वाढत्या महागाईमुळे आधीच मेटाकुटीला आलेल्या सर्वसामान्य नागरिकांच्या जखमेवर आता पुन्हा एकदा मीठ चोळले गेले आहे. देशात आजपासून (१५ मे २०२६) इंधन दरात प्रति लिटर ३ रुपयांहून अधिक वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्याने जीवनावश्यक वस्तू, प्रवास खर्च आणि बचतीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.
जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत वाढ
डिझेलच्या किमती वाढल्यामुळे ट्रक आणि टेम्पो यांसारख्या मालवाहतुकीचा खर्च वाढतो. याचा थेट परिणाम भाजीपाला, फळे, दूध आणि अन्नधान्य यांसारख्या रोजच्या वापरातील वस्तूंच्या किमतींवर होतो. मालवाहतूक महागल्याने ग्राहकांपर्यंत पोहोचेपर्यंत या वस्तूंच्या किमती ५ ते १० टक्क्यांनी वाढू शकतात.
मासिक प्रवास खर्चात वाढ
टू-व्हीलर किंवा फोर-व्हीलर वापरणाऱ्या नोकरदारांच्या इंधनावरील मासिक खर्चात किमान ५०० ते १,५०० रुपयांची वाढ होऊ शकते. तसेच रिक्षा, टॅक्सी आणि खाजगी बसच्या भाड्यांमध्येही वाढ होण्याची शक्यता असते. शिवाय, एसटी किंवा बसची भाडेवाढ झाल्यास रोज प्रवास करणाऱ्यांच्या बजेटवर मोठा ताण येतो.
बचतीवर परिणाम
घरगुती खर्चात वाढ झाल्यामुळे मध्यमवर्गीय कुटुंबांच्या बचतीमध्ये घट होते. गुंतवणुकीसाठी किंवा आपत्कालीन परिस्थितीसाठी बाजूला काढले जाणारे पैसे इंधन आणि महागाईमुळे खर्च करावे लागतात.
नाशिकमध्ये पेट्रोल १०७ च्या पार
मुंबईत पेट्रोलच्या दरात ३.१४ रुपयांची वाढ होऊन ते १०६.६८ रुपये प्रति लिटरवर पोहोचले आहे. तर, डिझेल ३.११ रुपयांनी महागून ९३.१४ रुपये प्रति लिटर झाले आहे. या दरवाढीमुळे सर्वसामान्यांच्या मासिक बजेटचे कंबरडे मोडले आहे. राज्यात सर्वाधिक फटका नाशिककरांना बसला असून नाशिककरांना आता पेट्रोलसाठी १०७.९३ रुपये तर डिझेलसाठी ९४.४१ रुपये मोजावे लागणार आहेत. केवळ मुंबई आणि नाशिकच नव्हे, तर पुणे, ठाणे, सोलापूर, संभाजीनगर, जळगाव, कोल्हापूर, नागपूर आणि परभणी या सर्व प्रमुख शहरांमध्येही इंधन दरात वाढ नोंदवण्यात आली आहे.
