धक्कादायक! ब्रिटनमध्ये आश्रयासाठी पाकिस्तानी बनताहेत ‘गे’!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 12:07 IST2026-04-18T12:07:21+5:302026-04-18T12:07:58+5:30
International News: पाकिस्तानी लोक काय काय करतील याचा खरंच काहीच भरवसा राहिलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही बाबतीत आता बांगलादेशानंही त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. खड्ड्यात चाललेल्या आपल्या देशात आता आपलं काहीच भवितव्य उरलं नसल्याचं काळल्यानं अनेक पाकिस्तानी नागरिक आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेत आहेत.

धक्कादायक! ब्रिटनमध्ये आश्रयासाठी पाकिस्तानी बनताहेत ‘गे’!
पाकिस्तानी लोक काय काय करतील याचा खरंच काहीच भरवसा राहिलेला नाही. आश्चर्याची गोष्ट म्हणजे काही बाबतीत आता बांगलादेशानंही त्यांचा कित्ता गिरवायला सुरुवात केली आहे. खड्ड्यात चाललेल्या आपल्या देशात आता आपलं काहीच भवितव्य उरलं नसल्याचं काळल्यानं अनेक पाकिस्तानी नागरिक आपला देश सोडून दुसऱ्या देशात आश्रय घेत आहेत. त्यात अरब देशांसह ब्रिटनसारख्या देशाचाही समावेश आहे.
व्हिसाची मुदत संपल्यावर कोणालाही त्या देशात राहता येत नाही आणि तो देश त्यांना सोडून परत आपल्या मायदेशी जावं लागतं, हा जगभराचा नियम आहे. पण इतर देशांमध्ये गेलेल्या अनेक पाकिस्तानी नागरिकांना तो देश सोडायचा नसतो आणि मायदेशीही परतायचं नसतं. पण त्यासाठी त्यांनी काय काय शक्कल लढवाव्यात?
ब्रिटनसारखे काही उदार देश अशा नागरिकांना आपल्या देशात आश्रय देतात, ज्या लोकांना आपल्या मायदेशात धोका असतो. पाकिस्तान आणि बांगलादेश येथे समलैंगिक संबंध ठेवणं कायद्याने गुन्हा आहे. याच नियमाचा गैरफायदा घेऊन अनेक पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी स्वत:ला समलैंगिक, गे असल्याचं भासवायला, तशी बनावट प्रमाणपत्रं मिळवायला सुरुवात केली आहे. आम्ही समलैंगिक असल्यानं आमच्या देशात आम्हाला धोका आहे असं सांगून त्यांनी ब्रिटनमध्ये ‘आश्रय’ मिळवायला सुरुवात केली आहे. यासाठी अनेक ‘दलाल’ही तिथे तयार झाले आहेत. ते मोठी फी उकळून ब्रिटनमध्ये असलेल्या पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांना ‘गे’ सर्टिफिकेट्स मिळवून देत आहेत. यासंदर्भातलं एक मोठं स्कॅण्डल नुकतंच उघडकीस आलं आहे.
बीबीसीच्या अहवालानुसार, इमिग्रेशन सल्लागार हजारो पाउंड घेऊन खोटी कागदपत्रे त्यांना तयार करून देतात. ज्यांचा व्हिसा संपणार असेल, त्यांना बनावट कथा सांगितल्या जातात आणि खोटे पुरावे तयार करण्याचं प्रशिक्षणही दिलं जातं. विशेषत: ज्यांचे स्टुडंट, वर्क किंवा टुरिस्ट व्हिसा संपलेले असतात, अशा लोकांना त्यासाठी हेरलं जातं.
आम्ही ‘गे’ आहोत, त्यामुळे आम्हाला ब्रिटनमध्ये राहू द्यावं अशी विनंती करणारे किती अर्ज ब्रिटनमध्ये दाखल होत असावेत? २०२५ मध्ये एकूण आश्रय अर्जांपैकी सुमारे ३५ टक्के अर्ज अशा प्रकारचे होते आणि त्यांची एकूण संख्या १ लाखाहून अधिक होती! ब्रिटनच्या गृह मंत्रालयाच्या अधिकृत आकडेवारीनुसार, २०२३ मध्ये लैंगिक प्रवृत्तीच्या आधारावर आश्रय मागणाऱ्यांमध्ये पाकिस्तान पहिल्या क्रमांकावर होता, त्यानंतर बांगलादेशचा क्रमांक होता. हा घोटाळा आणि हे रॅकेट उघडकीस आल्यानंतर ब्रिटनच्या गृह मंत्रालयानं म्हटलं आहे, जो कोणी अशाप्रकारे ब्रिटनच्या उदारमतवादाचा गैरवापर आणि गैरफायदा घेताना आढळेल, त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, ज्यात देशाबाहेर हकालपट्टीचाही समावेश आहे.
पाकिस्तानी आणि बांगलादेशी नागरिकांनी ब्रिटनमध्ये आश्रयासाठी आणि बनावट दाव्यांसाठी मुख्यत: तीन गोष्टींचा आधार घेतला होता. त्यातल्या बहुतेकांनी लैंगिक ओळखीच्या आधारावर छळ, आमच्या विशिष्ट धार्मिक श्रद्धांमुळे आणि राजकीय विचारांमुळे धोका.. ही कारणं त्यासाठी नमूद केली होती. त्यामुळे पाकिस्तानातून येणाऱ्या नागरिकांना व्हिसा देणं तातडीनं थांबवा, अशी मागणी ब्रिटनमध्ये जोर धरू लागली आहे.