Take action against those who call students to school | शाळेत विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

शाळेत विद्यार्थ्यांना बोलविणाऱ्यांवर कारवाई करा

निवेदनात म्हटले आहे की, राज्यात कोरोना संक्रमणामुळे अत्यंत भयावह व गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. हे विचारात घेऊन कोरोना संकटावर मात करण्यासाठी ३० एप्रिलपर्यंत राज्यात कडक लॉकडाऊन घोषित करण्यात आलेला आहे. या संसर्गजन्य आजारांचा फैलाव होऊ नये यासाठी शासनस्तरावर विविध प्रयत्न केले जात आहेत. त्याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून शासनाने शाळेतील शिक्षकांना व कर्मचाऱ्यांना शाळांत ५० टक्के उपस्थिती राहण्यास सुचविले आहे. मात्र, शासनाने घोषित केलेल्या निर्बंधांना जाणीवपूर्वक पायदळी तुडवून काही शाळांचे मुख्याध्यापक शाळेतील सर्व शिक्षक व कर्मचाऱ्यांना तसेच विद्यार्थ्यांनासुद्धा नियमितपणे शाळेत उपस्थित राहण्यास बाध्य करत आहेत. ही अत्यंत गंभीर स्वरूपाची बाब असून, विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांच्या जीवनाशी खेळणारी बाब आहे. धुळे जिल्ह्यातील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे कोविडने होणारे मृत्यूचे प्रमाण सर्वाधिक आहे. अनेक शाळांत कोरोना संकटापासून संरक्षण करण्यासाठी आवश्यक असलेली भौतिक व्यवस्थासुद्धा निर्माण करण्यात आल्या नाहीत. शिक्षक, कर्मचारी व विद्यार्थी यांच्या जीवितास धोका होण्याची शक्यता नाकारता येत नाही. मुख्याध्यापकांच्या या त्रासामुळे शिक्षक कर्मचाऱ्यांचे व विद्यार्थ्यांचे जीवन धोक्यात येऊ शकते. शासनाचे निर्बंध मोडणाऱ्या मुख्याध्यापकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात येईल, अशी ताकीद संबंधिताना देणे आवश्यक आहे. प्रशासनाच्या आदेशाचे काटेकोर पालन व्हावे व विद्यार्थी शिक्षकांना शाळेत बोलावणाऱ्या संस्थांना व मुख्याध्यापकांना कायदेशीर कारवाईचे निर्देश द्यावेत, अशी मागणी करण्यात आलेली आहे.

Web Title: Take action against those who call students to school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.