राष्ट्र आराधनेचे शताब्दी पर्व! जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2025 08:05 IST2025-10-02T08:04:41+5:302025-10-02T08:05:21+5:30
‘पंच परिवर्तना’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे.

राष्ट्र आराधनेचे शताब्दी पर्व! जगातील सर्वात मोठी सांस्कृतिक संघटना
योगी आदित्यनाथ
मुख्यमंत्री, उत्तर प्रदेश
भारतभूमी ही त्याग, तपस्या आणि धर्माची अखंड परंपरा जपणारी आहे. संकटांच्या काळात या भूमीतूनच जागृतीच्या ज्वाला उठल्या आणि जनमानसाला नवी दिशा मिळाली. १९२५ साली नागपूरमध्ये डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांनी प्रज्वलित केलेली एक छोटी ज्योत आज ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघ’ या जगातील सर्वात मोठ्या स्वयंसेवी सांस्कृतिक संघटनेचा अखंड राष्ट्रदीप बनली आहे.
संघाचा जन्म हा राजकीय महत्त्वाकांक्षेतून नव्हे, तर भारतीय आत्म्याच्या ऊर्जेतून झाला. जेव्हा समाज अंतर्बाह्य सुदृढ, संघटित आणि चरित्रवान बनेल, तेव्हाच स्वातंत्र्याचे सार्थक होईल अशी डॉ. हेडगेवार यांची भावना होती. त्यामुळे संघाची शाखा ही केवळ खेळ अथवा व्यायामाची जागा नसून चरित्रनिर्मितीची कार्यशाळा ठरली.
आज संघाच्या ८३ हजार शाखा आणि लाखो सेवा प्रकल्प शिक्षण, आरोग्य, ग्रामविकास, आपत्ती निवारण यांसारख्या क्षेत्रात कार्यरत आहेत. स्वातंत्र्यानंतरच्या निराशाजनक काळातही संघाने सेवाभावातून राष्ट्राला सकारात्मक दिशा दिली. युद्धकाळ असो वा नैसर्गिक आपत्ती – स्वयंसेवक नेहमी आघाडीवर राहिले. श्रीरामजन्मभूमी आंदोलनातही संघाचे शिस्तबद्ध नेतृत्व निर्णायक ठरले. डॉ. हेडगेवारांनंतर गुरुजी गोळवलकर, बाळासाहेब देवरस, रज्जुभय्या, सुदर्शनजी आणि आता डॉ. मोहन भागवत यांनी संघाला काळानुरूप दिशा दिली. या प्रवासातूनच देशाला पं. दीनदयाल उपाध्याय यांचे एकात्म मानवदर्शन, अटल बिहारी वाजपेयी यांचे उदार राष्ट्रवाद आणि आजचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे कार्यक्षम नेतृत्व लाभले.
आजच्या जागतिकीकरणाच्या काळात जेव्हा संस्कृती आणि कुटुंबसंस्था डळमळीत दिसतात, तेव्हा संघाची उपयुक्तता अधिकच ठळक होते. भारताचे भविष्य केवळ तांत्रिक प्रगतीवर नाही तर संस्कार, चरित्र आणि सांस्कृतिक स्थैर्यावर उभारलेले असेल, याचे संघ सतत स्मरण करून देत आला आहे.
शताब्दी पर्व हा केवळ इतिहासाचा उत्सव नसून, नव्या शतकासाठीचा संकल्प आहे. सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, कुटुंबबोधन, स्वदेशी जीवनशैली आणि नागरिक कर्तव्यबोध या ‘पंच परिवर्तनां’तून भारत नवे वैभव गाठेल, हा दृढ विश्वास राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आजच्या शताब्दी सोहळ्यात सामावलेला आहे. शताब्दी पर्वाचा हा क्षण आपल्याला स्मरण करून देतो की गेलेला काळ हा फक्त इतिहास आहे, पण येणारी शताब्दी हे आपले कर्तव्य आहे. जर प्रत्येक भारतीयाने आपल्या अंतःकरणात संघाच्या संस्कारांचा दीप प्रज्वलित केला तर कोणतीही शक्ती भारताला विश्वगुरु होण्यापासून रोखू शकणार नाही.
भारत माता की जय!