‘जीवित अजरामर’ आशाताई : दि लास्ट एम्परर!... राज ठाकरे यांचा विशेष लेख
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2026 09:41 IST2026-04-13T09:39:05+5:302026-04-13T09:41:46+5:30
Asha Bhosle News: आत्ताच्या या क्षणीसुद्धा देशात, जगात लाखो-करोडो लोक आशाताईंचं कुठलं तरी गाणं ऐकत असतील. किती मोठं भाग्य आहे हे ! कुणाला मिळतं?

‘जीवित अजरामर’ आशाताई : दि लास्ट एम्परर!... राज ठाकरे यांचा विशेष लेख
- राज ठाकरे
(अध्यक्ष, मनसे)
‘प्रभुकुंज’मध्ये मी एकदा ‘विम्बल्डन’ची एक जबरदस्त मॅच पाहिली होती. मी आणि लतादीदी सोफ्यावर गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात समोरून मीनाताई आल्या. आमच्या गाण्यांबद्दलच्या गप्पा ऐकून त्याही बसल्या. मग ‘अगं दीदी, ही हरकत अशी नाही अशी आहे’ वगैरे सांगू लागल्या. इतक्यात उषाताई आल्या, त्या गप्पात सामील झाल्या. या गप्पा सुरू असल्याचं पाहून हृदयनाथजी आले. मग दीदींनी ‘अरे बाळ, ते गाणं कुठलं?’ वगैरे विचारणं सुरू झालं. वेगवेगळ्या गाण्यांच्या आठवणी निघू लागल्या, त्या गाण्यांचे मुखडे गायले जाऊ लागले, गाण्यांची बरसात सुरू झाली आणि आशाताई आल्यावर त्या गप्पांची लज्जत अशी काही वाढली की, मला ऐकायला दोन कान कमी पडू लागले.
माझ्यासाठी तर रॉजर फेडरर, नदाल, जोकोविच, अँडी मरे, बोर्ग, बेकर हे सगळे जणू एकाचवेळी खेळत होते. ‘दीदी, हे गाणं तसं नाही गं’, ‘आशा, ही ओळ अशी होती’, ‘उषा, ते जरा गाऊन दाखव बरं’... मी फक्त आणि फक्त श्रवणभक्ती करत होतो. हे सगळं सलग काही तास सुरू होतं. त्या गप्पा आणि चर्चा रेकॉर्ड करता आल्या असत्या तर ती एक चिरंतन स्मृती राहिली असती. मला आजही ती हुरहुर लागून राहिली आहे. ‘आपण किती भाग्यवान आहोत’, असं वाटणारे जे मोजके क्षण आयुष्यात येत असतात त्यातला हा एक क्षण होता!
आशाताई त्यांच्या हजारो गाण्यांच्या रूपात या पृथ्वीतलावर अनंतकाळ कायम राहणार आहेत. आपण सगळे आज आहोत, उद्या नाहीत, तसं यांचं होणार नाही. मला एक घटना आठवते, दीदी गेल्या तेव्हाची. माझा मूड, माझा चेहरा बघून एका व्यक्तीनं मला विचारलं, ‘तुम्हाला खूप वाईट वाटत असेल ना?’ मी म्हटलं, ‘अर्थातच.’ तर तो मला म्हणाला, ‘अहो दीदी होत्या आणि आता त्या नाहीत, हे सगळं तुमच्यासारख्यांसाठी, कारण तुम्ही त्यांना भेटत होता, भेटला होता, प्रत्यक्ष बोलला होता, पण आमच्यासाठी कालही त्यांची गाणी होती आणि उद्याही गाणीच राहणार आहेत. आमच्यासाठी त्या कधीच कुठे जाणार नाहीत.’ तशाच आशाताईसुद्धा ‘जीवित अजरामर’ आहेत. त्यांच्या आवाजाला व्हिसा लागत नाही. तो संपूर्ण पृथ्वीवर सगळीकडे मुक्त संचार करतो. मी हे लिहीत असताना, आत्ताच्या या क्षणीसुद्धा देशात, जगात लाखो-करोडो लोक आशाताईंचं कुठलं तरी गाणं ऐकत असतील. हे कोणाच्या नशिबी येतं का? किती मोठं भाग्य आहे हे! यांची नावं कुणाला कुठं कोरावी लागणार नाहीत. टपाल तिकीटं काढा, पुतळे बनवा, कशाचीही गरज नाही. यांनी जे काही करून ठेवलं आहे, तेच युगानुयुगे पुरून उरणारं आहे. पुढच्या असंख्य पिढ्या यांचीच गाणी गाणार आहेत, खरं तर गाण्याचा प्रयत्न करणार आहेत असं म्हणावं लागेल, कारण यांच्यासारखं गाणं केवळ अशक्य आहे.
भारताच्या सांगीतिक क्षेत्राकडे पाहिलं तर माझ्या मते, संगीताच्या क्षेत्रातली आपली जी श्रेष्ठ आणि संपन्न परंपरा आहे, आशाताई त्या परंपरेतील ‘लास्ट एम्परर’ आहेत. अखेरच्या सम्राज्ञी आहेत. मी काही संगीततज्ज्ञ नाही, मी संगीत क्षेत्रातही नाही. मी केवळ मनापासून गाणी ऐकणारा, संगीताचा आनंद घेणारा माणूस आहे, पण मी एक ठामपणे सांगतो, दीदी आणि आशाताई जर नसत्या तर कित्येक अजरामर गाणी आता आहेत तशी झाली नसती.
दीदी किंवा आशाताई गातात तेव्हा आपल्या लक्षात येतं की, ते अगदी एफर्टलेस वाटतं आपल्याला. खूप सहज वाटतं. त्यांची हीच गाणी दीदी किंवा आशाताईंची महानता आपल्या लक्षात इतर गायक जेव्हा कार्यक्रमांमध्ये गातात तेव्हा येते. त्यांचं मोठेपण तेव्हा ठळकपणे लक्षात येतं. या दोघींचा एक सूरसुद्धा कधीच चुकत नाही, इकडचा तिकडे होत नाही. गाताना श्वास कधी घेतला तेही कळत नाही. मी जेव्हा केव्हा ‘प्रभुकुंज’ समोरून जातो, तेव्हा माझ्या मनात येतं की, आपल्या भारताचा सांगीतिक इतिहास लिहायचा म्हटलं तर या इमारतीच्या एकाच मजल्यावर किमान २५ हजार गाणी आहेत. काजव्यांनी लगडलेलं, लखलखणारं एखादं झाड असावं तशी ही इमारत गाण्यांच्या लखलखत्या सुरांनी लगडलेली आहे. असा चमत्कार जगात कुठे तरी असेल का? साक्षात प्रभूचंच तिथं वास्तव्य आहे, असं म्हणायला हवं.
माझ्या वडिलांकडे आशाताई फक्त एकच गाणं गायल्या आहेत, ‘शूरा मी वंदिले’ या चित्रपटासाठी त्यांनी ‘आज तुजसाठी या पाऊलांना’ हे गाणं म्हटलं होतं. त्या गाण्याच्या रिहर्सलला आणि रेकॉर्डिंगलाही मी त्यांना गाताना पाहिलं होतं. मी फार लहान असेन तेव्हा, त्यामुळे ते मला अंधुकसं आठवतं. बाकी मी त्यांची रेकॉर्डिंग्स काही पाहिलेली नाहीत; परंतु त्यांचा तो रुबाब पाहिल्यावर लक्षात येतं की, या सगळ्या पुरुषप्रधान उद्योगामध्ये या दोन बायकांनी अक्षरशः राज्य केलं. देशपातळीवर असा दरारा असणाऱ्या केवळ तीनच स्त्रिया मी पाहिल्या आहेत. एक लता मंगेशकर, दुसऱ्या आशा भोसले आणि तिसऱ्या इंदिरा गांधी. त्यांच्यापुढे पुरुषही थरथर कापायचे. हा दरारा कर्तृत्वातून, प्रतिभेतून आलेला होता. अखंड श्रम करून मिळवलेला होता. उगाचच आलेला नव्हता.
मागे आशाताईंना गुडघ्याचा काही त्रास होता. त्याचं पुण्यात दीनानाथमध्ये ऑपरेशन झालं होतं. मी भेटायला गेलो होतो. म्हटलं, ‘कशा आहात?’ तर हसत मला म्हणाल्या, ‘उड्या मारून दाखवू? नाचून दाखवू?’ त्यांचा स्वभावच असा आहे. म्हणूनच त्या गाण्यातून अभिनय करतात. कुणालाही त्यांच्यासारखं गाणं शक्य नाही. त्यांच्या गाण्याच्या आसपास सगळे चाचपडत राहतात.
दीदी आणि आशाताईंना आपण प्रत्यक्ष पाहू शकलो हे आपलं नशीब. त्यांचा सत्कार करण्याच्या उंचीचीसुद्धा माणसं आता राहिलेली नाहीत. माझ्या हस्ते एकदा आशाताईंचा सत्कार झाला होता, तेव्हा मी भाषणात म्हणालो होतो की, ‘हा एका गळ्याचा, एका नरड्याने केलेला सत्कार आहे.’ ते ऐकून आशाताईसुद्धा मनापासून हसल्या होत्या. ‘पुलं’चच एक वाक्य आहे, ते सखाराम गटणेला म्हणतात, ‘करोडो लोकांमधून एक असा जन्माला येतो, ज्याच्या आयुष्याला जीवन म्हणतात. बाकीच्यांचं फक्त आयुष्य असतं.’ दीदी आणि आशाताई यांच्या जगण्याला जीवन म्हणतात! त्यांनी आपलं आयुष्य त्यांच्या गाण्यांनी समृद्ध केलं. सुसह्य केलं.
(आशा भोसले यांच्या नव्वदाव्या वाढदिवसानिमित्त प्रसिद्ध झालेल्या ‘स्वरस्वामिनी आशा’ या विशेष संग्रहातून साभार)