अग्रलेख: समृद्ध वारसा, अस्वस्थ आरसा! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा धक्कातंत्र पॅटर्न!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 11:12 IST2026-01-21T11:10:46+5:302026-01-21T11:12:18+5:30
एकीकडे ५५व्या वर्षी संदीप जोशींची राजकीय निवृत्ती, दुसरीकडे ४५व्या वर्षी नितीन नबीन 'बॉस'

अग्रलेख: समृद्ध वारसा, अस्वस्थ आरसा! भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा धक्कातंत्र पॅटर्न!
छत्तीसगड, मध्य प्रदेश किंवा राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदी जसे नवे चेहरे देण्यात आले, तशाच धक्कातंत्रासह टीकाकारांच्या भाषेतील ‘पर्ची’ ‘भाजप’च्या अध्यक्षपदासाठीदेखील निघाली. जेमतेम ४५ वर्षांचे नितीन नबीन गेल्या महिन्यात पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष तर आता अध्यक्ष झाले. भाजप नेहमीच सामान्य कार्यकर्त्यांना महत्त्वाची पदे देतो, राजकीय वारसा किंवा घराणेशाही हा त्या निवडीचा निकष नसतो, हा दावा अधिक मोठ्या आवाजात करता येईल, अशी ही निवड आहे. त्यासाठी पक्षांतर्गत निवडणूक, नामांकन, सूचक व अनुमोदकांकडून प्रस्ताव ही औपचारिकता पूर्ण करून नितीन नबीन अध्यक्षपदी विराजमान झाले. त्यांच्या पदग्रहणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह तसेच मावळते अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा आणि केंद्रीय मंत्रिमंडळात महत्त्वाची खाती सांभाळणारे नितीन गडकरी व राजनाथ सिंह हे पक्षाचे माजी अध्यक्ष उपस्थित होते.
आपण आधी पक्षाचा कार्यकर्ता व नंतर पंतप्रधान असल्याने नितीन नबीन आपले ‘बाॅस’ आहेत, अशा शब्दांत पंतप्रधानांनी या निवडीचे महत्त्व अधोरेखित केले. भाजपच्या घटनेनुसार ही निवड तीन वर्षांसाठी असली तरी जे. पी. नड्डा किंवा अमित शाह यांच्या कार्यकाळाचा अनुभव पाहता पुढच्या २०२९ मधील लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अध्यक्ष बदलण्याचा प्रयोग केला जाणार नाही. तत्पूर्वी, येत्या वर्ष-दोन वर्षांत पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडूमध्ये पक्ष सत्तेवर आणण्याचे अवघड शिवधनुष्य नितीन नबीन यांना पेलायचे आहे आणि आसाम व इतर राज्यांमध्ये भाजपची सत्ता कायम ठेवायची आहे. अर्थातच, त्यांच्यावर या निवडणुकांचा खूप ताण नसेल. कारण, पंतप्रधान मोदी हेच या निवडणुकांमध्ये भाजपचा चेहरा असतील आणि निवडणुकांची व्यूहरचना अमित शाह यांच्या हातात असेल.
पक्षाचे बारावे अध्यक्ष म्हणून नितीन नबीन यांना स्वर्गीय अटलबिहारी वाजपेयी, वयोवृद्ध लालकृष्ण अडवाणी व मुरली मनोहर जोशी, दिवंगत कुशाभाऊ ठाकरे, बंगारू लक्ष्मण, जना कृष्णमूर्ती, माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू आदींचा वारसा पुढे चालवायचा आहे. या दिग्गजांच्या रांगेत विराजमान होण्याची काही वैशिष्ट्ये आहेत, तसेच माजी अध्यक्षांचा संदर्भ विचारात घेता काही साम्यस्थळेही आहेत. एकतर, ६ एप्रिल १९८० ला भाजपची स्थापना झाल्यानंतर जन्मलेले ते अध्यक्ष आहेत. त्यांचा जन्म २३ मे १९८० चा. वडील नबीन किशोरप्रसाद सिन्हा चारवेळचे आमदार. २००६ मध्ये वडिलांच्या निधनानंतर नितीन नबीन यांनी पश्चिम पाटण्यातून पोटनिवडणूक जिंकली आणि त्या विजयासह पाचवेळा ते बिहार विधानसभेवर निवडून गेले आहेत. चारवेळा ते बांकीपूर या कायस्थबहुल मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करतात. पंधरा वर्षांपूर्वी ५२ वर्षीय नितीन गडकरी पक्षाचे अध्यक्ष झाले तेव्हा ते तोपर्यंतचे तरुण अध्यक्ष होते.
राष्ट्रीय अध्यक्षपदावर जाण्यापूर्वी ते सहावेळा महाराष्ट्र विधान परिषदेचे सदस्य होते. दोन्ही नितीन अध्यक्ष बनण्यापूर्वी आपापल्या राज्यात रस्ते बांधकाम खात्याचे मंत्री होते. नितीन गडकरी आधी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष राहिले होते. नितीन नबीन मात्र या तुलनेत अगदीच अननुभवी म्हणावे लागतील. या अशा नवखेपणाचे काही फायदे असतात. नव्या चेहऱ्याकडून कोणी चमत्काराची अपेक्षा करीत नाही. तसेही केरळ, प. बंगाल किंवा तामिळनाडूमध्ये हुलकावणी देणारी सत्ता वगळता शक्तिमान भाजपने शक्ती पणाला लावून मिळवावे, असे फार काही नाही. पक्षाच्या यशाचा वारू चाैफेर उधळला आहे.
नरेंद्र मोदी व अमित शाह यांचे बलवान बाहू आणि मजबूत पक्षसंघटना नितीन नबीन यांच्यासाठी उपलब्ध आहे. तरीदेखील नव्या अध्यक्षांचे संघटनकाैशल्य निष्ठावंतांच्या भावनेबाबत मात्र पणाला लागेल. अन्य पक्षांमधील सत्तालोलूप नेत्यांनी दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप जवळ केला आहे आणि विरोधक शिल्लकच नकोत, या विचारातून इतर पक्षात जो जो प्रबळ त्याला जवळ करण्याचे धोरण पक्षाने राबविले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी असंगाशी संग झाला आहे. वर्षानुवर्षे पक्षासाठी कष्ट उपसणारे निष्ठावंत अस्वस्थ आहेत. महाराष्ट्रात माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या तोंडून ही अस्वस्थता आधी व्यक्त झाली. काल मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय आमदार संदीप जोशी यांनी तिचा उल्लेख करीत अवघ्या ५५ व्या वर्षी राजकारणातून संन्यास जाहीर केला. ही घुसमट, या उक्ती व कृती प्रातिनिधिक, प्रतीकात्मक समजून पावले उचलली तर भाजपच्या इतिहासात या तरुण अध्यक्षांच्या कामगिरीची विशेषत्वाने नोंद होईल.