अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य

By ऑनलाइन लोकमत | Published: August 5, 2020 12:33 AM2020-08-05T00:33:43+5:302020-08-05T00:34:45+5:30

नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली

Modi's fortunes brightened by Ayodhya agitation | अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य

अयोध्या आंदोलनाने उजळले मोदींचे भाग्य

Next

हरीश गुप्ता

अयोध्येत श्रीराम मंदिराच्या उभारणीसाठी लालकृष्ण अडवाणी यांनी सन १९९० मध्ये काढलेल्या ऐतिहासिक रथयात्रेचा एक मजेशीर पैलू आजच्या दिवशी लोकांपुढे मांडणे महत्त्वाचे आहे. खरे तर वाजपेयी, अडवाणी, त्यावेळचे भाजपचे अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी व विजयाराजे शिंदे यांच्या नेतृत्वाखाली देशाच्या निरनिराळ्या भागांतून अयोध्येकडे चार राम रथयात्रा काढायच्या अशी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मूळ योजना होती; परंतु अनेक कारणांमुळे अखेरीस सोमनाथपासून अडवाणींच्या नेतृत्वाखाली एकच रथयात्रा काढायचे ठरले. त्यानंतर बराच शोध घेतल्यानंतर रथयात्रेच्या सोमनाथपासूनच्या टप्प्याचे मुख्य संयोजक म्हणून नरेंद्र मोदी यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामागे कारणही तसेच होते. त्याआधी मोदींनी गुजरातमध्ये दोन ‘न्याययात्रां’चे आयोजन करून आपले संघटन कौशल्य सिद्ध केले होते. यातील पहिली ‘न्याययात्रा’ त्यावेळच्या गुजरातमधील चिमणभाई पटेल सरकारकडून दंगलग्रस्तांवर केल्या जाणाऱ्या कथित अन्यायाविरुद्ध होती. दुसरी १९८९ मधील ‘न्याययात्रा’ गुजरातमधील दारू माफियांचा बंदोबस्त करण्यासाठी होती. त्यावेळी गुजरातच्या राजकारणात जनता दल व काँग्रेसनंतर भाजप तिसºया क्रमांकावर होता; पण या दोन यात्रांनी गुजरात भाजपमध्ये मोदी उगवता तारा म्हणून उदयास आले होते. या यात्रांच्या यशाच्या जोरावर सन १९९० च्या विधानसभा निवडणुकीत जनता दलासोबतच्या आघाडीस सोडचिठ्ठी देऊन भाजपने एकट्याने लढावे हे मोदींनी पक्षश्रेष्ठींना पटवून दिले.

नव्याने आकारास येत असलेल्या राजकीय कारकिर्दीत मोदींनी हा मोठा धोका पत्करून पक्षाला मोठे यश मिळवून दिले. मोदींच्या या कामगिरीमुळेच डॉ. मुरली मनोहर जोशी यांनी २५ सप्टेंबर १९९० रोजी अडवाणींच्या रथयात्रेचे गुजरातमध्ये सारथ्य करण्यासाठी मोदींची निवड केली. तोपर्यंत स्वत: अडवाणींचा मोदींशी फारसा संपर्क नव्हता. रथयात्रेसारख्या अशा कार्यक्रमास लोकांचा कितपत प्रतिसाद मिळेल याविषयी अडवाणी साशंक होते. शिवाय गुजरातमध्येही ते नवखे होते; पण ती रथयात्रा गुजरातमधील ज्या ६०० गावांमधून गेली, तेथील लोकांचा प्रचंड उत्साही प्रतिसाद पाहून मोदींच्या संघटन चातुर्याची अडवाणींना खात्री पटली. यात्रेत काही लोकांनी अडवाणींच्या कपाळावर रक्ताचे तिलक लावले. एवढेच नव्हे तर राजकोटजवळ जेतपूर येथे अयोध्येला नेण्यासाठी एक रक्ताने भरलेला कलशही अडवाणींकडे सोपविण्यात आला. या सर्वाने ते एवढे भारावून गेले की, त्यांनी थेट मुंबईपर्यंत रथयात्रेचे सारथ्य करण्याची मोदींना विनंती केली. आधी मोदी फक्त गुजरात-महाराष्ट्र सीमेपर्यंत यात्रा घेऊन जाणार होते.

अडवाणी यांनी गांधीनगरमधून लोकसभेची निवडणूक लढवावी आणि आपला राजकीय तळ दिल्लीहून गुजरातला हलवावा, असे मोदींनी त्यांना याच रथयात्रेत सुचविले. त्यानुसार लगेच पुढच्या वर्षी म्हणजे १९९१ मध्ये अडवाणी यांनी गांधीनगरमधून लोकसभा लढविली व ती निवडणूक विक्रमी मताधिक्याने जिंकली. त्यामुळे मोदींच्या शिरपेचात आणखी एक तुरा खोवला गेला. अर्थात यामुळे पक्षात पोटदुखीही सुरू झाली व शंकरसिंग वाघेला मोदींच्या विरोधात गेले; पण त्यानंतर मोदींनी मागे वळून पाहिले नाही. त्या रथयात्रेने अडवाणी व मोदी या दोघांचेही भाग्य बदलले. त्यानंतर लगेचच नोव्हेंबर १९९१ मध्ये मोदींची भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीवर निवड झाली. सन १९९३ मध्ये त्यांच्यावर संघटन महासचिव म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली. पक्षात मोदींची अल्पावधीत झालेली ही प्रगती खरंच लक्षणीय होती. त्यावेळी पक्षाध्यक्ष असूनही डॉ. जोशी रथयात्रेच्या या रणधुमाळीपासून बाजूला राहिले होते; पण मोदींच्या यशापासून स्फूर्ती घेऊन त्यांनीही १९९२ मध्ये कन्याकुमारी ते काश्मीर अशी ‘एकता यात्रा’ काढली. त्या यात्रेच्या संघटन व सारथ्याची जबाबदारीही अर्थात मोदींवरच होती. याच यात्रेत काश्मीरमध्ये दहशतवादाच्या भस्मासुराचा उन्माद सुरू असताना धोका पत्करून श्रीनगरच्या लाल चौकात २६ जानेवारी १९९२ रोजी तिरंगा राष्ट्रध्वज प्रथमच फडकविला गेला. त्यावेळी मोदी अडवाणींहून डॉ. जोशी यांच्या अधिक जवळ असल्याचे पक्षात अनेकांना वाटले होते. खुद्द अडवाणीही त्यावेळी एकदा थट्टेने म्हणाले होते की, जेटली किंवा सुषमा स्वराज यांच्यासारखा मोदींचा मी ‘मेन्टॉर’ थोडाच आहे? पक्षातील इतर अनेकांप्रमाणे मोदी अडवाणींचे चेले नव्हते हेही खरेच होते.

स्वत: मोदींनी पक्षातील स्वत:च्या उत्कर्षाचे श्रेय रा. स्व. संघाला आणि कठोर मेहनतीला दिले. ‘कठोर परिश्रमास पर्याय नाही’, असे त्यांचे नेहमीच सांगणे असते. त्यामुळे आज अयोध्येत राम मंदिराच्या कामाचे भूमिपूजन त्यांच्या हस्ते होणे अनेक कारणांनी सार्थ आहे. अयोध्या आंदोलनाची मूळ कल्पना रा. स्व. संघाची होती. त्यामुळे संघाच्या वतीने सध्याचे सरसंघचालक मोहन भागवत कार्यक्रमास उपस्थित असतील. स्वत: मोदीही कट्टर हिंदू असून, धोरणे व कार्यक्रम आखताना ते संघाच्या इच्छेनुसार वागत असतात.

(लेखक लोकमतचे नॅशनल एडिटर, आहेत)
 

Web Title: Modi's fortunes brightened by Ayodhya agitation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.