द डान्स : शारीरिक अत्यानंदाचं हे नृत्य इतकं अस्वस्थ का करतं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:12 IST2026-04-18T12:11:48+5:302026-04-18T12:12:10+5:30

The Dance: मातीझ - द डान्स हे नृत्य केवळ वैयक्तिक आनंदाकरिता चाललेलं नाही. हजारो वर्षांपासून रक्तात रुजलेलं काहीतरी त्यातून मुक्त होऊ पाहात आहे.

The Dance: Why is this dance of physical ecstasy so disturbing? | द डान्स : शारीरिक अत्यानंदाचं हे नृत्य इतकं अस्वस्थ का करतं?

द डान्स : शारीरिक अत्यानंदाचं हे नृत्य इतकं अस्वस्थ का करतं?

- शर्मिला फडके
(ख्यातनाम कला समीक्षक, लेखिका)

फ्रेंच चित्रकार हेनरी मातीझने १९१० साली एका रशियन कलाप्रेमी उद्योगपतीच्या खासगी संग्रहाकरिता काढलेलं हे चित्र. हातात हात घालून नाचणारी पाच माणसं. नृत्याची लय त्यांच्या अंगात भिनलेली आहे. त्यांची शरीरं गडद लाल रंगांची. पायातळी हिरवं मैदान, वरचा अवकाश गडद निळ्या रंगात. तीन मूलभूत रंगांमधलं, साध्या, ठळक रेषांमधलं हे चित्र आपल्याला चकित करतं त्यातल्या विलक्षण उत्कट, स्वैर, आदीम आनंदामुळे.

’द डान्स’च्या दोन आवृत्त्या आहेत. सुरुवातीच्या चित्रात निळ्या मानवी आकृत्या. अगदी अलगद एकमेकांशी जोडलेल्या. जणू कोणीही, कधीही हात सोडून जाईल, ती मुभा त्यांना आहे. त्यात तरल, फिकट, स्वप्नमय आभास  आहे. मात्र दुसऱ्या, अंतिम आकृतीत आहेत लाल मानवी आकृत्या. त्यांचा आदीम आवेग, लय, ठाशीवपणा चकित करून सोडणारा. नऊ फूट उंच आणि तेरा फूट रुंद असा याचा प्रचंड आकारही भयावहतेत भर घालणारा. पायाखालच्या हिरव्यागर्द भूप्रदेशावर पावलं रोवून या आकृत्या भान हरपून नाचत आहेत. वरचं गडद निळं आकाश प्रवाही होऊन या लाल आकृत्यांवर जणू कोसळत आहे. त्यांच्या पदन्यासात भिनलेल्या प्राचीन वाद्यांच्या नादाची स्पंदनही जाणवतात. हे नृत्य केवळ वैयक्तिक आनंदाकरिता नाही. पुरातन श्रद्धा, हजारो वर्षांपूर्वीपासून रक्तात रुजलेलं काहीतरी मुक्त होऊ पाहात आहे. केवळ रंगांच्या वापराने चित्राचा मुळ भाव किती आमूलाग्र बदलून जाऊ शकतो याचं हे अतिशय प्रभावी उदाहरण. ‘द डान्स’मधल्या नृत्यातली उत्कटता, वेग, वाकलेली लवचिक शरीरं, पावलांचा बेताल, निरागस ठेका आपल्याला मागे मागे खेचून नेतात, भूमध्य समुद्राच्याही पलीकडे, प्राचीन गुहांमध्ये.

कोलियरच्या समुद्र किनाऱ्यावर मातीझने हे चित्र रंगवलं, तिथल्या स्थानिक मच्छीमार जमातीच्या पिढीजात नृत्याचा अंगात भिनलेला अगम्य ताल त्याने रंगांमधून मुक्त केला. मातिझची पेंटींग्ज म्हणजे रंग. दाट, शुद्ध, गडद रंग. लाल म्हणजे जर्द लाल, हिरवा म्हणजे गर्द हिरवा, निळा म्हणजे घनदाट निळा. त्याच्या पेंटींग्जमधले हे रंग कोलाहल माजवत नाहीत, कॅनव्हासवर मनसोक्त सैलावून परस्परांशी संवाद साधतात. आनंदाने नृत्य करतात. मातीझ रंगांचा सम्राट होता. या विधानाची सत्यता पटण्याकरता त्याचं एवढं एकच चित्र पुरेसं आहे. फॉव्हिझम या अगदी कमी काळ प्रचलीत असलेल्या चित्रशैलीचा तो जन्मदाता. दाट, गडद रंग, आकर्षक, दमदार रेषा, जाड ब्रशस्ट्रोक्स, आकारांचा विलय हे त्याचं वैशिष्ट्य, मातिझच्या वैयक्तिक शैलीतून ते विकसित झालं होतं.

जेव्हा  पहिल्यांदा ‘द डान्स’ प्रदर्शित झालं तेव्हा लोकांची प्रतिक्रिया अत्यंत तीव्र, नकारात्मक होती. ‘भयाकारी, रानटी श्वापदं (फॉव्ह) नाचत आहेत ही!’ - आर्ट क्रिटिकने आपल्या रिव्ह्यूमधे हे जहाल शब्द वापरले. मात्र तीच शैली, तेच चित्र मातीझच्या आणि आधुनिक चित्रकलेच्या वाटचालीमधला मैलाचा दगड ठरलं. शारीरिक अत्यानंदाचं इतकं उत्स्फूर्त, प्रत्ययकारी चित्रण विसाव्या शतकातल्या इतर कोणत्याही पेंटिंगमधून होत नाही. आज, सव्वाशे वर्षांनंतरही या नृत्याची आदीमता अस्वस्थ करते.
    sharmilaphadke@gmail.com

Web Title : द डांस: यह परमानंददायक, शारीरिक नृत्य हमें इतना बेचैन क्यों करता है?

Web Summary : मातिस का 'द डांस' आदिम आनंद जगाता है। इसकी कच्ची ऊर्जा, बोल्ड रंग और तरल आकृतियाँ, हालांकि शुरू में आलोचना की गईं, आधुनिक कला में क्रांति लाती हैं, जो आज भी दर्शकों को बेचैन करती हैं।

Web Title : The Dance: Why this ecstatic, physical dance makes us uneasy?

Web Summary : Matisse's 'The Dance' evokes primal joy. Its raw energy, bold colors, and fluid figures, though initially criticized, revolutionized modern art, still unsettling viewers today.