डायग्नोसिस अँड बियॉंड -पांढऱ्या कोटामागची गोष्ट !
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2026 11:29 IST2026-04-18T11:29:21+5:302026-04-18T11:29:37+5:30
पन्नास वर्षांचा वैद्यकीय प्रवास केलेले डॉ. अरुण किनरे सांगतात, ‘आरोग्य म्हणजे रिपोर्ट नॉर्मल असणं नाही. रात्री शांत झोप लागणं, हे उत्तम आरोग्य!’

डायग्नोसिस अँड बियॉंड -पांढऱ्या कोटामागची गोष्ट !
- मृणाल कुलकर्णी
(ख्यातनाम अभिनेत्री, लेखिका)
“न केवलम् औषधं ददाति वैद्यः; सः जीवनदायकः भवति.” - डॉक्टर केवळ औषध देत नाही, तो जीवन देतो. - डॉ. अरुण किनरे यांच्या ‘डायग्नोसिस अँड बियाँड’ या पुस्तकाचा गाभा याच एका ओळीत सामावला आहे.
५० वर्षांच्या प्रदीर्घ सेवेनंतर त्यांना जाणवलं की, डॉक्टरचं काम रिपोर्ट पाहून आजार शोधण्यापुरतं मर्यादित नाही. त्या कोरड्या निदानाच्या पलीकडे एक ‘कथानक’ असतं. तिथे रुग्णाची भविष्याबद्दलची भीती असते, उरलेल्या आयुष्याच्या आशा असतात, मुलाबाळांची काळजी असते आणि संपूर्ण कुटुंबाची विस्कटलेली घडी सावरण्याचा संघर्ष असतो. ‘डायग्नोसिस’ म्हणजे आजाराचं नाव शोधणं. ‘बियाँड’ म्हणजे त्या नावामागचा माणूस शोधणं. डॉ. किनरे स्वतः कॅन्सर आणि हृदयाच्या गंभीर विकारांना सामोरे गेले. त्या अनुभवाने त्यांचा दृष्टिकोन बदलला. ते सांगतात, “इंजेक्शन टोचताना जितकं दुखतं, त्यापेक्षा ‘रिपोर्ट नॉर्मल येईल का?’ ही वाट बघणं जास्त दुखतं.” स्वत: पेशंट झाल्यावर त्यांना कळलं की, रुग्णाला माहितीपेक्षा धीर जास्त हवा असतो. तेव्हापासून त्यांच्या प्रत्येक प्रिस्क्रिप्शनमध्ये एक न लिहिलेली ओळ कायम राहिली – ‘घाबरू नका, मी आहे’.
डॉ. किनरे रुग्णांकडे केवळ ‘केस’ म्हणून पाहत नाहीत. त्यांच्यासाठी रुग्ण हे गुरू आहेत. एका १२ वर्षांच्या ‘ट्रिप्लेट’ मुलीने त्यांना मृत्यूला हसतमुखाने सामोरं जाण्याचा धडा दिला. कॅन्सरच्या शेवटच्या स्टेजला ती म्हणाली, “डॉक्टर, तुम्ही रडू नका. मी झोपणार आहे फक्त.” असे धडे कोणत्याच मेडिकल कॉलेजात शिकवले जात नाहीत. ते ओपीडीमध्ये बाहेरच्या बाकावर बसलेले पेशंट शिकवतात. पन्नास वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये पैशांपेक्षा कृतज्ञतेचे अनोखे अनुभव त्यांना जास्त मोलाचे वाटतात.
एक निवृत्त फिजिओथेरपिस्ट फी ऐवजी त्यांच्या खांद्याचा मसाज करून गेले. एक गरीब माऊली घरगुती लाल मिरचीचं लोणचं देऊन गेली. डॉ. किनरे म्हणतात, “बँक बॅलन्स आठवत नाही, पण लोणच्याच्या बरण्या किती भरल्या ते आठवतं. हीच माझी खरी संपत्ती. ती इन्कम टॅक्समध्ये येत नाही, पण मनात व्याजासह वाढत राहते!’
सोनोग्राफी तज्ज्ञ म्हणून काम करताना त्यांचा डावा मेंदू स्क्रीनवरची एक मिलीमीटरची गाठ शोधत असतो आणि उजवा मेंदू पेशंटच्या आवाजातला कंप. तेही एकाच वेळी... कारण त्यांच्या मते, “स्क्रीनवर दिसणारा ट्यूमर शरीरात असतो, पण मनातली भीती घरात पसरते. प्रोब एका हातात आणि धीर दुसऱ्या हातात – हा माझा समतोल आहे.”
डॉ. किनरे यांचं अनाथ मुलांशी भावनिक नातं आहे. “त्यांच्या रिपोर्टपूर्वी त्यांचे डोळे तपासावे लागतात. तिथे ‘नकार’ साठलेला असतो,” ते सांगतात. त्यांनी वाघिणीपासून गावातल्या कुत्र्यापर्यंत शेकडो मुक्या प्राण्यांची सोनोग्राफी केली आहे. त्यांना जाणवलं, “माणूस दुखणं बोलून दाखवतो, प्राणी फक्त डोळ्यांनी सांगतो. वेदनेला भाषा नसते. माणुसकी ही फक्त माणसापुरती मर्यादित ठेवू नये.’
बेकायदेशीर गर्भलिंग चाचणी असो किंवा कोविड काळातील बनावट लसीकरण प्रमाणपत्र – अशा अनैतिक कामांना त्यांनी नेहमीच कडाडून विरोध केला. “पैसा आज जातो, उद्या येतो. पण एकदा नीतिमत्ता गेली की ती परत येत नाही. पांढरा कोट म्हणजे ‘चारित्र्याचा जाहीरनामा’ आहे. त्यावर डाग पडू द्यायचा नाही,” हा त्यांचा ठाम निर्धार.
५० वर्षांनंतर डॉ. किनरे यांच्यासाठी ‘आरोग्य’ म्हणजे रिपोर्ट नॉर्मल असणं नाही. तर, “रात्री शांत झोप लागणं, सकाळी हसून उठणं आणि कुटुंबासोबत एक घास सुखाने खाता येणं – हे आरोग्य.” ‘बियाँड डायग्नोसिस’चा विचार प्रत्येक डॉक्टरने आणि समाजानेही आत्मसात करण्यासारखा आहे. कारण, शेवटी औषधाने शरीर बरं होतं, पण सन्मानाने आणि मायेने मन बरं होतं. अमेय प्रकाशनाने प्रसिद्ध केलेलं हे पुस्तक प्रत्येकाने आवर्जून वाचावं आणि संग्रही ठेवावं असं आहे !