग्रेटा’ची ना राज्य शासनाने दखल घेतली ना केंद्राने.  केंद्र शासनाकडून गंगा शुध्दीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत.

जळगाव - भारताची राष्ट्रीय नदी आणि अध्यात्मिक महत्व असलेल्या गंगा नदीच्या अस्तित्वासाठी बिहारमधील नालंदा येथील २३ वर्षीय साध्वी पद्मावतीने १५ डिसेंबरपासून हरिव्दार येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ३९ दिवसांपासून गंगेकाठी बसलेल्या या भारतीय ‘ग्रेटा’ची ना राज्य शासनाने दखल घेतली ना केंद्राने.  

केंद्र शासनाकडून गंगा शुध्दीकरणासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहेत. मात्र मूळ प्रश्न बाजूलाच राहिल्याने आयआयटी कानपूरचे प्रोफेसर ८६ वर्षीय प्रा.जी.डी.अग्रवाल यांनी गंगेसाठी लढा सुरू केला. हरिद्वार येथे १११ दिवस उपोषण केले आणि वर्षभरापूर्वी अग्रवाल यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचे बलीदान व्यर्थ जाणार नाही हाच उद्देश ठेवून साध्वी पद्मावतीने गंगा नदीसाठीचा त्यांचा लढा आपल्या हाती घेतला आहे. बिहारमधील नालंदा येथील पद्मावतीने नालंदा विद्यापीठातून तत्वज्ञानाची पदवी प्राप्त केली आहे. ती गेल्या काही वर्षांपासून पर्यावरण व गंगेसाठी काम करत आहे. प्रा.जी.डी.अग्रवाल यांच्यापासून प्रेरणा घेऊन त्यांचा लढा पुढे नेण्यासाठी १५ डिसेंबरपासून पद्मावतीने हरिव्दार येथील मातृसदन येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे. ३९ दिवसांपासून ती केवळ पाण्यावर दिवस काढत आहे. केंद्र शासन मागण्या मान्य करीत नाही, तोपर्यंत हा लढा सुरू ठेवण्याचा संकल्प तिने केला आहे. २९ जानेवारीपर्यंत हे उपोषण सुरू राहणार आहे. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी पटना येथे होणाऱ्या संमेलनात ती सहभागी होणार आहे. पुढे दिल्ली येथे गंगा नदीसाठीच्या या लढ्याला  मोठे स्वरुप देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. 

भविष्यासाठी ‘गंगा’ वाचविणे गरजेचे 

गंगा नदीचे आपल्या शास्त्रांमध्ये अनन्य साधारण महत्व आहे. संपुर्ण भारतीयांसाठी पवित्र असणारी गंगा गेल्या काही वर्षांपासून प्रदुषणामुळे अपवित्र होत आहे. हिमालयातून वाहणाऱ्या नद्यांचा प्रवाह थांबविल्यामुळे भविष्यात मोठी समस्या निर्माण होऊ शकते. त्यामुळे गंगेच्या अस्तित्वासाठी, सुरक्षा व भविष्यासाठी हे उपोषण सुरू आहे. आता जर आपण गंभीर नाही झालो तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. 

- साध्वी पद्मावती.

ग्रेटा ‘ग्रेट’ ठरते, पद्मावती का नाही?

स्वीडनची १६ वर्षीय ग्रेटा थनबर्ग ही युवती एक तासाचा व्हिडिओ बनवते आणि जगासाठी ‘हिरो’ बनून जाते. पण गंगेच्या शुध्दीकरणासाठी भारतीय बेटी साध्वी पद्मावती हरिव्दार येथे ३९ दिवसांपासून बेमुदत उपोषण करते आहे, त्याबद्दल किती भारतीयांना माहिती आहे.? ग्रेटा जगासाठी ‘ग्रेट’ होते, मग पद्मावती का नाही?, मी काही दिवसांपूर्वी पद्मावतीला भेटलो होतो, तिच्यासमोर नतमस्तक झालो. मी ४० वर्षे पाण्यासाठी झगडतोय, काम करतोय. पण प्राणाची बाजी लावली नाही आणि २३ वर्षाची तरूणी स्वत:चे जीवन पाण्यासाठी देतेय, हे खरोखरच ग्रेटापेक्षा हजारो पटीने ‘ग्रेट’ काम आहे.

- डॉ.राजेंद्र सिंह, जलतज्ज्ञ 

पद्मावतीच्या मागण्या 

- नॅशनल मिशन ऑफ क्लिन गंगा या कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी.

- गंगा नदीवर वीज निर्मितीसाठी सुरू असलेल्या जलप्रकल्पांचे काम तत्काळ थांबविण्यात यावे.

- गंगा नदीच्या पात्रात सुरु असलेला वाळू उपसा थांबवावा तसेच नदी पात्रापर्यंत होत असलेले अतिक्रमण रोखावे.

- गंगेच्या प्रश्नांसाठी समिती तयार केली जावी, तसेच नदीत कारखान्यांव्दारे सोडण्यात येणारे सांडपाणी रोखण्यात यावे.

 

Web Title: sadhvi padmavati sit on hunger strike for ganga protection in haridwar matri sadan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.