शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2026 13:13 IST2026-04-24T13:13:18+5:302026-04-24T13:13:18+5:30
शेजारणीकडे घराची चावी देणे चारकोपमधील एका महिलेला चांगलेच महागात पडले.

शेजारणीकडे दिली घराची चावी अन् तिजोरीच गायब, ३४ लाख रुपयांचे दागिने चोरीला!
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : शेजारणीकडे घराची चावी देणे चारकोपमधील एका महिलेला चांगलेच महागात पडले. शेजारणीने डुप्लिकेट चावी बनवून घरातून ३४ लाख ८ हजार रुपयांच्या दागिन्यांची तिजोरी पळवण्यास साथीदाराला मदत केल्याचे उघड झाले. याप्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह दोघांना साताऱ्यातून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेला मुद्देमाल हस्तगत केल्याचे परिमंडळ ११ चे पोलिस उपायुक्त संदीप जाधव यांनी गुरुवारी सांगितले. दरम्यान, दोन्ही आरोपींना न्यायालयाने २३ एप्रिलपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
साताऱ्यातून अटक
मोहिनी चौधरी (वय, ४०) या चारकोपच्या सेक्टर आठमधील माउलीकृपा सोसायटीमध्ये राहतात. १२ एप्रिलच्या रात्री घरात कोणीही नसताना अज्ञात आरोपीने घरफोडी करून २४० ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने असलेली तिजोरी चोरी केल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दिली. त्यानुसार गुन्हा नोंदवत चारकोप पोलिसांनी तपास सुरू केला. सहायक पोलिस आयुक्त नीता पाडवी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने घटनास्थळी भेट दिली. सीसीटीव्ही फुटेजद्वारे तपासात आरोपी हा ४३ वर्षीय असून, साताऱ्याच्या कोरेगाव परिसरातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचून त्याला राहत्या घरातून ताब्यात घेतले.