दरोड्याच्या घटनास्थळास पोलीस अधीक्षकांची भेट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2021 04:23 IST2021-07-16T04:23:21+5:302021-07-16T04:23:21+5:30
वाशी : येथील दरोड्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, याचा छडा लवकरच लावला जाईल, असे आश्वासन जिल्हा ...

दरोड्याच्या घटनास्थळास पोलीस अधीक्षकांची भेट
वाशी : येथील दरोड्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे देण्यात आला असून, याचा छडा लवकरच लावला जाईल, असे आश्वासन जिल्हा पोलीस अधीक्षक राज तिलक रौशन यांनी दिले़
येथील नवीन बसस्थानकाकडे जाणाऱ्या बायपास रोडलगत सौदागर जगताप यांचे घर फोडून चोरट्यांनी घरातील सदस्यांना चाकूचा धाक दाखवून सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना १४ जुलै रोजी पहाटे घडली. यावेळी सौदागर जगताप यांनी प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्यानंतर त्यांच्यावर चाकूहल्ला झाला होता. यामध्ये त्यांच्या नाकास गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर उस्मानाबाद येथील शासकीय रुग्णालयात उपचार चालू आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस अधीक्षक रौशन व अप्पर पोलीस अधिकारी संदीप पालवे यांनी गुरुवारी येथे भेट देऊन घटनास्थळाची पाहणी केली. यावेळी रौशन म्हणाले, ग्रामस्थांनी ग्रामरक्षक दलाची स्थापना करून पोलिसांना सहकार्य करावे. यावेळी सपोनि अशोक चवरे यांच्यासह पोलीस कर्मचारी, माजी नगराध्यक्ष नागनाथ नाईकवाडी, उद्योजक सतीश जगताप आदी हजर होते़
दरम्यान, संवेदनशील झालेल्या वाशी पोलीस ठाण्यात ६२ पोलीस कर्मचारी पदे मंजूर असली तरी सध्या ४७ कार्यरत आहेत. त्यातीलही पाच कर्मचारी इतरत्र प्रतिनियुक्तीवर आहेत. याशिवाय या ठिकाणी असलेल्या दोन पोलीस गाड्यांची अवस्था दयनीय झालेली आहे. चोरांची वाहने सुसाट धावत असताना पोलीस वाहने मात्र कासवगतीने धूर मारत चोरांचा पाठलाग करताना दिसून येतात. त्यामुळे येथे आवश्यक पोलीस बळ तसेच वाहने पुरवावीत, अशी मागणी होत आहे.