विशेष लेख: ...तेव्हा तुम्ही गालावरची खळी दाखवत गोड हसाल ना, आशाताई?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:14 IST2026-04-13T09:13:40+5:302026-04-13T09:14:10+5:30

Asha Bhosle News: अनुभवांचे कडूगोड घोट, जिवलगांनी दिलेल्या विरह वेदना, आप्तांकडून वाट्याला येणारी अवहेलना.. या प्रत्येक अनुभवाचे आशाताईंनी गाणे केले.

Special article: ...then you'll smile sweetly, showing off your dimples, won't you, Ashatai? | विशेष लेख: ...तेव्हा तुम्ही गालावरची खळी दाखवत गोड हसाल ना, आशाताई?

विशेष लेख: ...तेव्हा तुम्ही गालावरची खळी दाखवत गोड हसाल ना, आशाताई?

- वंदना अत्रे
(ज्येष्ठ पत्रकार, संगीताच्या अभ्यासक) 

आशाबाई गेल्या. ज्या तडफेने त्या रंगमंचावर यायच्या त्याच वेगाने त्यांनी झपकन निरोप घेतला. रेंगाळत, ओढत वावरणे त्यांना कधीच मान्य नव्हते. तीच ऐट त्यांच्या जाण्यात होती. त्या गेल्यावर प्रश्न पडला आहे, काय झाले आहे नेमके? एखादे उत्तुंग, झाडापानांनी सजलेले हिरवेगार पर्वतशिखर जमीनदोस्त होते तेव्हा काय होते? 

आसपासची जमीन हादरते, ठिसूळ होते. पाखरांचे हिरवे आसरे लुप्त होतात. श्वासात भरून घ्यायचा संजीवक प्राणवायू मिळेनासा होतो आणि झाडांवर डोलणारे, डोळ्यांना सुखावणारे फुलाफळांचे घोस अदृश्य होतात. पण याचा अर्थ, आजवर कधीच डोळ्यात न भरलेल्या आसपासच्या छोट्या टेकड्या उंच दिसायला, वाटायला लागणार की काय? त्यांच्याकडेच माणसे मान वर करून बघणार? आणि समाजाच्या सांस्कृतिक उंचीचे काय, तीही कमी होत जाणार? 

आशा भोसले यांचे जाणे कशात मोजायचे? त्यांनी कित्येक भाषांमध्ये गायलेली काही हजार गाणी म्हणजे आशाबाई? शेकडो पुरस्कार? विक्रमांच्या नोंदी? की याच्या पलीकडे आणखी काही? खरे म्हणजे तेच खूप काही आणि पुढील पिढीसाठी अधिक जिवापाड सांभाळावे असे. तिथे होणाऱ्या अमाप हानीचा अंदाज घेता घेता जीव दडपायला लागतो.

हवा तसा वळणारा, वाकणारा कमालीचा लवचीक पण टोकदार मधुर स्वर आशाताईंना निसर्गाने बहाल केला. या उदार देणगीबद्दल त्यांचा हेवा करायचा ठरवला तर त्यांनी गाण्यासाठी आणि ते कालच्यापेक्षा आज अधिक उत्तम व्हावे यासाठी रोज घेतलेल्या कष्टांचे काय? दीनानाथांनी आपल्या पाचही गाणाऱ्या मुलांना बजावले होते, ‘आकाशात भरारी घ्यायची असेल तर गरुडासारखी घ्या, कावळ्यासारखी नको.’

आकाशात गरुडाप्रमाणे उंच जायचे तर पंखांमध्ये तेवढे सामर्थ्य आणि आत्मविश्वास कमवायला हवा. म्हणजे, स्वरांची मेहनत आणि शब्दांची पुरेपूर ओळख करून घ्यायला हवी. शब्दांच्या मागे उभा भाव समजून तो तसाच गाण्यातून सुरेलपणे व्यक्त करणे हा केवढातरी मोठा प्रवास. त्यासाठी हवी फुरसत आणि निवांतपण. तेच नेमके आशाताईंच्या वाट्याला आले नाही. गाण्याचे धडे देणे ज्यांनी सुरू केले ते वडील अकस्मात निवर्तले तेव्हा लहानगी आशा जेमतेम आठ वर्षांची होती. घरातील परिस्थितीचा काच कमी करण्यासाठी स्टुडिओमध्ये माईकसमोर उभे राहणे भाग होते. एकदा या चष्म्यातून आशाताईंच्या गाण्याकडे बघायला लागले की त्या आपल्याला धक्के द्यायला लागतात. 

आशाबाई  ज्या प्रेमाने आपले गाणे समजावून सांगतात त्याला तोड नाही. गाणे कोणतेही असू दे, खळेकाकांनी स्वरबद्ध केलेले एखादे भावगीत, पंचमने चाल दिलेले धमाकेदार रॉक  किंवा ‘उमरावजान’मधील गझल; त्यातील शब्दांचा उच्चार ऐकताना वाटते, कविता अशी थेट रसिकाच्या हृदयापर्यंत नेण्याचे हे कौशल्य आईच्या पोटात असताना नक्की शिकायला मिळाले नसणार मग कोण त्यांचा गुरु? तर परिस्थिती! हिंदी सिनेसृष्टीत गायला आल्यावर ‘ये मराठी लडकियाँ’ हिंदी कसे गाणार असा उपहास वाट्याला आल्यावर जी जखम झाली तिने त्यांना खूप काही शिकवले असणार..

फक्त स्वरात गाऊन गाणे चिरंजीव होत नसते. ते स्पेशल करण्यासाठी चिमूटभर ‘एक्स’ नावाचा घटक त्यात बेमालूमपणे मिसळून द्यावा लागतो, याची जेवढी सखोल समज आशाताईंना होती तेवढी अन्य कोणालाही नव्हती. स्वरांची एखादी बारीक मुरकी, तालाची मुद्दाम चुकवलेली मात्रा, एखाद्याच शब्दाला घातलेली अलगद फुंकर किंवा त्याला दिलेली धार.

सुगरण जशी नकळत एखादी चिमूट जीव शिजणाऱ्या पदार्थात टाकून नामानिराळी होते, अगदी थेट तसेच आशाताई आपल्या प्रत्येक  गाण्याच्या बाबतीत करत असत. हा लबाड खट्याळपणा त्यांना कोणी शिकवला असेल? स्वतःची थट्टा करायची ही जीवघेणी कसरत त्यांना शिकवणारा गुरुही बहुदा परिस्थितीच असणार!

जगणे प्रत्येकाला खूप काही शिकवत असते. आशाताईंसारखी काही माणसे हे धडे जगण्याच्या पायाशी बसून मनोभावे घेतात आणि बदलत राहतात. आयुष्याने पदरात टाकलेल्या वेदना, अनुभवांचे कडूगोड घोट, जिवाभावाच्या माणसांनी सोडलेले हात आणि दिलेल्या विरह वेदना, आप्तांकडून वाट्याला येणारी अवहेलना या प्रत्येक अनुभवाचे त्यांनी गाणे केले आणि तो अनुभव जणू आपल्यापुरता संपवून टाकला. या वाटेने गाणे अमर्त्य करायचे असते हा धडा देणाऱ्या त्या एक. 

हे घोट किती जहाल असावे? आधी मराठी म्हणून हिंदी सिनेसृष्टीने केलेली उपेक्षा, त्यावर मात करण्यासाठी हिंदी, उर्दू भाषेचे घेतलेले धडे, हिंदी लहेजा जिभेवर रुळावा यासाठी सदैव कान उघडे ठेवण्याची सावधानता आणि मग आधुनिक होत जाणाऱ्या तंत्रज्ञानाने बघितलेली परीक्षा, ही व्यावसायिक आव्हाने होतीच; पण त्याचवेळी ‘लता विरुद्ध आशा’ नावाचा वणवाही या जगाने पेटवून दिला होता. या वणव्याच्या झळा या दोघींना चटके देत असताना आशाचे गाणे मात्र थांबले नाही.

काळाच्या एका मोठ्या सतत बदलत्या पटावर स्वतःला सांभाळत, बदलत, परिस्थितीशी जमवत मुसंडी मारत लढणारी आणि सतत जिंकत राहणारी आशा ही एकमेवाद्वितीय. म्हणून ती जाण्याचे दुःख अपार. कोणताही आधार नसताना तडफेने स्वतःचे असे लखलखीत भविष्य घडवणारी ही स्त्री हे एक काल्पनिक पात्र, फिक्शन होते असेच कदाचित पुढच्या पिढ्यांना वाटत राहील..! तेव्हा तुम्ही गालावरची खळी दाखवत गोड हसाल ना, आशाताई?
vratre@gmail.com

Web Title : आशा भोसले को याद करते हुए: एक महान गायिका की यात्रा, संघर्ष, विरासत।

Web Summary : आशा भोसले का जाना एक महान संगीत प्रतिभा का नुकसान है। उनकी लगन, अनुकूलनशीलता और अद्वितीय प्रतिभा ने, जो कठिनाइयों से परिष्कृत हुई, एक अद्वितीय विरासत बनाई। उद्योग के पूर्वाग्रहों पर काबू पाने से लेकर विविध शैलियों में महारत हासिल करने तक, आशा की यात्रा पीढ़ियों को प्रेरित करती है। क्या उनकी प्रतिष्ठित मुस्कान स्मृति में बनी रहेगी?

Web Title : Remembering Asha Bhosle: A legend's journey, struggles, and enduring legacy.

Web Summary : Asha Bhosle's departure marks the loss of a towering musical figure. Her resilience, adaptability, and unique talent, honed through hardship, created an unparalleled legacy. From overcoming industry prejudice to mastering diverse genres, Asha's journey inspires generations. Will her iconic smile endure in memory?