लोहारा/माणकेश्वर : लोहारा तालुक्यातील कास्ती येथील सरपंचपद एसटी प्रवर्गासाठी तर परंडा तालुक्यातील भांडगावचे सरपंचपद अनुसूचित जाती महिला प्रवर्गासाठी आरक्षित आहे.परंतु या दोन्ही ठिकाणी या आरक्षित प्रवर्गातील सदस्य नसल्याने ही दोन्ही पदे रिक्त राहिली असून, येथे केवळ उपसपंच पदाच्या निवडीची प्रक्रिया पार पडली.
कास्ती (बु.) ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच निवडीसाठी ग्रामपंचायत सदस्यांची विशेष सभा बोलवण्यात आली होती. यावेळी अध्यासी अधिकारी म्हणून ए. आर. पठाण, ग्रामसेवक पवार उपस्थितीत होते. बैठकीस भुजंगराव परसे, शरद साबळे, विशाल चव्हाण, वृदांवनी भंडारे, गायत्री पाटील, सुवर्णा कुंभार, संगीता वाकळे हे हजर होते. या ग्रामपंचायतीचे सरपंचपद हे एसटीसाठी राखीव असून, निवडणुकीत या प्रवर्गातील एकाही उमेदवाराने अर्ज दाखल केला नव्हता. त्यामुळे ती जागा रिक्त राहिली. पर्यायाने सरपंचपदाची निवड होऊ शकली नाही. यावेळी उपसरपंचपदासाठी अखिल बडेसाब तांबोळी यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची बिनविरोध निवड झाली आहे. निवडीनंतर नूतन उपसरपंच व सर्व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष अशोकराव जवळगे, बाळासाहेब पाटील,नगरसेवक अभिमान खराडे,माजी जि. प. सदस्य श्रीरंग पाटील, पॅनल प्रमुख परवेज तांबोळी, पंचायत समिती सदस्य ज्ञानेश्वर परसे, इन्नुस पटेल, नसिम तांबोळी, नागेश चव्हाण, गोविंद चव्हाण, मुकूंद परसे, काकासाहेब चव्हाण, भानुदास भंडारे, महादेव भंडारे, बिभीषण चव्हाण, बालाजी काळे, नेहरु चव्हाण यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते.
परंडा तालुक्यातील भांडगाव ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये श्री गणेश ग्रामविकास आघाडीने सर्वच या सर्व सात जागांवर विजय मिळविला. परंतु, येथील सरपंचपदाचे आरक्षण एसी महिला प्रवर्गासाठी निघाल्याने व प्रवर्गाचा एकही उमेदवार नसल्याने येथील सरपंचपद रिक्त ठेऊन उपसरपंच पदासाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. या पदासाठी बालाजी बिरमल अंधारे यांचाच एकमेव अर्ज आल्याने उपसरपंच पदाची निवडणूक बिनविरोध झाली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून सी. जी. पाकले यांनी काम पाहिले. ग्रामसेवक एस. आर. तरकसे, तलाठी महेश मुकदम, पोलीस पाटील अमोल भोसले यांनी त्यांना सहकार्य केले. यावेळी माजी जि. प. सदस्य महादेव अंधारे, बिभीषण खामकर, विलास अंधारे, राजाभाऊ अंधारे, दत्ता अंधारे, बजरंग अंधारे, मधुकर कोळेकर, सचिन इतापे, मनोज अंधारे, नवनिर्वाचित सदस्य शिल्पा अंधारे, मनिषा अंधारे, हिराबाई इतापे, अलका भोसले, सरस्वती धस, उमेश अंधारे आदी उपस्थित होते. या निवडीनंतर श्री गणेश ग्राम विकास आघाडीच्या समर्थकांनी गुलाल उधळून जल्लोष केला. उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य पदी निवड झालेल्या उमेदवारांचा माजी जि. प सदस्य महादेव अंधारे यांनी सत्कार केला.
मुरळीत सलग तिसऱ्यांदा राष्ट्रवादीचा झेंडा
मुरुम : उमरगा तालुक्यातील मुरळी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसने सलग तिसऱ्यांदा आपला झेंडा फडकविला असून, सरपंचपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नयनाबाई कांबळे तर उपसरपंचपदी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे शमशोध्दीन जमादार यांची बिनविरोध निवड झाली. शमशोध्दीन जमादार हे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुकाअध्यक्ष तथा माजी सरपंच आहेत. त्यांच्या पॅनलला पाच तर काँग्रेस पुरस्कृत पॅनलला दोन जागा मिळाल्या आहेत. सरपंचपद अनुसूचीत जाती जमातीच्या महिलेसाठी राखीव होते.