सीएम टू पीएम.. ‘बाबा’ महाराज कऱ्हाडकरां’ची भविष्यवाणी!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2021 07:28 AM2021-07-22T07:28:28+5:302021-07-22T07:28:43+5:30

‘पृथ्वी’वरचं ‘राज’ शोधण्यासाठी नारद मुनी भूतलावर पोहोचले, तर काय सांगावे! - ‘बाबा महाराज कऱ्हाडकरां’च्या आश्रमासमोर राजकीय नेत्यांची ही प्रचंड वर्दळ...

irony on political situation in maharashtra | सीएम टू पीएम.. ‘बाबा’ महाराज कऱ्हाडकरां’ची भविष्यवाणी!

सीएम टू पीएम.. ‘बाबा’ महाराज कऱ्हाडकरां’ची भविष्यवाणी!

googlenewsNext

इंद्र दरबारात गेल्या काही दिवसांपासून अस्वस्थता जाणवत होती.  काहींच्या मनात चलबिचल सुरू होती.  आपल्याच कार्यात मग्न असणाऱ्या इंद्रांना याची जाणीव होताच त्यांनी काही जणांकडे गुप्तपणे चौकशी केली, तपशील कळल्यावर तेही दचकले.

इंद्रांच्या सिंहासनावर म्हणे नारद मुनींना बसविण्याची कुजबुज काही जण करत होते.  मग काय.. संतप्त महाराजांनी तत्काळ दरबार भरवला.  आपले आसन घट्ट पकडून ठेवत त्यांनी गंभीरपणे विचारलं, ‘कुणाच्या खुर्चीवर कुणी बसायला हवं, हे परस्पर कोण ठरवू लागलंय?  कुठाहेत नारद मुनी?’... हे ऐकून मुनी हजर झाले.  त्यांनी डोळे मिटून बऱ्याच गोष्टी मन:चक्षूने जाणून घेतल्या.  मग, गालातल्या गालात हसत वीणा वाजवून त्यांनी गौप्यस्फोट केला.  ‘हा असा उद्योग भूतलावर होतोय महाराज.  हातवाले पृथ्वीबाबा महाराज कऱ्हाडकर आजकाल अनेकांचं भविष्य कथन करू लागलेत. सीएम उद्धोंनी आता पीएम व्हावं, ही भविष्यवाणीही त्यांचीच. तेव्हापासून त्यांच्याकडं भविष्य बघणाऱ्यांची अलोट गर्दी झालीय.’ 

..मग काय? इंद्रांची आज्ञा होताच  नारद ‘पृथ्वी’वरचं ‘राज’ शोधण्यासाठी भूतलावर पोहोचले. ‘बाबा महाराज कऱ्हाडकरां’च्या आश्रमासमोर गाड्यांची रांग. वेगवेगळ्या पक्षातल्या नेत्यांची प्रचंड वर्दळ. पहिल्याच रांगेत ‘कृष्णकुंज’वरचे ‘राज’ बसलेले. ‘माझ्या पक्षातली गळती कधी थांबणार?’ -  या त्यांच्या प्रश्नावर बाबा उत्तरले, ‘इंजीन एका जागी थांबलं की एकेक डबा निखळणारच.  फिरत राहा. सभा घेत राहा.  तुमचा जन्मच जणू भाषणांसाठी झालाय.’ -  सल्ला आवडताच मान हलवत राज लगेच नाशिकच्या दिशेनं निघाले.
मागच्या रांगेतले ‘अढळराव’ भगवं उपरणं नीट करत सरकले, ‘घड्याळवाले अमोल खासदार इतके दिवस माझ्यावर टीका करायचे.  

आता ते आमच्या सीएमनाही सोडेनात. काय उपाय यावर?’ ‘बाबां’नी डोळे मिटून सांगितलं, ‘तुमचे कोल्हे महाशय खासदार कमी अन् कलाकार जास्त.  ही मंडळी स्क्रीप्ट पाठ करूनच भाषण ठोकणारी.  त्यामुळं स्क्रीप्ट पुरविण्याचं काम जोपर्यंत बारामतीकर थांबवत नाहीत, तोपर्यंत तुमच्यात सवाल-जबाब झडणारच.’ 

- एवढ्यात पंकजाताई परळीकर यांनी विचारलं, ‘सहनशीलतेचा स्फोट होतोय. मी आता काय निर्णय घेऊ बाबा?’  ‘नाथाभाऊ होऊ नका, अगोदर मतदारसंघ मजबूत करा. बंधूंवर बारीक लक्ष ठेवा.’ बाबांनी दिलेला सल्ला मागंच उभारलेल्या ‘धनुभाऊं’नीही ऐकला.  ते पुटपुटले, ‘मला माहीत होतं.  माझ्यावरही वॉच ठेवला जाणार.  माझा फोन टॅप केला जाणार.  म्हणूनच मी दोन दोन मोबाइल वापरतो.’ 

फोन टॅपिंगचा विषय निघताच आजूबाजूचे दचकले. साताऱ्याच्या शिवेंद्रराजेंनी घाईघाईनं आपल्या मोबाइलमधलं सिम कार्ड बदललं. मात्र शेजारीच उभारलेल्या उदयनराजेंनी त्यांना नेहमीप्रमाणे दमात घेण्याचा प्रयत्न केलाच, ‘तुमचं अन्‌ अजितदादांच्या गुप्त संभाषणाचं रेकॉर्ड माझ्याकडं आहेच.  पुण्याला गेलो की पुरवतो देवेंद्रांना.’ आता पुण्याचा अन्‌ ‘नागपूरकरां’चा काय संबंध, असा सवाल हळूच एका कमळवाल्या कार्यकर्त्यानंच चंद्रकांतदादांच्या कानात विचारला. तेव्हा त्यांनी त्याला गप बसवलं, ‘चूप, माझा तरी काय संबंध. तरीही झालोच ना अनिवासी पुणेकर.’ 

या गोंधळात बाबांना पटोले नानांचा कॉल आला. त्यांनी विचारलं, ‘माझ्या घरासमोर लाल दिव्याची गाडी कधी येऊन थांबणार?’  तेव्हा शांतपणे बाबा म्हणाले, ‘थोरले काका अन्‌ उद्धों यांच्यात चर्चा झाल्यानंतर.’ ‘आता त्यांच्या चर्चेशी आपला काय संबंध?’ -  नानांनी तिकडून गोंधळून विचारलं.

‘सध्या प्रत्येक घटना त्यांच्यात चर्चा झाल्यानंतरच घडत असते हो नाना. दिल्लीतल्या यांच्या नमोंच्या भेटीही एकमेकांना सांगूनच झालेल्या असतात.  तुम्हाला सीएम व्हायचं असेल तर सबुरीनं घ्या, असे एवढे एक्साईट होऊ नका.’

 हा फोन बंद होतो ना होतो तोच थेट अजितदादांचा कॉल बाबांना, ‘सीएम कुणी व्हायचं, हे आमचे काका ठरवतात..  अन्‌ या सीएमनी पायउतार कधी व्हायचं हे मी ठरवतो.  विसरलात का.. तुम्ही पुन्हा सीएम होऊ नये म्हणून माझ्याही डीसीएम पदाला मी ठोकरलं होतं चौदा साली.’ 

- फोन खडाऽऽक…

उद्धोंच्या सहनशीलतेला ‘दाद अन् शुभेच्छा’ देत मुनी पुन्हा परत फिरले. नारायणऽऽ नारायणऽऽ
 
Sachin.javalkote@lokmat.com

Web Title: irony on political situation in maharashtra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.