भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 08:06 IST2026-05-15T08:04:48+5:302026-05-15T08:06:03+5:30
सोने खरेदीचा निर्णय सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांनी प्रभावित झालेला वैयक्तिक आर्थिक निर्णय असतो हे खरे, तरी तो मोह टाळलेलाच बरा!

भारतीय रोज किती सोने खरेदी करतात? सरासरी दोन टन!
-डॉ. संजय खडक्कार (माजी तज्ज्ञ सदस्य, विदर्भ वैधानिक विकास मंडळ)
वाढत्या आयातीमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवर होणारा परिणाम लक्षात घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना सोने खरेदी कमी करण्याचे आवाहन केले आहे. भारतीयांनी खरोखरच सोने खरेदी करताना हात आखडता घ्यायला हवा आहे का?
भारतीय प्रामुख्याने सांस्कृतिक, सामाजिक आणि आर्थिक कारणांसाठी सोने खरेदी करतात, त्याला एक सुरक्षित गुंतवणूक, समृद्धीचे प्रतीक आणि उत्सवांचा एक अविभाज्य भाग मानतात. महागाईपासून संरक्षण आणि कुटुंबांसाठी, विशेषतः ग्रामीण भागातील घरांसाठी, संपत्तीचे एक तरल, सहज वाहून नेता येण्याजोगे स्वरूप म्हणून सोने काम करते.
सोने हे लक्ष्मीचे, समृद्धीचे, पवित्रता व नशिबाचे प्रतीक मानले जाते. घरात संपत्तीचे आगमन व्हावे यासाठी धनत्रयोदशी आणि अक्षय तृतीयेसारख्या दिवशी सोन्याची खरेदी केली जाते. गुरुपुष्यामृत योग हा सोने-चांदी खरेदीसाठी लाभदायक मानला जातो. सोने हे भारतीय विवाहसोहळ्यांचा एक आधारस्तंभ आहे आणि प्रतिष्ठेचे प्रतीकही !
सोने ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक मानली जाणारी वस्तू आहे; जी चलनवाढ आणि आर्थिक अनिश्चिततेपासून संरक्षण देते. याचा उपयोग अनेकदा आर्थिक सुरक्षा कवच म्हणून केला जातो. सोन्याला ‘अत्यंत तरल’ मालमत्ता मानले जाते, कारण ते जगाच्या कोणत्याही कोपऱ्यात कधीही विकून किंवा गहाण ठेवून पैसे मिळवता येतात. भारतात कुटुंबे सोन्याला एक दीर्घकालीन मालमत्ता मानतात. ही मालमत्ता पिढ्यान्पिढ्या हस्तांतरित केली जाते.
असे असूनही, भारत सोन्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आयातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे. भारताची ९० टक्क्यांपेक्षा जास्त सोन्याची गरज आयातीद्वारे पूर्ण केली जाते. भारत दरवर्षी अंदाजे ७०० ते ८०० टन सोन्याचा वापर करतो. देशांतर्गत उत्पादन फक्त १ ते २ टन इतकेच मर्यादित आहे. वर्ल्ड गोल्ड कौन्सिलच्या मते, भारतात दररोज सरासरी २.२ टन सोने खरेदी केले जाते, ज्याचे मूल्य अंदाजे २००० ते २२०० कोटी रुपये इतके असते. भारताची आर्थिक वर्ष २०२५-२६ मधील सोन्याची आयात मागील वर्षाच्या तुलनेत २४ टक्के वाढीसह ७१.९८ अब्ज डॉलर्सच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचली आहे.
भारताला सोन्याची आयात प्रामुख्याने अमेरिकन डॉलरमध्ये करावी लागते. जेव्हा डॉलरचा ओघ परदेशात वाढतो, तेव्हा भारतीय रुपया कमकुवत होतो आणि परकीय चलन साठ्यावर दबाव येतो. ही खरेदी डॉलरमध्ये होत असल्याने, मोठ्या प्रमाणावर विदेशी चलन खर्च होते, ज्यामुळे व्यापार तूट वाढते. डॉलरच्या तुलनेत रुपया कमकुवत होत असल्याने सोन्याची आयात करण्यासाठी जास्त रुपये मोजावे लागतात.
चीननंतर भारत हा जगातील दुसरा सर्वात मोठा सोन्याचा उपभोक्ता आहे आणि आयातीद्वारे प्रामुख्याने दागिन्यांची मागणी पूर्ण केली जाते. २ मार्च २०२६ रोजी आरबीआयने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, सोन्याच्या वाढलेल्या आयातीचा परिणाम चालू खात्यातील तुटीवर झाला आहे, जी डिसेंबर तिमाहीत १३.२ अब्ज डॉलर्स किंवा जीडीपीच्या १.३ टक्क्यांपर्यंत वाढली.
भारताने मार्च, २०२६ मध्ये ३.०६ अब्ज डॉलर किमतीच्या सोन्याची आयात केली, जी फेब्रुवारीच्या ७.४५ अब्ज डॉलरच्या तुलनेत ५८.९ टक्क्यांनी आणि मागील वर्षाच्या तुलनेत ३१.६ टक्क्यांनी कमी आहे, याचे मुख्य कारण सोन्याच्या किमतीत वाढ. मार्च २०२६ मध्ये भारताच्या परकीय चलन साठ्यात ४० अब्ज डॉलर्सहून अधिक घट झाली असून, देशाचा व्यापार घाटा वाढून ११९.३० अब्ज डॉलर्सवर पोहोचला आहे.
नागरिकांनी सोन्याची खरेदी कमी केली, तर देशाचा आयात खर्च कमी होईल. यामुळे डॉलरची बचत होऊन परकीय चलनसाठा मजबूत राहील आणि अर्थव्यवस्थेला स्थिरता मिळेल. देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी भारतीयांनी किमान वर्षभर सोन्याची अनावश्यक खरेदी एका वर्षासाठी पुढे ढकलावी. सोने खरेदीचा निर्णय सांस्कृतिक आणि आर्थिक घटकांनी प्रभावित झालेला वैयक्तिक आर्थिक निर्णय असतो हे खरे; पण आताच्या परिस्थितीत ते सामंजस्याचे लक्षण असेल.