नेत्यांनो, सामाजिक ऐक्याला नख लावण्याचे काम करू नका! गोव्यात उफाळला नवा वाद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:18 IST2026-05-02T08:18:42+5:302026-05-02T08:18:58+5:30
वक्त्यांनी जिभेवर काबू ठेवत आपल्या वक्तव्याने कोणाच्या भावना दुखावणार नाहीत, काही विपर्यास तर होणार नाही ना, याचा विचार करून बोलले पाहिजे.

नेत्यांनो, सामाजिक ऐक्याला नख लावण्याचे काम करू नका! गोव्यात उफाळला नवा वाद
सुहास बेळेकर, उपवृत्तसंपादक,
गोवा आवृत्ती
गोव्यात सध्या एका विषयाने धुमाकूळ घातला आहे, तो विषय आहे सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल गौतम खट्टर याने केलेल्या अवमानकारक वक्तव्याचा. हा विषय एवढा अवमानकारक का ठरला आणि त्याने गोमंतकीय समाजमन इतके ढवळून का निघाले? कारण यापूर्वी असे कधीच घडले नव्हते. आजच्यासारखा तेव्हा सोशल मीडिया नव्हता, किंवा प्रभावीही नव्हता. आता कोणी काही बोलले की, त्याचा व्हिडीओ जशास तसा काहीही एडिट न करता सोशल मीडियावरून व्हायरल होत असतो. लोक तो हव्या तितक्या वेळा ऐकत असतात. त्यामुळे मी असे बोललोच नव्हतो, किंवा मला असे म्हणायचेच नव्हते, असे ते म्हणू शकत नाहीत.
वर्तमानपत्रात छापून येताना वक्तव्य गाळून छापले जाते, म्हणजे अतिच अवमानकारक असेल तर ते छापलेही जात नाही. त्यामुळे त्या वक्तव्याचा परिणाम आता झालाय तसा भयानक नसतो. विद्यमान अवमानाचे प्रकरण असेच गंभीर झाले आहे. गोव्यातील ख्रिश्चन समाज सेंट फ्रान्सिस झेवियरला देव मानतो आणि त्याची पूजाअर्चना करतो. गेली कित्येक वर्षे ही प्रथा चालूू आहे. दरवर्षी ३ डिसेंबरला त्याचे फेस्ट होते आणि दर दहा वर्षांनी सेंट फ्रान्सिस झेवियरच्या पवित्र अवशेषांचे प्रदर्शन केले जाते. याला देश-विदेशातून लाखो भाविक येत असतात. जेथे हे पवित्र अवशेष ठेवण्यात आलेले आहेत ती चर्च आणि बाजूच्या चर्च आणि परिसर वर्ल्ड हेरिटेज साईट म्हणून मान्यताप्राप्त आहे. सेंट फ्रान्सिस झेवियरना पुजणाऱ्या ख्रिस्ती समाजाचे लोक आणि त्यांना मानणाऱ्या इतर समाजाचे लोक भक्तिभावाने त्यांचे दर्शन घेण्यासाठी, तो परिसर पाहण्यासाठी येत असतात. अशा पुजल्या जाणाऱ्या संताबद्दल काही अवमानास्पद बोलणे कोणीच खपवून घेणार नाही.
गोव्यात तर हिंदू-ख्रिस्ती धर्मीय इतक्या सौहार्दाने वागत असतात की बाहेरील लोकांना हेवा वाटावा. त्यामुळेच कोणीतरी बाहेरून येऊन काहीबाही बोलतो हे खपवून घेणे शक्यच नव्हते. झालेही तसेच. गोव्यातील सर्वच जणांनी गौतम खट्टरचा निषेध केला. त्याला ताबडतोब अटक करण्याची मागणी करू लोक रस्त्यावर उतरले. गोव्यातील अनेक पोलिस स्थानकात तक्रारी दाखल झाल्या. सरकारवर इतका दबाव आला की त्यांनीही मागे लागून प्रथम त्याचा बंधू आणि नंतर गौतम खट्टरला अटक केली. आता कायद्याप्रमाणे त्याच्यावर काय कारवाई व्हायची ती होईल. पण या खट्टरला असे काही बोलण्याची काय गरज होती? तसे बोलण्याचे किंवा त्या विषयाला हात घालण्याचेही काही कारण नव्हते. कार्यक्रम होता परशुराम जयंतीचा. गोव्यात परशुराम जयंती फारशी साजरी केली जात नाही. परशुरामाची फारशी पूजाही केली जात नाही. गोव्यात फक्त एकच प्रसिद्ध परशुराम मंदिर आहे, तेही दक्षिण गोव्याच्या टोकाला पैंगीण काणकोणमध्ये. पण अलीकडे परशुरामाबद्दल समाजात जागृती केली जाऊ लागली आहे.
खुद्द सरकारने पणजीत मांडवीच्या तिरी परशुरामाचा मोठा पुतळा उभारला आहे आणि तो परिसर सजवला आहे. तेथे काही परशुरामासंबंधित कार्यक्रमही होत असतात. पेडण्यातही अलीकडे परशुरामाचा पुतळा उभारला आहे. आणखीही उभारले जाणार आहेत. यावर्षी परशुराम जयंतीचे बरेच कार्यक्रम गोव्यात झाले. वास्कोतही एक कार्यक्रम झाला. या कार्यक्रमालाच वक्ता म्हणून भारतीय संस्कृती आणि हिंदुत्वावर व्याख्याने देणाऱ्या गौतम खट्टर याला बोलावण्यात आले होते. यावेळी परशुराम जयंतीचे औचित्य असल्याने त्या विषयाला धरूनच त्याने बोलले पाहिजे होते. पण मध्येच त्याने सेंट फ्रान्सिस झेवियरबद्दल बोलायला सुरुवात केली आणि सर्व समारंभाचाच विचका झाला.
खुद्द पंचायत मंत्री माविन गुदिन्हो आणि संकल्प आमोणकर आणि कृष्णा साळकर व्यासपीठावर होते. त्यांची फारच गोची झाली. पण खट्टरच्या वक्तव्याने काय गोंधळ व्हायचा तो झाला. शांत गोव्यात अचानक संताप उसळून वर आला. समाजात दुफळी निर्माण झाली. अर्थात बहुतांश लोकांनी खट्टरचा निषेधच केला. पण यामुळे निर्माण झालेल्या वातावरणाचा आणखी एक दुष्परिणाम झाला, तो म्हणजे लोक आणखी खोलात जाऊन इतिहासात घडलेल्या काही अनावश्यक गोष्टीबद्दल चर्चा करून वातावरण आणखी दूषित करण्याचा प्रयत्न करीत आहेत. अलीकडे हे प्रकार फारच घडायला लागलेले आहेत. त्यामुळे सर्वच वक्त्यांनी जिभेवर काबू ठेवला पाहिजे. आपल्या वक्तव्याने कोणाच्या भावना तर दुखावणार नाहीत, काही विपर्यास तर होणार नाही ना, याचा विचार करूनच बोलले पाहिजे. मग तो कितीही मोठा वक्ता का असेना.