पिझ्झानं पकडला खुनी- दिवसा हीरो, रात्री किलर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2026 10:32 IST2026-04-14T10:31:55+5:302026-04-14T10:32:59+5:30
Crime News: ही गोष्ट सुरू होते १९९३मध्ये. अमेरिकेच्या न्यू यॉर्क सिटीजवळ ‘लाँग आयलंड’ नावाच्या बेटावर ‘गिलगो बीच’ आहे. या बेटावर अचानक धक्कादायक गोष्टी घडू लागल्या. यामुळे लोक नुसते चक्रावलेच नाहीत, तर त्यांच्यात प्रचंड भीती आणि दहशत निर्माण झाली.

पिझ्झानं पकडला खुनी- दिवसा हीरो, रात्री किलर!
ही गोष्ट सुरू होते १९९३मध्ये. अमेरिकेच्या न्यू यॉर्क सिटीजवळ ‘लाँग आयलंड’ नावाच्या बेटावर ‘गिलगो बीच’ आहे. या बेटावर अचानक धक्कादायक गोष्टी घडू लागल्या. यामुळे लोक नुसते चक्रावलेच नाहीत, तर त्यांच्यात प्रचंड भीती आणि दहशत निर्माण झाली. त्यामुळे लोकांनी घराबाहेर पडणंही बंद केलं. कारण त्याठिकाणी अचानक एकामागोमाग एक अनेक महिलांचे खून पडू लागले. ना खुन्याचा पत्ता लागेना, ना या खुनामागच्या कारणांचा..
‘गिलगो बीच मर्डर्स’ आणि ‘गिलगो बीच सिरियल किलिंग्ज’ या नावानं हे प्रकरण प्रसिद्ध झालं. २०१०मध्ये या प्रकरणाचा थोडासा सुगावा लागला. २३ वर्षांची शॅनन गिल्बर्ट ही तरुणी अचानक बेपत्ता झाली. शोधमोहिमेदरम्यान पोलिसांना अनेक मानवी अवशेष सापडले.
याआधी २००७ ते २०१० या काळात मेलिसा बार्थेलेमी, मॉरिन ब्रेनार्ड-बार्न्स, अँबर लिन कॉस्टेलो आणि मेगन वॉटरमन या महिलाही बेटावरून बेपत्ता झाल्या होत्या. नंतर गिलगो बीच परिसरात त्यांच्या मृतदेहांचे अवशेष सापडले. त्यामुळे ‘गिलगो फोर’ या नावानंही हे प्रकरण प्रसिद्ध झालं. १९९३ ते २०१० दरम्यान अनेक महिलांचा गळा दाबून खून करण्यात आला होता आणि नंतर त्यांचे मृतदेह समुद्रकिनारी भागात फेकून दिले होते.
सुमारे तीन दशकं दहशत माजवणाऱ्या ‘गिलगो बीच’ प्रकरणाला २०२३मध्ये एक मोठं वळण मिळालं. रेक्स ह्युअरमन नावाच्या एका व्यक्तीला अटक करण्यात आली. तो न्यूयॉर्कमधला अतिशय प्रसिद्ध आर्किटेक्ट होता. लोकांच्या मते तो अतिशय सज्जन माणूस होता. सर्वांना खूप मदत करायचा. त्यांच्यासाठी जणू तो ‘हीरो’च होता. पण तो दुहेरी आयुष्य जगत होता. दिवसा तो आर्किटेक्ट म्हणून काम करायचा आणि रात्री महिलांचे खून पाडायचा!
त्याच्या अटकेनंतरअनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या प्रश्नांचे धागे हळूहळू उलगडत गेले. रेक्स पोलिसांना कसा सापडला, त्याचीही एक रहस्यमय कहाणी आहे. तपासादरम्यान अर्धा खाऊन फेकून दिलेला एक पिझ्झा बॉक्स पोलिसांना सापडला. त्यातून मिळालेला डीएनए नमुना रेक्सशी तंतोतंत जुळला. हाच महत्त्वाचा पुरावा त्याला अटकेपर्यंत घेऊन गेला.
पोलिसांनी त्याच्या घराची बारा दिवस कसून तपासणी केली, तेव्हा तेही हादरले. त्याच्या घराच्या बेसमेंटमधील तिजोरीतून तब्बल २७९ शस्त्रं आणि संगणकातून हत्येच्या योजनेशी संबंधित माहिती सापडली. ‘गिलगो बीच’ सिरियल किलर प्रकरण हे अमेरिकेतील सर्वांत गूढ आणि चर्चित गुन्हेगारी प्रकरणांपैकी एक मानलं जातं. या धक्कादायक प्रकरणावर नेटफ्लिक्सनं ‘Gone Girls : The Long Island Serial Killer’ नावाची डॉक्युमेंटरी सिरीजही तयार केली आहे, ज्यामुळे हे प्रकरण आणखीच जागतिक चर्चेत आलं.
१९९३मध्ये सुरू झालेलं आणि अजूनही न संपलेलं हे रहस्यमयी आणि गूढ सिरियल किलिंग प्रकरण आत्ता पुन्हा चर्चेत येण्याचं कारण काय? - तर लाँग आयलंडचा रहिवासी असणारा आणि सध्या ६२ वर्षांचा असलेला मुख्य आरोपी रेक्स ह्युएरमन यानं अखेर न्यायालयात या महिलांची हत्या केल्याची कबुली दिली आहे! येत्या १७ जूनला त्याला शिक्षा ठोठावली जाणार आहे. ती काय असेल, याकडे आता लोकांचं लक्ष लागलं आहे..