पर्यटन करा, पण सावध! गोव्यात दलालांची संख्या वाढलीय; पर्यटकांना आर्थिकदृष्ट्या फसवू पाहतात
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2026 08:01 IST2026-05-02T08:00:37+5:302026-05-02T08:01:06+5:30
पोलिसांकडे तक्रारी गेल्यानंतर पोलिस अटकही करतात, पण सगळीकडेच पोलिस पोहचू शकत नाहीत. सर्वच पर्यटक तक्रारही करायला जात नाहीत.

पर्यटन करा, पण सावध! गोव्यात दलालांची संख्या वाढलीय; पर्यटकांना आर्थिकदृष्ट्या फसवू पाहतात
उन्हाळा सगळीकडेच त्रास देतोय. रणरणत्या उन्हात जीव कासावीस होतोय. अशावेळी कुणी थंड हवेच्या प्रदेशात पर्यटनासाठी जातात, तर कुणी समुद्रस्नान करण्यासाठी गोव्याची वाट धरतात. गोव्यात आतादेखील लाखो पर्यटक आलेले आहेत. एप्रिलच्या सुरुवातीला पर्यटकांचे आगमन सुरू झाले. विदेशी पाहुणे आहेतच, शिवाय कर्नाटक, महाराष्ट्र, केरळ अशा ठिकाणचे देशी पर्यटकही आहेत. सागरकिनारे पर्यटकांनी फुलले आहेत. हवेत उष्णता असली, तरी निसर्गरम्य गोव्यात समुद्रस्नान करणे व गोमंतकीय खाद्य संस्कृती अनुभवणे म्हणजे ‘जिवाचा गोवा करणे’, असा अर्थ होतो.
उत्तर व दक्षिण गोव्याची मनोहारी किनारपट्टी जगात प्रसिद्ध आहे. रुपेरी वाळू अंगावर मिरवणाऱ्या स्वच्छ सुरेख किनाऱ्यावर सायंकाळी फिरत सूर्यास्ताचे केशरी अनुपम सौंदर्य अनुभवायला सर्वांनाच आवडते. त्यामुळेच बॉलिवूड स्टार, देशातील नामवंत क्रीडापटू, संगीतकार, उद्योजक आणि प्रस्थापित राजकारणी यांना गोव्याची भूमी भुरळ पाडते. आता विद्यार्थ्यांची सुट्टी सुरू झाली आहे. पर्यटकांच्या गाड्या गोव्याकडे वळल्या आहेत. मुरगाव बंदरातून पर्यटकांनी भरलेली जहाजेही येऊ लागली आहेत. आंब्याचा मोसम आहे. मे महिन्यात पाहुण्यांची गर्दी आणखी वाढेल. मांडवी नदीत जलसफरीचा आनंद लुटत खा, प्या, मजा करा, असा संदेश पर्यटक एकमेकांना देतात, असे चित्र आता रोज सायंकाळी नजरेस पडते.
उर्वरित देशाच्या तुलनेत गोव्यात अधिक सुरक्षित वातावरण असल्याने विदेशी पाहुणे या प्रदेशात अधिक रमतात. पोलिसांचा जास्त त्रास नाही. पोर्तुगीजकालीन वास्तूशास्त्राचा उत्कृष्ट नमुना असलेली जुन्या काळातील घरे किंवा पांढऱ्याशुभ्र चर्चेस युरोपीयन पर्यटकांना आकर्षित करतात. मात्र, अलीकडे ज्या घटना घडत आहेत, त्यापासून बोध घेणेही गरजेचे आहे. राज्यात दलालांची संख्या वाढलीय. पर्यटकांना दलाल फसवतात. चार दिवसांपूर्वीच राजधानी पणजीत पोलिसांनी दहा दलालांना अटक केली. पर्यटकांचे एखादे कुटुंब दिसले की, हे दलाल धावत येतात. आपण तुम्हाला जलक्रीडा असलेल्या भागात नेतो किंवा कसिनो जुगाराचे केंद्र असलेल्या जहाजावर नेतो किंवा चांगले हॉटेल दाखवतो, असे सांगून पर्यटकांना आर्थिकदृष्ट्या फसवू पाहतात. पर्यटकांना याचा खूप त्रास होतो.
पोलिसांकडे तक्रारी गेल्यानंतर पोलिस अटकही करतात, पण सगळीकडेच पोलिस पोहचू शकत नाहीत. सर्वच पर्यटक तक्रारही करायला जात नाहीत. मिरामारसह कळंगुट वगैरे किनारे खूप प्रसिद्ध आहेत. या किनाऱ्यांच्या परिसरात फिरताना पर्यटकांना काळजी घ्यावीच लागेल. पुरुष पर्यटकांना गाठून त्यांना काही दलाल मोबाइलवर मुलींचे फोटो दाखवतात. अशा प्रकारच्या तरुणी मौजमजेसाठी उपलब्ध आहेत, आपण तुम्हाला त्या उपलब्ध करू, असे खोटेच सांगितले जाते. काही पर्यटक भुलतात. गोवा म्हणजे थायलंड नव्हे, हे काहीवेळा मद्य रिचवलेल्या पर्यटकांच्या लक्षात येत नाही. दलाल त्यांना एखाद्या क्लबमध्ये किंवा मद्यालयात नेतात. तिथे प्रत्यक्षात मुली उपलब्ध असतच नाहीत, पण पर्यटकांनी अगोदरच दलालांना पाच-दहा हजार रुपये दिलेले असतात. मग, फसवणूक झाली म्हणून पर्यटक पोलिस स्थानकावर धाव घेतात. अनेकदा लज्जेपोटी पर्यटक पोलिसांकडेही जात नाहीत. दलालही त्यावेळी अन्यत्र पसार होतात. ‘लडकी चाहिए क्यां’, असे गोव्यातीलच एका आमदाराला मध्यंतरी एका किनाऱ्यावर दलालाने विचारले होते. त्या आमदाराने मग गोवा विधानसभेत या एकूण प्रकाराबाबत आवाज उठवला.
महाराष्ट्र किंवा कर्नाटक व अन्य प्रदेशांतून येणाऱ्या पर्यटकांना गोवा म्हणजे चंगळवाद व भोगाचे ठिकाण, असे वाटण्यास हे दलाल कारणीभूत आहेत. यापूर्वी पर्यटन मंत्री रोहन खंवटे यांनी, दलालांना तुरुंगात डांबण्याची सूचना पोलिसांना केली होती. त्यावेळी मोठ्या प्रमाणात धरपकडही झाली होती, पण फसवणुकीचे प्रकार थांबलेले नाहीत. गोव्यात सुबक सुंदर आकाराची देखणी मंदिरे आहेत. जुनेगोवे येथे शेकडो वर्षांपूर्वीचे चर्च आहेत. अशा परिसरांना पर्यटकांनी भेट द्यावीच, पण पणजीतील कसिनोंच्या आसपास फिरताना मात्र अधिक काळजी घ्यावी. तरंगत्या जहाजांवरील कसिनोच्या दिशेने असलेल्या रस्त्याच्या कडेला दलालांचा वावर सायंकाळी वाढतो. काहीवेळा हॉटेलांमध्ये पैसे, बॅगा वगैरे ठेवून आलेले पर्यटक आपली बॅग हॉटेलमधूनच पळवली गेली, अशाही तक्रारी करतात. किनाऱ्यांवर फिरताना बेवारस कुत्री चावण्याच्याही घटना घडत आहेत. याबाबतही अधिक सतर्क राहण्याची गरज आहे. गोव्यात ज्या ठिकाणी समुद्रस्नानास बंदी आहे, तिथे उतरण्याचा धोका पर्यटकांनी पत्करू नये. दर आठवड्याला किनाऱ्यांवरील जवानांना समुद्रात उडी टाकून दोन-चार पर्यटकांचा जीव वाचवावा लागतो, हे लक्षात घ्यावे लागेल.